चिमणदात

0
188

–  मीना समुद्र

ताईला आजीनं चांगला धडा शिकवला म्हणून छोटूला एकीकडून थोडा आनंद झाला; पण कधी न मारणार्‍या आजीनं आज ताईला असं कसं मारलं असं वाटत राहिलं. पण त्याला कुठं माहीत होतं की आजीनं ताईला डोळ्याने खुणावून ते नाटक केलं होतं म्हणून!

‘‘आजी, चिमणदात म्हणजे गं काय? चिमणीचे दात ना?’’ बाहेरून दडादडा धावत येत, धापा टाकत छोटूनं विचारलं, तसं आजी भाजी निवडता निवडता म्हणाली, ‘‘हं!’’ तिनं पाहिलं तर छोटू काहीसा विचारात पडलेला. असं झालं की त्याच्या भुवयांच्या मधोमध एक बारीकशी आठी उमटे. ती पाहून आजी म्हणाली, ‘‘काय रे, कसला विचार करतोयस? आणि मला सांग, तुला हा शब्द कुणी सांगितला?’’

‘‘आपल्या ताईटलीनं,’’ तो फुरंगटून म्हणाला. ‘‘शेजारच्या सुमाताईच्या अंगणातल्या झाडाच्या पारावर दोघी कैरी खात बसल्या होत्या. ठिकरी खेळताना झाडाखाली सापडली म्हणे! मी मागितली तर म्हणे, ‘तुला उष्टी चालत नाही ना? आम्ही घेतली चिमणदातांनी वाटून आणि आता संपलीसुद्धा!’ आणि मग दोघी टाळ्या देत हसल्या. खेळतानाही मला ‘लिंबूटिंबू’ म्हणतात आणि डोळे मिचकावून हसतात. मला खूप राग आला आहे त्यांचा.’’

खरंच त्याचा चेहरा लालेलाल झाला होता आणि गाल फुगले होते. पुन्हा आजीचा हात हलवत त्यानं विचारलं, ‘‘सांग ना गं आजी, चिमणदात म्हणजे काय? चिमणीचेच दात ना?’’ आजीनं ‘हो-नाही’ म्हणायच्या आत त्याची प्रश्‍नाची गाडी धूमधडाक्यात धावत सुटली.
‘‘पण आजी, चिमणीला कुठे दात असतात? तिला तर चोच असते ना? चोचीनंच ती दाणे टिपते आणि खाते ना? आपल्या बागेतल्या झाडावर चिमणीनं घरटं केलेलं दाखवलं होतंस ना मला तेव्हा आपल्या बाल्कनीतून मी पाहिलंय तिनं बाळांना भरवताना. चिमणा-चिमणी बाळांसाठी चारा आणतात. चिमणूताई चोचीतल्या किड्याचे, अळीचे तुकडे करून बाळांना भरवते. त्या पिल्लांना सारखी भूकच लागलेली आणि तोंड ‘आ’ केलेली उघडी. त्यांना तर दात नसतातच मुळी. नुसती बोळकी पण चोच असलेली.’’ हे म्हणताना त्यालाही हसू आलं आणि ऐकताना आजीलाही. ‘‘ती गिळतात ना नुसतं सगळं? चावून कुठे खातात? मग चिमणदात कशाला म्हणतात आजी? सांग ना!’’ तो पुन्हा मूळपदावर आला. साडेचार-पाच वर्षांच्या आपल्या चौकस नातवाचं एवढं निरीक्षण पाहून, ऐकून आजी तर खूशच झाली. प्रेमानं त्याला आपल्या जवळ बसवून म्हणाली, ‘‘अरे सोन्या, चिमणदात म्हणजे चिमणीचे दात. म्हणजे काय तर चिमणी जशी आपल्या पिल्लांना चार्‍याचे छोटे-छोटे तुकडे करून भरवते ना तसे छोटेछोटे भाग करून वाटून खाणं म्हणजे चिमणीच्या दातांनी दिलेलं खाणं. हे बघ, आपण एकमेकांचं उष्ट खात नाही. आरोग्याच्या दृष्टीनंही ते बरं नसतं. म्हणून एखादं कापड, रुमालामध्ये, फ्रॉकच्या घेरात आवळा, कैरी, पेरू असले जिन्नस धरून त्याचे दातांनीच तुकडे करायचे आणि वाटून खायचे. लहानपणी आम्ही मैत्रिणी पण तुझ्या ताईसारखे आणि सुमाताईसारखे चिमणदातांनी तुकडे करून खायचो. खेळायला, मोकळं हिंडायला गेल्यावर विळी, सुरी, चाकू कुठे असत आपल्याजवळ? कैरी, आवळा दगडांनी ठेचले तर खराब होतात. आवळाही एखाददुसराच असला तर मैत्रिणीच्या तोंडाला पाणी सुटलंच म्हणून समजा! पेरूही खावाखावासा वाटणारा. मग काय तोंडानं उष्ट न करता फ्रॉकमध्ये धरून करायचे तुकडे आणि घ्यायचे सगळ्यांनी. त्यात मजाही असते, प्रेमही असतं. आणि शिवाय ‘चिमणं’ म्हणजे छोटंसं, लहानसं, सानुलं, गोजिरवाणं, छान, सुंदर म्हणून तर तुम्हा मुलांना आम्ही ‘चिमणपाखरं’ म्हणतो. नाचणारी, उड्या मारणारी, उडणारी, खेळणारी… आणि तुमचे दात म्हणजे चिमणीचे दात. मऊ गोष्टी हातांनी तोडता येतात. लाडवाचा तुकडा काढता येतो. चिंचही हवी तेवढी मोडता येते. पण पेरू-कैरीसारखे टणक पदार्थ मोडायला दातही चिमुताईच्या चोचीसारखे चिमुकले पण घट्ट असायला हवेत.’’

