जाते

0
2283

– संदीप मणेरीकर
अंग माझे दगडाचे जरी
देते मऊमऊ पीठ मी
खडबडीत काया जरी
पांढरीशुभ्र देते साय जणू

जातं! एकेकाळी जातं ही ग्रामीण जीवनाची खरी ओळख होती. ग्रामीण जीवनाची पहाट या जात्यानेच सुरू व्हायची. प्रत्येक घरी जातं असायचं आणि या जात्याची घरघर पहाटेच सुरू व्हायची. त्यामुळे पहाटे आपोआपच सारं गाव जागं व्हायचं. कोंबडा आरवायचा, गोठ्यातून गाय हंबरायची आणि खिल्लारं जागी होऊन मालकालाही जागं करत असायची. अशा रम्य वेळी निसर्गालाही भूल पडत असे व दवाचे थेंब मऊशार हिरवाईवर सांडत असत. वारा पहाटगाणे गात असे आणि या सार्‍या रम्य पहाटवेळी सूर्यालाही रहावत नसे. तो आपण येत असल्याची पूर्वेस ग्वाही देत असे. त्याच्या स्वागताला रंगांची जणू उधळण होत असे. विविध रंगछटा पूर्वेस दिसू लागत आणि पहाता पहाता केशरी किरण सहस्त्र हस्तांनी पृथ्वीतलावर फेकत सूर्याचं आगमन होई आणि हे सारं होईस्तोवर जात्याची घरघर थांबलेली असे.असा हा जात्याचा महिमा होता. जात्यावर बसलं की म्हणे ओवी येते अशी एक म्हण पूर्वीचे लोक म्हणत. पूर्वीच्या काळी गिरणी नव्हत्या. त्यामुळे घरबसल्याच पीठ मिळत असे. जात्यावर बसून पीठ दळलं जाई. जाड, बारीक पाहिजे तसं पीक त्या त्या बायका दळत असत. मग ते तांदळाचं पीठ असो वा जोंधळे. पूर्वीच्या काळी पहाटे दळण दळायचं कारण म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं पीठ दळलं की त्याच्या भाकर्‍या, चपात्या काय असेल ते भाजल्या की झालं. ताजं पीठ, ताज्या पीठाच्या भाकर्‍याही मिळत असत घरच्या लोकांना.
ग्रामीण भागात हमखास ही जाती आढळून येतात. आमच्या घरी अद्यापही हे जातं आहे. दगडाचे दोन मोठे गोल एकमेकांवर अगदी फीट बसणारे. त्याला वरून एक छिद्र. त्यात एक छोटासा बांबू ठोकायचा. त्याला धरून ते जातं फिरवायचं. त्याला मध्यभागी एक छिद्र. त्यातून मूठमूठभर दाणे आत टाकायचे. दाणे टाकले की मग जातं फिरवायचं. त्यामुळे त्याखाली ते दाणेे भरडले जात असत. दाणे भरडले की खाली पीठ सांडत असे. वर म्हटल्यासारखीच आणखीही एक म्हण यावरूनच तयार झाली आहे ती म्हणजे, जात्यातले हसतात, सुपातले हसतात. सूप घेऊन त्या सुपात दळणाचे दाणे ठेवले जातात. सुपातून मग मूठीने ते जात्यात घातले जातात.
पहाटेची भक्तीगीते या जात्यावर बसल्यानंतर महिलांच्या तोंडी उत्स्फूर्तपणे बाहेर येतात. त्यांना दळण चालू असताना आपले श्रम विसरण्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं असं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या प्रतिभेला वाव दिला. अन्यथा त्यांच्या प्रतिभेला त्या काळी तसा वावही नव्हता व कोणी त्याची दखलही घेत नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी दळणाच्यावेळी आपली प्रतिभा उपयोगात आणली असावी. त्यातून मग उत्स्फूर्त अशा विविध प्रकारच्या ओव्या तयार झाल्या.
संत जनाबाई आणि जातं यांचं आगळंवेगळं नातं आहे. जात्यावर बसून दळताना बर्‍याच महिला संत जनाबाईंच्या ओव्या म्हणतात. सगळ्या महिला संतांत संत जनाबाई ह्या फार प्रसिद्धीस पावलेल्या संत आहेत. तसंच संत जनाबाई म्हटलं की डोळ्यांसमोर येतात त्या संत जनाबाई जात्यावर बसून दळत आहेत. शेजारी पांडुरंग त्यांना या दळणासाठी मदत करतोय. दळण दळून दमलेल्या संत जनाबाईंना साक्षात परमेश्‍वराने मदत केली होती. त्यामुळे खरं तर हे जातं फार भाग्यवंत म्हणावं लागेल.
दुसरी गोष्ट अशी की, संत ज्ञानेश्‍वरांनी रचलेल्या ओवी या वाङ्‌मय प्रकारातून या महिलांनी स्फूर्ती घेतली असावी. कारण ओवी ज्ञानेशाची अशी एक आजवरची श्रद्धा आहे. अभंग तुकयाचा, ओवी ज्ञानेशाची असं म्हटलं जातं. आणि संत ज्ञानेश्‍वरांचा सहवास संत जनाबाईंनाही लाभलेला होता. त्यामुळे ज्ञानेश्‍वरांपासून स्फूर्ती घेऊनच जनाबाईंनी ओवी लिहीली असावी असं मला वाटतं.
