मोदींच्या नेतृत्वाखाली भारत महाशक्ती होईल

0
85

>> भाजपच्या व्हर्च्युअल रॅलीत श्रीनिवास धेंपो यांचे प्रतिपादन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राची कमान हाती घेतल्यानंतर संरक्षण क्षेत्र, उद्योग क्षेत्र, आरोग्य क्षेत्र अशा विविध क्षेत्रांचा विकास साधतानाच समाज कल्याणावर भर देऊन गरिबी निर्मुलनाचे काम हाती घेतले व देशाचा विकास साधून देश कशाप्रकारे महाशक्ती बनेल यावर भर दिला. कणखर मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संरक्षण खात्याने कात टाकल्याने व परराष्ट्र नीतीत आमुलाग्र असे बदल झाल्याने भारत देश ही एक महासत्ता म्हणून उदयास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे उद्गार धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी काल काढले. पंतप्रधान मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भाजपने सेवा सप्ताहानिमित्त या व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत प्रमुख पाहुणे म्हणून श्री. धेंपो बोलत होते.

पुढे बोलताना धेंपो यांनी, मोदी यांचे भारत देशाला महाशक्ती बनवणे हे स्वप्न असून देशातील गरिबातील गरीब लोकांची उन्नती व विकास साधल्याशिवाय ते शक्य नसल्याचे म्हणणे असल्याचे सांगून मोदींनी गरिबांसाठी मार्गी लावलेल्या उजाला योजना, डिजिटल इंडिया योजना, आरोग्य बिमा योजना, स्वच्छ भारत योजना आदींचा आढावा घेतला.

परराष्ट्र नीतीने मैत्री वाढवली
पाकिस्तान, चीन या कुरापतखोर शेजारी राष्ट्रांना योग्य तो धडा शिकवण्या बरोबरच मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली अमेरिका, रशिया, जपान, फ्रान्ससह कित्येक राष्ट्रांबरोबर मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यात यश मिळवले असे धेंपो म्हणाले.

गुजरात मॉडेलची चर्चा
मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा गुजरातमध्ये त्यांनी केलेल्या विकासाची गुजरात मॉडेल म्हणून भारतभर चर्चा झाली होती. पंतप्रधान बनल्यानंतर तर त्यांनी विकासकामांचा व विविध योजनांचा झपाटा लावला. डिजिटल भारत योजनेखाली मोदी यांनी केंद्र सरकारची प्रत्येक योजना ऑनलाईन उपलब्ध करून दिली.

जीएसटीने बदल
धेंपो यांनी आपल्या भाषणातून वस्तू व सेवा (जीएसटी) कराचा खास उल्लेख करताना एक देश एक कर ही करप्रणाली देशाच्या अर्थकारणात अमूलाग्र व ऐतिहासिक असा बदल घडवून आणणारी करप्रणाली ठरली असल्याचे सांगितले.

थक्क करणारा प्रवास : मुख्यमंत्री
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, रेल्वे स्थानकावरील चहा विक्रेता ते देशाचे पंतप्रधान हा मोदी यांचा प्रवास हा थक्क करणारा आहे. त्यांचा हा प्रवास खूप खडतर होता, देशप्रेमामुळे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले व नेते म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाल्याचे सावंत म्हणाले.

२ रोजी आत्मनिर्भर
योजनेचा शुभारंभ
गोव्यात येत्या २ ऑक्टोबरपासून आत्मनिर्भर योजनेचा शुभारंभ होणार असून वेगवेगळ्या २८ क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर व बाबू कवळेकर तसेच भाजपाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हजर होते. सूत्रसंचालन माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी केले.