म्हापशातील बोडगेश्वर मंदिरात पुन्हा चोरी

0
4

>> फंड पेटी फोडून 12 लाखांची रोकड लंपास

म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिरातील फंड पेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे 12 लाख रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. म्हापसा पोलिसांनी पंचनामा करून मंदिरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहिले. परंतु त्यात चोरांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. चोरट्यांनी मंदिरात पहाटे प्रवेश केला आणि अर्ध्या तासात रोकड घेऊन तेथून पोबारा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्री बोडगेश्वर मंदिरात चोरट्यांनी काल दि. 29 रोजी पहाटे मंदिरात प्रवेश केला आणि फंड पेटी फोडून सुमारे 10 ते 12 लाखांची रोकड लंपास केली. पहाटे चोरी करण्यासाठी आलेल्यांमध्ये चौघांचा समावेश होता. त्यांनी संपूर्ण अंग कपड्यांनी झाकले होते. त्यामुळे सीसी टीव्हीमध्ये त्यांचे चेहरे दिसून आले नाहीत.

देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दर चार महिन्यांनी फंड पेटी उघडून त्यातील पैसे आम्ही बाहेर काढतो. या काळात या फंड पेटीत अंदाजे 15 ते 16 लाख रुपये जमा होतात. चोरांनी यातील सुमारे 10/12 लाख रुपयांवर डल्ला मारला. हे चोर मंदिराच्या मागच्या बाजूने मंदिरात आल्याचा संशय व्यक्त केला.

मध्यंतरी सदर चोरीची घटना घडल्यानंतर पोलिसांनी देवस्थान समितीला आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना केली होती. दानपेट्यांना सुरक्षा अलार्म सिस्टम बसविली असती तर कदाचित ही चोरी उघडकीस आली असती.
दोन महिन्यांपूर्वी 28 फेब्रुवारी रोजी मंदिराच चोरी झाली होती. या चोरीचा तपास सुरू असून अजूनपर्यंत कुणाला अटक करण्यात आली नाही.

सुरक्षारक्षकाला बांधले

मंदिरातील तिसरी फंडपेटी फोडण्याचा चोरांनी प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. यावेळी या मंदिराच्या मागे एक सुरक्षारक्षक होता. त्याला चोरट्यांनी पकडले आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्याच अंगावरील शर्ट काढून त्याचे हात बांधले. त्यानंतर दोन चोरट्यांनी बोडगेश्वराच्या मूर्तीसमोरील व मागील भागात काही सापडते का याची तपासणी केली व ते निघून गेले.