सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची बाजी

0
92

>> किंग्स इलेव्हन पंजाबने गमावली विजयाची सुवर्णसंधी

इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील दुसर्‍या लढतीत दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचा पराभव करत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कुस स्टोईनिस याने केवळ २१ चेंडूंत सात चौकार व ३ षटकारांसह चोपलेल्या ५३ धावांच्या जोरावर दिल्लीने १५७ धावा केल्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाबला मयंक अगरवालच्या ८९ धावांनंतरही विजय मिळवता आला नाही. शेवटच्या तीन चेंडूंत अवघी एक धाव हवी असताना एक चेंडू निर्धाव व उर्वरित दोन चेंडूंवर अगरवाल व जॉर्डन बाद झाल्याने सामना निर्धारित षटकांत बरोबरीत सुटला.

सुपर ओव्हरमध्ये पंजाबला केवळ २ धावा करता आल्या. पहिल्या चेंडूवर राहुलने दोन धावा घेतल्यानंतर दुसर्‍या चेंडूवर रबाडाने त्याला अक्षर पटेलकरवी झेलबाद केले. तिसर्‍या चेंडूवर निकोलस पूरन बाद झाल्याने केवळ ३ चेंडूंत त्यांचा खेळ खल्लास झाला. सुपर ओव्हरमध्ये शमीने पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसरा चेंडू वाईड टाकला. तिसर्‍या चेंडूवर दोन धावा घेत पंतने दिल्लीचा विजय साकार केला.
तत्पूर्वी, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दिल्लीची सुुरुवात खराब झाली. शिखर धवन खातेही न उघडता बाद झाला. पृथ्वी शॉ यानेदेखील धवनचा कित्ता गिरवला. मोठी खेळी करण्यात तो देखील अपयशी ठरला. शमीचा चेंडू ‘पूल’ करण्याच्या नादात त्याने विकेट फेकली. यावेळी फलकावर केवळ ९ धावा लागल्या होत्या. विंडीजच्या शिमरॉन हेटमायरकडून खूप अपेक्षा होत्या. पण, तो अपेक्षापूर्ती करू शकला नाही. हेटमायर बाद झाला तेव्हा दिल्लीचा संघ ३ बाद १३ असा चाचपडत होता. कर्णधार श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांनी संघाचा कोसळता डोलारा सावरताना ७३ धावांची भागीदारी रचली. परंतु, विकेट गमावण्याची भिती असल्याने त्यांना अपेक्षेप्रमाणे धावगती वाढवता आली नाही. आयपीएल पदार्पण करणारा गुगली गोलंदाज रवी बिश्‍नोई याने पंतचा त्रिफळा उडवत ही जोडी फोडली. अय्यर व अक्षर पटेलही काही धावांच्या अंतराने बाद झाल्याने दिल्लीची ६ बाद ९६ अशी घसरगुंडी उडाली. एका टोकाने गडी बाद होत राहत असताना दुसर्‍या बाजूने स्टोईनिसने सावध पवित्रा अवलंबताना शेवटचे षटक टाकलेल्या ख्रिस जॉर्डला लक्ष्य केले. डावातील शेवटच्या षटकांत दिल्लीने तब्बल ३० धावा वसूल केल्या.

धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. जॉर्डन गो. शमी ५, शिखर धवन धावबाद ०, शिमरॉन हेटमायर झे. अगरवाल गो. शमी ७, श्रेयस अय्यर झे. जॉर्डन गो. शमी ३९, ऋषभ पंत त्रि. गो. बिश्‍नोई ३१, मार्कुस स्टोईनिस धावबाद ५३ (२१ चेंडू, ७ चौकार, ३ षटकार), अक्षर पटेल झे. राहुल गो. कॉटरेल ६, रविचंद्रन अश्‍विन झे. शमी गो. कॉटरेल ४, कगिसो रबाडा नाबाद ०, ऍन्रिक नॉर्के नाबाद ३, अवांतर ९, एकूण २० षटकांत ८ बाद १५७

गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल ४-०-२४-२, मोहम्मद शमी ४-०-१५-३, ख्रिस जॉर्डन ४-०-५६-०, कृष्णप्पा गौतम ४-०-३९-०, रवी बिश्‍नोई ४-०-२२-१
किंग्स इलेव्हन पंजाब ः लोकेश राहुल त्रि. गो. शर्मा २१, मयंक अगरवाल झे. हेटमायर गो. स्टोईनिस ८९, करुण नायर झे. शॉ गो. अश्‍विन १, निकोलस पूरन त्रि. गो. अश्‍विन ०, ग्लेन मॅक्सवेल झे. अय्यर गो. रबाडा १, सर्फराज खान झे. शॉ गो. पटेल १२, कृष्णप्पा गौतम झे. पंत गो. रबाडा २०, ख्रिस जॉर्डन झे. रबाडा गो. स्टोईनिस ५, मोहम्मद शमी नाबाद ०, अवांतर ८, एकूण २० षटकांत ८ बाद १५७
गोलंदाजी ः ऍन्रिक नॉर्के ४-०-३३-०, मोहित शर्मा ४-०-४५-१, कगिसो रबाडा ४-०-२८-२, रविचंद्रन अश्‍विन १-०-२-२, अक्षर पटेल ४-०-१४-१, मार्कुस स्टोईनिस ३-०-२९-२.