महालसा मंदिर समाज उन्नतीचे केंद्र

0
155

– गंगाराम म्हांबरे
एखादा ज्येष्ठ समाजसेवक अथवा नेता जग सोडूनजातो, त्यावेळी ही पोकळी कशी भरून काढली जाईल याची चिंता सर्वांनाच सतावते. मग एखादी चांगली राजवट संपुष्टात येते, त्यावेळी घडणारा अनर्थ तर महाभयंकर असतो. १५६५ साली विजयनगरचे साम्राज्य अस्तित्व गमावून बसले, त्यावेळी जनतेवर महासंकट कोसळले. पोर्तुगीज राजकर्त्यांनी याचा लाभ उठवून गोव्याच्या अस्मितेवर हल्ला चढविला. ज्या ठिकाणी समाज एकत्र येतो, त्यांच्यात बंधुत्व निर्माण होते, ऐक्याची भावना तयार होते अशी मंदिरेच नष्ट करण्याचा चंग पोर्तुगीजांनी बांधला. सासष्टी आणि बार्देश तालुक्यातील सर्वाधिक मंदिरे नष्ट करण्यात आली. एवढेच करून हे धर्मवेडे माथेफिरू थांबले नाहीत, तर मुळ स्थानी पुनर्निर्माणाची संधी मिळू नये यासाठी त्यांनी त्याच ठिकाणी चर्चेसची उभारणी केली. सासष्टीमधील वेर्णा (वरेण्यपुरी) येथील श्री महालसा मंदिर हे तर असंख्य गोमंतकियांचे श्रध्दास्थान! असे जागृत आणि गजबजलेले देवस्थानही फिरंग्यांच्या कचाट्यातून सुटले नाही. ७ मार्च १५६७ रोजी सासष्टीचा कप्तान दियोगु फर्नांडिस याने मंदिरावर धडक दिली. विद्ध्वंस केल्यानंतर आपल्या खुनशी सवयींप्रमाणे त्यांनी पाडलेल्या महालसेच्या गाभ्यावर क्रॉस उभा करण्याचा प्रयत्न केला. क्रॉस टिकत नाही, म्हणून दगडावर क्रॉस कोरण्यात आला. मात्र, दुसर्‍या दिवशी क्रॉस नष्ट झाल्याचे आढळायचे. देवीच्या शक्तीसामर्थ्याची दखल घेत पोर्तुगीजांनी एका आदेशाद्वारे, या ठिकाणी कुणी लुडबूड करू नये अशी सक्त ताकीदच दिली.अत्याचारी, जुलमी पोर्तुगीजांना १९६१ मध्ये गोव्यातून हाकलण्यात आले. मात्र त्यानंतर ४० वर्षे वरेण्यपुरीला श्रीमहालसा देवीची पुन:प्रतिष्ठापना होऊ शकली नव्हती. अखेर १ मे २००५ रोजी मूळ मंदिराच्या गाभार्‍यावरच श्रीमहालसेचा प्रतिष्ठापना सोहळा शृंगेरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य भारतीतीर्थ यांच्या हस्ते संपन्न झाला. या मंदिराची उभारणी व्हावी यासाठी प्रारंभी, तत्कालीन मुख्यमंत्री श्रीमती शशिकला काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि नंतर स्व. सर्वोत्तम प्रभूदेसाई व रामदासजी सराफ यांच्या नेतृत्वाखाली समितीने केलेल्या कार्यास तोड नाही! केवळ धार्मिक नव्हे, तर राष्ट्रीय, सांस्कृतिक आणि दैवी कार्याला आपला हातभार लागावा यासाठी असंख्य हात पुढे सरसावले आणि त्यामधून साकारले आजचे बहुउद्देशीय असे समाज मंदिर. श्री महालसेच्या कृपाशीर्वादाने कार्यरत असलेले एक समाज केंद्रच!
धर्मांध प्रचारक आणि जुलमी पोर्तुगीज सत्ताधीश यांनी संयुक्तपणे गोव्यात घातलेल्या थैमानाची दखल इतिहासाने निश्चितपणे घेतली आहे. अशा दोन कुप्रवृत्ती एकत्र आल्यावर कोणता अनर्थ घडू शकतो, याचा प्रत्यय गोमंतकीयांना आला आहे. तब्बल साडेचारशे वर्षे धार्मिक आणि शासकीय अत्याचाराला सामोरे जाऊनही गोमंतकीयांनी आपली हिंदू संस्कृती आणि स्वाभिमान लयाला जाऊ दिला नाही, याचीही नोंद इतिहासाला घ्यावी लागली आहे. गुलामगिरीतील अत्याचारांना तोंड देत आपले स्वत्व कसे टिकवता येईल याचाच विचार आपल्या पूर्वजांनी सतत केला असणार. याचा परिणाम म्हणून गोवा मुक्तीनंतर स्वातंत्र्यामध्ये मोकळा श्‍वास घेताना, गोमंतकीयांनी आपला स्वाभिमान आणि दरारा वेळोवेळी व्यक्त केला. आता प्रश्‍न एकच उपस्थित होतो की, हिंदू समाजातील विविध घटकांनी पुनर्जिवित केलेली, पुन:प्रतिष्ठापना केलेली धर्मस्थळे ही सामाजिक केंद्रे बनली का? जेथे मन:शांती लाभू शकते, सामाजिक उणिवा आणि दोषांवर चर्चा होऊन तोडगा काढला जातो, समरसतेचे दर्शन घडते, एकतेचा प्रत्यय येतो, अशी आपली मंदिरे आहेत का? दुर्दैवाने या सार्‍याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. मंदिर हे समाजाला आधारवड वाटेल, अशी स्थिती ज्या दिवशी तयार होईल, तो सुदिन म्हणता येईल. या दशकात त्या दिशेने वाटचाल जरी सुरू झाली, तर तेही नसे थोडके. श्री महालसा-नारायणी संस्थानाने याबाबत घालून दिलेला आदर्श आणि दाखवून दिलेली वाट निश्चितपणे अनुकरणीय आहे. जेथे भेदाभेद नाही, उच्च-निचतेचा लवलेश नाही, लहान-मोठा असा फरक नाही अशा समरसतेच्या वातावरणात एकत्र येणार्‍या भाविकांचे भविष्य उज्ज्वलच असेल यात शंका नाही. एकसंध समाजमनामध्येच दिव्यत्वाची प्रचिती येऊ शकते. एक संस्थापक, एक प्रेषित अथवा एकच धर्मगुरु नसलेला हिंदू धर्म जसा विशाल आहे, त्याच खुल्या, निर्मळ मनाने आपण मंगलमय वातावरणात सर्वांचेच स्वागत करूया. धर्म, जात, रुढी, परंपरा, कर्मकांडे या पलिकडे असलेले हिंदुत्त्व हाच आपला जीवनमार्ग आहे. या मार्गावरून चालताना अन्य धर्मीयांनाही सोबत घेऊया. समाज उन्नती हेच तर सर्वांचे एकच लक्ष नाही का?