एअर इंडिया एक्सप्रेसचे कर्मचारी सामूहिक रजेवर

0
7

>> आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत 78 विमान उड्डाणे रद्द

आजारी असल्याचे कारण देत एअर इंडिया एक्सप्रेसचे कर्मचारी अचानक सामूहिक रजेवर गेले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत 78 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेसचे विलिनीकरण होणार आहे. त्यामुळे आपली नोकरी धोक्यात येणार असल्याचे दोन्ही एअरलाईन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रूना वाटत असल्यामुळे या विलिनीकरणाला सर्व कर्मचारी विरोध करत आहेत. त्यामुळे त्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 78 उड्डाणे रद्द झाली आहेत.

एअरलाइनचे वरिष्ठ क्रू मेंबर्सनी आजारी असल्याचे सांगत रजा घेतली आहे. अशा परिस्थितीत ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. नागरी विमान वाहतूक अधिकारी या प्रश्नावर लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, जे एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणार आहेत, त्यांनी चौकशी करुनच विमानतळावर यावे असे आवाहन एअर इंडियाकडून प्रवाशांना करण्यात आले आहे. एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये गेल्या काही काळापासून केबिन क्रू मेंबर्सची कमतरता आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी टाटा समूहाच्या मालकीच्या विमान कंपनीवर कथित गैरव्यवस्थापनाचा आरोप केला असून त्याचा निषेध म्हणून ते अचानक आजारी असल्याचे सांगत रजेवर जात आहेत. एअर इंडियामध्ये एक्स कनेक्ट विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही समस्या आणखी वाढली आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसकडून निवेदन
एअर इंडिया एक्सप्रेसने एका निवेदनाद्वारे, आमच्या वरिष्ठ केबिन क्रूच्या एका वर्गाने काल रात्री अचानक आजारी असल्याचे सांगत रजा घेतली आहे. परिणामी फ्लाईटला विलंब झाला आणि काही फ्लाईट्स रद्द झाल्या असल्याचे स्पष्ट केले आहे.

चौकशी सुरू
नागरी विमान वाहतूक प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करत आहे. एअरलाईन्सने ज्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे, त्या सर्व प्रवाशांना पूर्ण परतावा दिला जाईल किंवा त्यांची फ्लाईट दुसऱ्या तारखेला रिशेड्यूल करण्याचा पर्याय असेल असे म्हटले आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाईटची स्थिती तपासण्याचा सल्लाही दिला आहे.