वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांचा आयोसी अध्यक्षपदाचा राजीनामा

0
7

>> दक्षिण भारतीय आफ्रिकन वाटत असल्याचे विधान

काँग्रेसच्या थिंक टँकमधील सदस्य आणि वरिष्ठ नेते तथा राहुल गांधी यांचे राजकीय सल्लागार सॅम पित्रोदा यांनी भारतात विविधतेत एकता असल्याचे सांगतानाच वादग्रस्त विधान केले. यावेळी पित्रोदा यांनी, भारताच्या दक्षिणेकडे राहणारे लोक आफ्रिकन लोकांसारखे तर ईशान्य भारतातील लोक हे चीनी लोकांप्रमाणे दिसतात असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद उफाळून आला आहे.

या वादग्रस्त विधानानंतर पित्रोदा यांनी, इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या अनेक नेत्यांनी पित्रोदा, काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका केली आहे.

काँग्रेसचे स्पष्टीकरण
सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने स्पष्टीकरण देताना वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी सॅम पित्रोदा यांनी भारतातील वैविध्य सांगताना ज्या प्रकारची तुलना केली आहे ती दुर्दैवी आणि स्वीकारण्यासारखी नाही. काँग्रेसचा या वक्तव्यांशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींची टीका
पित्रोदा यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर टीका करताना आपल्या त्वचेचा रंग कोणताही असो, आपण भगवान श्रीकृष्णाची भक्ती करणारे लोक आहोत. संविधानाचे रक्षण करण्याच्या गप्पा मारणारे लोक त्वचेच्या रंगावरून भारतीय जनतेचा अपमान करत असल्याचे म्हटले आहे.

पित्रोदांचा राजीनामा
या वादानंतर आता सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. यासंदर्भातील पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी,पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला असल्याचे म्हटले आहे.