‘‘एकदा बरं का रे, शाळेचा गणवेशाचा स्कर्ट खराब होऊ नये म्हणून पेटीकोटच्या घेरात धरून कैरी तोडली तर त्याचा डाग पडला म्हणून धपाटेही खाल्ले मी आईच्या हातचे.’’ आजी आठवणीने हसू लागली.
छोटूला एकदम तिने परातीत धबाधबा (धपाधपा) थापून तव्यावर धपकन् टाकलेले धपाटे (छोटे थालीपीठ) आठवले. आजीला असाच धपाधपा मार बसला असावा म्हणून त्याला ‘धपाटे’ म्हणत असावेत, या आपल्या शंकेचं त्यानं आजीकडून निरसन करून घेतलं. आजीनं प्रेमानं त्याच्या पाठीवर थोपटलं तेव्हा त्याला एकदम काहीतरी आठवलं. ‘‘आम्ही न धुता, तुला न देता कैरी खाल्ली हे आईला सांगितलंस तर बघ हं, चांगले धम्मकलाडू मिळतील तुला माझ्याकडून!’’ असं त्याची ताई म्हणाली होती आणि ‘माझ्याकडून चापटपोळ्या’ म्हणत शेजारची सुमाताईही हसली होती. त्यानं आजीला हे सांगितलं. त्यातली धमकी त्याला जाणवली होती, पण नक्की त्या दोघी काय करणार आहेत हे त्याला कळलं नव्हतं. त्यानं आजीला विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘तुझ्या ताईलाच देते. आता या दोघी येऊ दे तर खरं घरी, मग तुला कळेल.’’

थोड्या वेळाने ताई आली आणि हातपाय न धुताच आजीजवळ येऊन सोलून ठेवलेले मटार बचक भरून खाऊ लागली तेव्हा तिच्या पाठीत हाताची मूळ वळून आजीने तिला चांगले चार धम्मकलाडू आणि चापटपोळ्या दिल्या. ‘रडवेलंस ना लेकराला’ असंही ती म्हणत होती तोंडानं. तेव्हा कुठे छोटूला कळलं की पाठीवर धम् धम् वाजणारे धुमके म्हणजे धम्मकलाडू आणि पोळीसारख्या सपाट हातानं मारलेल्या चापट्या म्हणजे चापटपोळ्या. ताईला आजीनं चांगला धडा शिकवला म्हणून छोटूला एकीकडून थोडा आनंद झाला; पण कधी न मारणार्‍या आजीनं आज ताईला असं कसं मारलं असं वाटत राहिलं. पण त्याला कुठं माहीत होतं की आजीनं ताईला डोळ्याने खुणावून ते नाटक केलं होतं म्हणून!

आई नेहमी म्हणायची, ताईटलीचं आणि सुमाताईचं अगदी मेतकूट आहे. मेतकूट तर आपण गुरगुट्या मऊ भातावर घेऊन तूप घालून खातो मग हे कसलं मेतकूट? आजीनंच त्याचं हेही शंकानिरसन केलं. मेतकुटात जसे सगळे पदार्थ एकजीव झालेले असतात ना आणि त्याची चव येते की नाही भाताला तशा या दोघींत अगदी घट्ट मैत्री आहे. त्यांना एकमेकींचं सगळं आवडतं, पटतं, जुळतं, एकमेकींबरोबर छान वाटतं.

‘‘मग तुझं आणि माझंही मेतकूट ना?’’ छोटूनं आजीला विचारलं तसं ती म्हणाली, ‘‘हो, मेतकूट म्हण किंवा गूळपीठ म्हण.’’ ‘हे आणि काय?’ छोटूला शंका आली ती ओळखून आजी म्हणाली, गुळामुळे तुपावर भाजलेलं पीठ कसं छान चिकटून राहतं ना, त्याची गोडीही वाढते, तसं रे सोन्या तुझ्यामुळे आणि तुझ्या ताईमुळे- ती तर दुधावरची साय,’- माझ्या संसाराची गोडी वाढली आहे बघ.’’ असं म्हणत आजीने डब्यातला गूळपापडीचा लाडू त्याच्या हातावर ठेवला. ‘आता हा मी तुला चिमणदातांनी देतो’ म्हणत त्याने तोंडाला लावला तर त्याचा भुगा अंगावर सांडला. मग दोघंही हसू लागली. आई-ताईही त्यात सामील झाली.