-ः अवती-भवती ः- जीवनगाणी

0
170

– दत्ताराम प्रभू-साळगावकर

समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. पण आपण सर्वकाही दुसर्‍यांना अर्पण करू शकत नाही; व ते शक्यही नाही. पण ‘जगाला प्रेम अर्पावे’ एवढं तरी जरूर करू शकतो! तेवढंच केलं तरी जीवनाचं सार्थक!!

‘जीवन सुख-दुःखाची जाळी, त्यात अडकले मानव कोळी’ असं जीवनाचं वर्णन आहे. जीवन सर्व मानवजातीला एकाच प्रकारचं लाभतं का? नाही! प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. जीवन म्हणजे नक्की काय, या प्रश्‍नाचं उत्तर वेगवेगळं मिळेल. कोणी म्हणेल आपण प्रत्यक्ष जगतो ते जीवन. कोणी जीवनाला काळात बांधेल, म्हणेल, ‘आपण जन्म घेतो त्या वेळेपासून अखेरचा श्‍वास घेईपर्यंतचा कालखंड म्हणजे जीवन.’ कोणी म्हणेल, ‘आपण जे चांगल्याप्रकारे जगतो, ते जीवन; हसत-खेळत जगतो ते जीवन.’ एकंदरीत ‘जीवन’ या शब्दाची शब्दशः व्याख्या करणं कठीण. जीवनाचं रूप, स्वरूप वाणीतून, लेखणीतून, करणीतून अनेकांनी व्यक्त केलेलं दिसतं.

पुष्कळशा कविवर्यांनी जीवनासंबंधी भावना आपल्या कवितांतून व्यक्त केलेल्या आहेत. यात अनेक बाजू आहेत, बर्‍या-वाईट, सुखी-दुःखी सर्व. कवींच्या भावना शब्दातून काव्यात उतरतात. त्या नुसत्या भावनाच नसतात. जीवनविषयक तत्त्वज्ञानही अनेक कवींनी काव्यातून मांडलेलं आहे. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं म्हणणार्‍या कविवर्यांची जीवनासंबंधी आसक्ती किती तीव्र आहे, जीवनावरचं प्रेम किती जाज्वल्य आहे; त्या शब्दात किती आशावाद ठासून भरलेला आहे, शब्द किती प्रेरणादायक आहेत याचा प्रत्यय येतो. ‘व्यथा असो, आनंद असू दे; प्रकाश किंवा तिमिर असू दे; वाट दिसो अथवा ना दिसू दे’ असं म्हणून कवी आपलं जीवनगाणं गातो. या ओळींमध्ये कसंतरी करून जगायचं म्हणून जगायचं असा संदेश नाही, तर दुर्दम्य इच्छाशक्ती आहे यात संदेह नाही! ‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे’ असं म्हणणारे कविवर्य सकारात्मक दृष्टीनेच जीवनाकडे पाहतात. यांना जीवनात आनंदी आनंदच दिसतो, म्हणूनच तर असे शब्द त्यांच्या मनात जन्म घेतात. ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ अशी निराशा या ‘आनंदी आनंद गडे’त नाही!

