ताळगाव पंचायतीवर मोन्सेरात गटाचे वर्चस्व

0
4

>> प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंटचे अकराही उमेदवार विजयी

ताळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी पुरस्कृत ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट गटाची सरशी झाली आहे. पंचायत मंडळाच्या सर्व अकरा जागांवर मंत्री बाबूश पुरस्कृत गटाच्या अकरा उमेदवारांची निवड झाली आहे. मंत्री बाबूश पुरस्कृत गटाच्या चारजणांची बिनविरोध निवड झाली होती. तर, सातजणांची निवडणूक मतदानातून निवड काल झाली आहे. विरोधी युनायटेड ताळगावकर गटाचे पंचायत मंडळावर प्रतिनिधित्व करण्याचे प्रयत्न अपुरे ठरले आहेत.

ताळगाव ग्रामपंचायत मंडळ निवडण्यासाठी रविवार दि. 28 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले होते. कांपाल येथील बालभवनाच्या आवारात सोमवारी मतमोजणी करण्यात आली. पंचायत मंडळावर अपेक्षेनुसार महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी पुरस्कृत केलेल्या गटाच्या उमेदवारांची निवड झाली. या मंत्री मोन्सेरात गटाला समविचारी नागरिकांच्या युनायटेड ताळगावकर गटाने चांगली झुंज दिली.
महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहून निवडणुकीत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

सरपंचपदासाठी नवीन चेहरा ः मोन्सेरात
ताळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी नवीन चेहऱ्याचा विचार केला जाणार आहे. नागरिकांच्या पाठिंब्यामुळे पंचायत निवडणुकीत यश मिळाले आहे, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पंचायत निवडणुकीत आमच्या गटाचे अकरा उमेदवार निवडून येतील असा विश्वास होता, असे आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी सांगितले.

युनायटेड ताळगावकर गटाचे उमेदवार निवडणुकीत यशस्वी होऊ शकले नाही. तरी, पंचायत क्षेत्रात विरोधक असल्याचे दाखवून दिले आहे, असा दावा युनायटेड ताळगावकर गटाने निवडणूक निकालानंतर पत्रकारांशी बोलताना केला.
निवडणूक निकाल :- प्रभाग 1 ः सिद्धी केरकर (बिनविरोध), प्रभाग 2 ः आग्नेल दा कुन्हा, प्रभाग 3 ः हेलना परेरा, प्रभाग 4 ः रितिका गांवस, प्रभाग 5 ः उशांत काणकोणकर, प्रभाग 6 ः इथेला डिसौझा (बिनविरोध), प्रभाग 7 ः जानू रूझारियो, प्रभाग 8 ः मारिया फर्नांडिस, प्रभाग 9 ः संजना दिवकर, प्रभाग 10 ः सागर बांदेकर (बिनविरोध) आणि प्रभाग 11 ः सिडनी बार्रेटो (बिनविरोध).

पणजी मतदारसंघ सोडणार नाही ः बाबूश

आपण ताळगाव मतदारसंघात पुन्हा जाणार नाही. ताळगाव मतदारसंघात आपला प्रतिनिधी आहे. पणजी मतदारसंघ सोडणार नाही. कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी पूर्ण होणार नाहीत. ज्या व्यक्तीला लोकांचा पाठिंबा आहे. त्यालाच पक्षात किंमत आहे. लोकांचा पाठिंबा असेल तरच पक्षाची उमेदवारी मिळते. माझा पक्षावर पूर्ण विश्वास आहे. आपणाला लोकांचा पाठिंबा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काल ताळगाव पंचायत निवडणूक निकालानंतर पत्रकारांशी बोलताना केले.
लोक आपल्या जमिनी विकतात. आपण त्यांना रोखू शकत नाही. ताळगावातील 99 टक्के शेतजमीन कोमुनिदादच्या मालकाची आहे. त्या जागेत बांधकाम केले जाऊ शकत नाही, असा दावा मंत्री मोन्सेरात यांनी केला.
आपण कोणते शेत आपल्या नावावर घेतले आहे किंवा शेत जमिनीचे रूपांतर केले आहे का ते विरोधकांनी दाखवावे, असे आव्हान मंत्री मोन्सेरात यांनी यावेळी दिले.