सुधारलेली चूक

0
181

 – सौ. बबिता बाबलो गावस 

आज सकाळपासून दीप्तीचं चित्त थार्‍यावर नव्हतं. घरातील प्रत्येक वस्तूवर तिची नजर भिरभिरत होती अन् डोळे पाणावत होते. आई-बाबांच्या फोटोवर नजर गेली अन् लगेच तो फोटो तिने बॅगेत घातला. आपल्या कपड्यांची बॅग तिने केव्हाच भरली होती. आपण जो निर्णय घेतला आहे तो बरोबर असेल ना? ती विचारांत हरवत चालली होती. जन्मदात्यांना आपण पळून गेल्याची बातमी कळेल तेव्हा त्यांना खूप त्रास तर होणार नाही ना, असे अनेकविध विचार तिला सतावत होते. पण तिने जॉनला घरातून पळून येणार म्हणून वचन दिले होते.सहा महिन्यांपूर्वीच त्याच्याशी तिची भेट झाली होती. तो उंच, गोरापान… रुबाबदार शरीरयष्टी… कुणाला भुरळ पडेल असा देखणा होता. तो एका बड्या हॉटेलात अकौंटंटपदावर काम करत होता. पगार तसा जास्त नव्हता; पण दीप्तीला तो जाम आवडू लागला. ती श्रीमंत घराण्यातील मुलगी होती. मोठा भाऊ परदेशात तर दुसरा सरकारी खात्यात मोठ्या पदावर आणि वडिलही व्यावसायिक होते. घरात खोर्‍याने पैसा येत होता. अशा सधन कुटुंबातील मुलगी जॉनवर एकदम फिदा झाली होती. २२-२३ वर्षांचे वयही तसंच असतं ना, कोणावरही फिदा होणारं. जातीय बंध काय असतात ते तिला तरी कुठं ठाऊक होतं. तिला फक्त जॉन हवा होता, नवरा म्हणून! हातात हात घालून फिरायला नेणारा, रात्र रात्र नाचत-गात जागवणारा. बाकी जगणं काय, संसार काय असतो आणि समाज कसा असतो याची तीळमात्र काळजी तिला नव्हती. तिचं तसं पक्कच ठरलं होतं आज रात्री जॉनबरोबर पळून जायचं आणि कुठल्यातरी चर्चमध्ये किंवा मंदिरात जाऊन लग्न करायचं. रोज किलकिलाट करणारी दीप्ती आज शांत शांत होती. ती विचारचक्रात भरकटली होती. दुपारचे दोन वाजले. एवढ्यात दारावरची बेल वाजली. आईने दार उघडले तर दारात सुमन उभी होती.
‘‘अगं बाई सुमन काऽऽ ये… ये…!’’म्हणत आई आत गेली. हात-पाय धुऊन घेण्यास सांगत आईने ताट वाढायला घेतले.
‘‘अगं सुमन अशी अचानक कशी?’’ बाबांचा लाडक्या बहिणीला प्रश्‍न.
‘‘अरे दादा, माझ्या नणंदेला ऍटेक आला आहे. ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे.’’
‘‘अगं बाई! आता कशी आहे ती?’’ आईचा प्रश्‍न.
‘‘अगं वहिनी, आता थोडी बरी आहे ती; पण या आत्ताच्या मुलांना काही कळतच नाही बघ. पालकांचा राग तेवढा दिसतो. त्यामागच्या भावना त्यांना कळतच नाही मुळी!’’
‘‘अगं, असं काय झालंय त्यांना एवढा धक्का बसायला!’’ बाबांनी विचारलं.
‘‘ती नालायक… तिची मुलगी गेली ना पळून कुठल्यातरी ड्रायव्हरबरोबर… ना जात ना पात माहित; पण ती काही जुमानलीच नाही. अशा या पोरी कुणावरही भाळतात अन् आयुष्याचं मातेरं करतात अन् घरच्यांनाही त्रासात टाकून जातात…’’ सुमनआत्या रागारागात बोलत होत्या.
