बंगलोरसमोर आज सनरायझर्सचे आव्हान

0
94

सनरायझर्स हैदराबाद व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हे दोन दिग्गज संघ इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमात आपल्या मोहिमेची सुरुवात आज सोमवारी करणार आहेत. उभय संघ विजयारंभाच्या इराद्याने मैदानात उतरणार आहेत.

स्पर्धेचा इतिहास पाहिल्यास आरसीबीचा संघ एका-दोघा खेळाडूंवर अवलंबून राहिला आहे. ‘लोअर मिडल ऑर्डर’ ही त्यांच्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय ठरत आली आहे. यंदाचा मोसमही याला अपवाद असण्याची शक्यता फार कमी आहे. फिंच-कोहली-डीव्हिलियर्स हे त्रिकुट खोर्‍याने धावा जमवण्यात यशस्वी ठरले तरीसुद्धा धावांचा बचाव करण्याची जबाबदारी शेवटी गोलंदाजांचीच असते. नवदीप सैनी व उमेश यादव यात कितपत यशस्वी ठरतात हे काही सामन्यांनंतर कळेलच. इसुरु उदाना व ख्रिस मॉरिस यांच्यामुळे आरसीबीचा संघ अधिक संतुलित वाटत असला तरी हाणामारीच्या षटकांत पाचव्या, सहाव्या किंवा सातव्या स्थानावर फलंदाजी करून सातत्याने मोठे फटके खेळणार्‍या फलंदाजाची उणीव त्यांना जाणवू शकते. दुबईतील खेळपट्‌ट्या संथ असल्यामुळे वॉशिंग्टन सुंदर व युजवेंद्र चहल यांची फिरकी आरसीबीच्या मदतीला येऊ शकते. मोईन अली, ऍडम झॅम्पा यांच्यासारखे ‘बॅकअप’ फिरकीपटू अमिरातीमध्ये स्पर्धेच्या कोणत्याही टप्प्यावर आरसीबीसाठी तारणहार ठरू शकतात. आज आरबीचा शुभारंभी सामना असल्याने ‘अंतिम ११’ निवडणे त्यांना सोपे जाणार नाही. एबी व फिंच यांची जागा निश्‍चित असल्याने मोईन अली, ख्रिस मॉरिस, इसुरु उदाना, डेल स्टेन यांच्यातील केवळ दोघांनाच संधी मिळणार आहे.

दुसरीकडे हैदराबादचा संघ अनुभवी आहे. वॉर्नर व बॅअरस्टोव ही यंदाच्या मोसमातीस सर्वांत स्फोटक मानली जाणारी सलामी जोडी त्यांच्याकडे आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग गाजवलेला अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबी व न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या दोघांना सामावून घेणे सनरायझर्सला शक्य नाही. त्यामुळे एकाचीच संघात वर्णी लागणार आहे. अफगाणिस्तानचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट राशिद खान याच्या जोडीला शाहबाज नदीम आज असू शकतो. हैदराबादच्या गोलंदाजांनी बंगळुरूला कमी धावसंख्येत रोखल्यास त्यांचे काम सोपे होऊ शकते.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संभाव्य ः देवदत्त पडिकल, ऍरोन फिंच, विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, इसुरु उदाना, नवदीप सैनी, उमेश यादव व युजवेंद्र चहल.

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य ः डेव्हिड वॉर्नर, जॉनी बॅअरस्टोव, केन विल्यमसन, मनीष पांडे, अब्दुल समद, विजय शंकर, राशिद खान, भुवनेश्‍वर कुमार, संदीप शर्मा, खलिल अहमद व शहाबाज नदीम.