तसंच महानुभाव पंथाच्या लीळाचरित्रातील ज्या ओव्या आहेत, त्या ओव्यांचा जन्मही या जात्यावरच झाला असावा असा त्या पंथाच्या काही लोकांचाही दावा आहे. मात्र काहीही असलं तरी या ओव्यांची सुरूवात ही परमेश्‍वराची भक्ती याच भावनेतून झालेली असावी. त्यामुळे पहिली ओवी ही, ‘पहिली माझी ओवी गं..’ असं म्हणून आपल्या आवडत्या देवाचं नाव घेत त्या देवाच्या चरणी वाहिली जाते. त्यानंतर इतर ओव्या सुरू होतात त्यात घरातील कर्तृत्ववान व्यक्तींची नामावळ येते. त्यानतंर मग हळूहळू घरातील लहान बच्चे कंपनी व हळूच दारातून सूर्याची किरणं डोकावू लागली की, त्यानतंर ओवी सूर्याला वाहिली जाते व त्यानतंर दळणाचंही काम संपवलं जातं. कारण त्यानतंर पहाटेच्या सर्व कामांना सुरूवात होत असते.
एकेकाळी अशी परिस्थिती होती की चूल आणि मुल हेच स्त्रियांचं विश्‍व असायचं. त्यामुळे चुलीकडील बहुतेक कामं महिलांना करावी लागत. त्यातील पीठ दळणे हे एक महत्त्वाचं काम होतं. आमच्या गावाकडे आजही नाचणीचं सत्त्व जे काढलं जातं, ते या जात्यावरच. जात्यावर नाचणीचे दाणे भरडले जातात व त्यातून पौष्टीक सत्त्व निर्माण होतं. ते लहान बाळांचं अत्यंत पौष्टीक अन्न होय. मात्र आज महिला मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. सत्त्व, तांदळाचं, गव्हाचं, जोंधळे, ज्वारीचं पीठ जागेजागी विकत मिळत आहे. त्यामुळे उगाच कशाला ते दळत बसा, असा विचार केला जात आहे. तसंच पावलापावलावर आज गिरणी झालेल्या आहेत. त्यामुळे अशा गिरण्यांवर चक्क्यांवर तांदूळ, गहू दिले की लगेचच पीठ तयार होऊन मिळतं त्यामुळे एका तासाच्या कामाला आता केवळ पाच मिनिटं लागतात.
पाथरवट ही जाती तयार करतात. त्यासाठी त्यांना कितीतरी घाव त्यावर घालावे लागतात आणि जात्याला ते घाव सहन करावे लागतात. टाकीचे घाव सोसल्याविना देवपण जसं येत नाही तसंच जातेपणही येत नाही. देवाला निदान मूर्ती बनल्यानंतर फुले तरी मिळतात. पण जात्याला मात्र सतत घरघरच असते. स्वतःभोवती गोल फिरत बसावं लागतं. मूर्ती एका ठिकाणी विराजमान झाली की तिला आणखी काही काम नाही. पण जात्याला मात्र सतत काम असतं. स्वतःभोवती फिरावं लागतं. पीठ काढून द्यावं लागतं, माणसाची सेवा करावी लागते. त्यातून सुटका नाही होत.
जात्यावरील पीठाच्या भाकर्‍या हे एकेकाळी आमच्या घराचं वैशिष्ट्य होतं. आजी त्यावेळी पीठ दळत असे. अशा या जात्यावरच्या पीठाच्या भाकरीची चवच न्यारी. जात्यावरचा खुंटा (बांबूची काठी) दगडाने ठोकून अगदी घट्ट करायचा. नाहीतर जोराने जातं फिरवताना तो हलला तर जातंच फिरणार नाही. हा खुंटा घट्ट करण्याचं काम आमचं. आजी आम्ही दिसलो की हा खुंटा घट्ट करायला सांगायची. पीठ दळून झालं की, पहिल्यांदा तो खुंटा काढून ठेवायचा. त्यानंतर वरचा भाग उचलायचा. त्याखाली असलेल्या भागावर पीठ सांडलेलं असायचं, ते पुसायचं. मग दुसरा भाग साफ करायचा व त्यानंतर दोन्ही भाग गडगडत भिंतीला उभे करून ठेवायचे. हे काम आम्ही करत असू. आजीनंतर आईनं काही फारसा या जात्याचा उपयोग केला नाही. आता तर जवळ जवळ तो बंदच झालेला आहे. हे जातं सध्या विवाह कार्य तसंच मौजीबंधनाच्या वेळेला दिसतं; पण तेही केवळ शास्त्रापुरतं! खरं तर मुसळ किंवा जातं हे आता शास्त्रात आहे म्हणून तेवढ्यापुरतंच घरात दिसतं; अन्यथा तेही फार दुर्मिळ झालं असतं.
या जात्याचा उपयोग कधी कधी औषधासाठीही केला जात असे. पाय मुरगळला की, म्हणे त्या पायावरून जातं फिरवलं जात असे. आज तो उपाय अघोरी वाटत असला तरी, एकेकाळी तो केला जात असे. पण मुरगळलेल्या हातापायावर तो एक चांगला उपाय असायचा असं म्हटलं जातं. आज चक्क्यांचा जमाना आलेला आहे. त्यातही गव्हाचं, तांदळाचं तयार पीठच बाजारात उपलब्ध असल्यामुळे चक्क्यांवरही जाण्याची गरज नाही. पण त्यामुळे घरातून जातं बाहेर जात आहे. अस्सल ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवणारं हे जातं आज हद्दपार होत आहे. आपल्या जीवनातून आणखी एक मोती ओघळू पहात आहे.