‘‘खरंच आहे तुझं बोलणं. आजकालच्या मुली रंगरूपावर भाळून कुणाच्याही प्रेमात पडतात अन् पळून लग्न करतात तेही कुठल्यातरी देवळात जाऊन. ही लग्ने कायद्यात काही बसत नाहीत. मग थोड्या दिवसांनी हे भाडोत्री नवरे असली चेहरा दाखवायला सुरवात करतात. बापाकडून पैसा आण अशा स्वार्थाने बरबटलेल्या मागण्या करतात. त्या पूर्ण नाही झाल्या तर देतात ढकलून कुठल्यातरी डोंगरावरून आणि तो मी नव्हेच म्हणून मोकळे होतात. प्रेम करायचेच असेल तर आपल्या तोला-मोलाचा बघायला काय हरकत आहे? त्याची जात-पात आपल्या कुटुंबाशी मिळतीजुळती आहे का पाहणे गरजेचे. आपल्या मायेच्या माणसांना तो आवडणारा असला तर सोने पे सुहागा म्हणायला हरकत नाही. पण आजकालची ही मुलं भलतच करून बसतात.’’ बाबा शांतपणे बोलेत होते. हे सगळं ऐकून दीप्तीचं मन भीतीने गारठून गेले. आपण जॉनबरोबर गेले आणि हे सगळं आपल्याबरोबर घडलं तर! बाबा-आईला काही झालं तर? ती सैरभैर झाली. एवढ्यात तिला पोलिसात असलेल्या बालमैत्रीणीची आठवण झाली. तिने लागलीच तिला फोन लावला. पलिकडून वीणा बोलत होती –
‘‘काय गं दीप्ती, आज माझी आठवण कशी काय झाली?’’
‘‘तुझी आठवण नेहमीच येते गं; पण आज जरा तुझा सल्ला हवा होता. माझ्यासाठी नव्हे, माझ्या एका मैत्रिणीसाठी. ती पळून जाऊन लग्न करायचं म्हणतेय. हल्लीच ती एका परजातीय मुलाच्या प्रेमात पडली आहे.’’ दीप्तीने पटकन सांगितले.
‘‘खरं सांगू दीप्ती, आजकाल जीवाला जीव देणारे प्रेमी खूप कमी झालेत. पण न बघताच मी कोणाबद्दल कसं सांगणार? एक मात्र खरं, हल्ली सुशिक्षित व फॅशनेबल मुलीच जास्त फसल्या जात आहेत. कोणावरही विश्‍वास ठेवतात, आपलं सर्वस्व अर्पण करतात आणि नंतर फसवलं म्हणून पोलिसांत तक्रार करायला येतात. नाहीतर आत्महत्या करून जीवनयात्रा संपवून टाकतात. म्हणून एक सांगते – जे काही करायचं ते काळजीपूर्वक करावं. कुण्या एकट्यासाठी आपल्या मायेच्या माणसांना तोडण्यात काही अर्थ नसतो. समाजात ताठ मानेने जगायला आपल्या कुटुंबाची तेवढीच गरज असते. आंतरजातीय विवाह नेहमीच यशस्वी होतो असं नाही. तो अपयशी ठरला तर आपल्याकडे परतण्यासाठी एकही किनारा शिल्लक नसतो हे मात्र खरं’’ म्हणत वीणाने फोन ठेवला.
दीप्तीने क्षणभर विचार केला आणि भराभर बॅगेतले कपडे कपाटात होते त्याच जागी नीट ठेवले. तिला आता तणावमुक्त झाल्यासारखं वाटलं. का म्हणून त्या जॉनसाठी मी एवढी वेडी झालेय? असं काय आहे त्याच्याकडे?? फक्त सौंदर्य… त्याव्यतिरिक्त तर काहीच नाही! परजातीच्या त्या मुलापेक्षा चांगले स्थळ मला मिळू शकते. आपल्या कुटुंबाचे नाव धुळीत मिळायला निघाले होते. पण थँक्स! वीणामुळे माझे चुकीच्या दिशेने पडणारे पाऊल सावरले. माझ्या हातून होणार असलेली चूक सुधारली. मला आज खरंच ती माझी मैत्रिण असल्याचा अभिमान वाटला. तिच्यासारखी मैत्रिण प्रत्येक चुकणार्‍या मुलीला मिळावी म्हणत दीप्तीने छताकडे पाहत हात जोडले!