ऋतुराज ‘वसंत’ बहरत आला…

0
84
  • रमेश सावईकर

सहा ऋतूंपैकी वसंत ऋतू हा ऋतुराज म्हणून ओळखला जातो. निसर्गात म्हणा किंवा सृष्टीत- ह्या ऋतूत होणारे बदल हे मानवी जीवनाला नवा उत्साह नि उमेद बहाल करणारे असतात. झाडांना नवी पालवी फुटते. वृक्षवेली हिरव्यागार होतात. शिशिरातील झाडाझडती किंवा पानगळ संपून हिरव्यागर्द रंगाची वस्त्रे वृक्ष आणि वल्लरी धारण करतात. सृष्टीतील ते अनोखे विभ्रम पाहून आपले नेत्र तृप्त होऊन जातात.

सहा ऋतूंपैकी वसंत ऋतू हा ऋतुराज म्हणून ओळखला जातो. निसर्गात म्हणा किंवा सृष्टीत- ह्या ऋतूत होणारे बदल हे मानवी जीवनाला नवा उत्साह नि उमेद बहाल करणारे असतात. झाडांना नवी पालवी फुटते. वृक्षवेली हिरव्यागार होतात. शिशिरातील झाडाझडती किंवा पानगळ संपून हिरव्यागर्द रंगाची वस्त्रे वृक्ष आणि वल्लरी धारण करतात. सृष्टीतील ते अनोखे विभ्रम पाहून आपले नेत्र तृप्त होऊन जातात. मन सुखावून जाते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती।’चा अनुभव येतो. मयूराने आनंदित होऊन आपला पिसारा फुलवावा तसे माणसाच्या मनाचा पिसारा फुलतो. ‘ऋतु हिरवा ऋतु बरवा’ याची प्रचिती येते. मन आनंदाने बेधुंद होते.

माघ शुक्ल पंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत ‘वसंतोत्सव’ साजरा केला जातो. मौजमजा करण्याचा हा काळ. लोकगीते नि लोकनृत्ये यांचे सादरीकरण करीत वर्षभरातील कामांचा-कष्टांचा शीण घालविण्यासाठी ‘वसंत’ खेळला जातो. ‘शिग्मा’ किंवा ‘शिगमो’ या नावाने गोव्यात, तर महाराष्ट्रात ‘शिमगा’ या नावाने हा सण साजरा केला जातो.

चैत्र व वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूचे मानले गेले आहेत. तथापि, त्याच्या आगमनाची चाहूल फाल्गुन पंचमी तिथीलाच जाणवू लागते, जेव्हा सायन सूर्य किंवा उष्ण कटिबंधीय सूर्य एकामागून एक अशा दोन राशीतून मार्गक्रमण करतो तेव्हा ऋतू घडतात.
भारतात ऋतूंचे पारंपरिक वर्गीकरण ‘रिट्‌‍स’ म्हणून ओळखले जाते. वर्षभरातील हवामान आणि खगोलशास्त्रीय बदलांवर आधारित सहा ऋतूंचे चक्र आहे. वसंत ऋतू (चैत्र-वैशाख) मध्य फेब्रुवारी ते एप्रिलच्या मध्यापर्यंत येतो. हे मध्यम तापमान, उमलणारी फुले आणि दोलायमान रंग याने हा वैशिष्ट्यकृत आहे. हा कायाकल्प, वाढ आणि नवीन सुरुवातीचा काळ मानला जातो.
शिशिर ऋतूमध्ये हिवाळा हंगामाचा समावेश होतो. तो डिसेंबर मध्यापासून सुरू होतो आणि फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत वाढतो. थंड तापमान, धुकेयुक्त सकाळ आणि थंड रात्री हे याचे वैशिष्ट्य आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर हे सहा संस्कार किंवा ऋतू भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवलेल्या हवामानातील विविधता दर्शवितात. वर्षभरातील सांस्कृतिक सण, कृषी उपक्रम आणि एकूण जीवनशैलीमध्ये ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

माघ महिन्यामध्ये उत्तरायणाबरोबर वसंताची चाहूल लागते व वातावरण उत्साहवर्धक होऊ लागते. ऋतुराज वसंताच्या आगमनाप्रीत्यर्थ पाच ऋतूंनी आपल्या कालावधीतील आठ-आठ दिवस भेट म्हणून दिले आहेत. हे 40 दिवस चैत्र बलिप्रतिपदेपूर्वी म्हणजे वसंत पंचमीपासून सुरू होतात, असे कविकल्पनात्मक स्पष्टीकरण दिले जाते. प्रारंभी हा दिवस वसंत ऋतूच्या संदर्भातच साजरा होत असावा. परंतु नंतर हिंदू धर्मशास्त्रकारांनी तसेच पुराणकारांनी वसंत पंचमी उत्सवाला काही धार्मिक कथा जोडलेल्या आढळतात.
वसंत पंचमीला ‘श्रीपंचमी’ असेही म्हणतात. लक्ष्मीचा तो जन्मदिवस म्हणून ही ‘श्रीपंचमी’ असे म्हटले जाते. हा दिवस श्रीसरस्वती पूजनोत्सवाचाही मानला जातो. बंगाली लोक या तिथीला सरस्वतीच्या प्रतिमा पुजतात. मुलांचा विद्यारंभ या तिथीपासून होतो.
धर्मशास्त्रकारांच्या मते कामदेव व वसंत ऋतूचे निकटचे नाते पुराणांमध्ये वर्णिले असल्याने या दिवशी कामदेव-रतीचीही पूजाप्रार्थना करावी अशी प्रथा आहे. तथापि, त्याप्रीत्यर्थ खास देवालये नसल्यामुळे लक्ष्मी व विष्णू यांची विविध उपचारांनी पूजा व प्रार्थना करून हा दिवस साजरा केला जातो.

आपले पारिवारिक जीवन सुखाचे व समृद्धीचे जावे यासाठी लोक कामदेव-रतीची पूजा करीत असावेत. वसंत पंचमीला काही ठिकाणी नवान्नेही करतात. शेतातून नवीन पिकांच्या ओंब्या आणून त्या देवतेला अर्पण करून नंतर भक्षण करायच्या असतात. गोव्यात नवान्नाऐवजी नवीन पिकांच्या ओंब्या घराच्या मुख्य दरवाजाला बांधण्याची प्रथा आहे.
या सणाचे लौकिक अंग अधिक ठळकपणी उठून दिसते. वसंत ऋतूत निर्माण होणाऱ्या चैतन्यदायी वातावरणामुळे उल्हसित झालेल्या मनांचा आविष्कार विविध प्रकारच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमांतून व्यक्त होतो. आनंद प्रगटीकरण हाच सणाचा उद्देश असतो. नृत्य, संगीत, वनविहार, जलक्रीडा इ. मनोरंजनात्मक कार्यक्रम पूर्वी केले जात. काही ठिकाणी रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून, रंग व गुलाल उधळून हा वसंतोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे.
वसंत ऋतूमध्ये वृक्ष-लतांना नवी पालवी फुटते. त्या पानाफुलांनी बहरतात. लोकांच्या मनोवृत्ती आनंदी व उत्साही होऊ लागतात. वसंतोत्सव हा संक्रमण स्थितीचा द्योतक आहे. निसर्गसृष्टीप्रमाणेच मानवी जीवनात आनंद व उत्साह वृद्धिंगत व्हावा या उद्देशानेच हा उत्सव साजरा करण्याची प्रथा असावी.

दक्षिण भारतापेक्षा उत्तर भारतामध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. यानिमित्त समाजातील सर्व थरांतील लोक एकत्र येतात. फाल्गुन महिन्यातील वसंतोत्सव ‘फाग’ या नावाने ओळखला जातो. फाल्गुन पौर्णिमेला वसंतोत्सव समाप्त होतो. नवसंवत्सराच्या चैत्र प्रतिपदा तिथीला नवा जोम, उत्साह, संकल्प, आनंद नि सुखाची गुढी उभारण्याची पूर्वतयारीत करीत. सरत्या संवत्सराला नि हिवाळ्याला निरोप देत चैत्र महिन्यातील वसंत ऋतूचा बहर लुटण्याची, फळांचा रस नि फुलांचा सुगंध यांचे रसपान करण्याची नवी उमेद घेऊन नववर्षाच्या स्वागताला सज्ज होत.. वसंत तना-मनात बहरून…!