‘अशा लाल मातीत जन्मास यावे, जिचा रंग रक्तास दे चेतना’ असं जेव्हा कवी म्हणतो तेव्हा त्यात लाल मातीची महती आहेच, त्याचबरोबर इथंच जन्म घ्यायचा हा भावनाविलास आहे. रक्तास चेतना देणारी ही नाती म्हटलं तरी त्या शब्दात रक्ताचं एक प्रकारचं सळसळणं आहे, जे जीवन सार्थक ठरणारं ठरतं! ‘तार्‍यांमधले दूध पिऊनी गेल्या रात्री, आणि दिशांनी म्हटली मजला जी अंगाई’ असं जेव्हा कवी म्हणतो तेव्हा ती बालपणाची कहाणी असेल, पण त्यात पुढील जीवनाचं प्रवेशद्वार दिसतं. आपल्या भूमीत ‘उधाणाचा खारा वारा, पावसात दारापुढे सोन्याचांदीच्या रे धारा’ किंवा ‘गड्या नारळ मधाचे, कड्याकपारीमधून घट फुटती दुधाचे’ असं जेव्हा कवी म्हणतो तेव्हा त्यात भूमीची महती जरूर आहे, भूमीचा अभिमान जरूर आहे. त्याचबरोबर जीवन आनंदमय करणार्‍या बाबींचा, चमत्कृतींचा वर्षाव वर्णिलेला आहे, जेणेकरून जीवनाचं सार्थक होतं. हा निव्वळ कल्पनाविलास नाही तर अनुभवाचे बोल व अनुभवाचे क्षण आहेत. ‘मी पण ज्यांचे पक्व फळापरि सहजपणाने गळले हो, जीवन त्याना कळले हो’ असं कवी ठामपणे सांगतो. ‘मी पण’ यात मला अनाठायी झालेला गर्व दिसतो. पक्व फळ सहजपणाने गळणं हा दृष्टांत आहे. अगदी सोप्या व साध्या उदाहरणातून कवीनं चिरंतन तत्त्व मांडलं आहे. सर्वांसाठी!!
‘जीना यहॉं, मरना यहॉं, इसके सिवा जाना कहॉं’ हे शब्द काय सांगतात? आपण इथे जन्मलो, इथेच आपल्याला जगायचं आहे व इथेच मरायचं आहे; दुसरी जागा नाहीच व नकोच. आपल्या जीवनाची गाठ याच भूमीशी बांधलेली आहे, ती आपण का नाकारावी? हाच त्याचा मथितार्थ. ‘जिन्दगी एक सफर है सुहाना, यहॉं कल क्या हो किसने जाना’ या शब्दांतसुद्धा जगणं हा किती सुंदर असा प्रवास आहे, पुढे काय होईल ते होवो हीच भावना डोकावताना मला दिसते.
काही वेळा मात्र आपल्या जीवनात असे काही अनुभव येतात की मन उद्विग्न बनतंच बनतं. जीवनाचा अर्थ शोधताना निराशा येते व ‘गेेेेले ते दिन गेले’ असं वाटतं. ‘लळा जिव्हाळा शब्दच खोटे’ असंही वाटतं. पण त्याचवेळी ‘कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला’ असं सांत्वनही सापडतं. कुठलाही मनुष्य, कोणाचंही जीवन सर्वस्वी परिपूर्ण असं नसतंच. चुका होतात, केल्या जातात, चुकलेले वाटसरू असतातच; म्हणून निराश व्हायला नको असा काहीसा उपदेश जाणवतो. ‘रामकृष्णही आले गेले’ म्हणजे प्रत्येकाला कधीतरी जायचंच आहे, अंत हा अटळ आहे हे पटतं. कारण देवदेवतानाही तो चुकवता आलेला नाही! ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’ हे खर्‍यावर उतरणारे शब्द आहेत. असं जरी असलं तरी ‘गाऊ त्याना आरती’ किंवा ‘परी जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती’ असं म्हणून काहींच्या पवित्र स्मृतीलाच नव्हे तर त्यांच्या जीवनगाथेपुढे आपण नतमस्तक होतो!
शेवटी आपल्या वाट्याला आलेलं जीवन कसं जगायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं, हसत-खेळत की रडत-कुढत? बर्‍याचदा नशीब किंवा दैव यांना दोष देत त्यांच्यावर सोपवलं जातं. परिस्थितीचा प्रभाव निश्‍चितपणे असतोच, पण तेच सर्वस्वी कारण नव्हे. जीवनासंबंधी विचार मांडताना वर उधृत केलेल्या काव्यपंक्तींचे त्या कवितेतील संदर्भ वेगळे असतील; नव्हे आहेतच. पण जीवनाचा अर्थ किंवा जीवनाचं वर्म आणि मर्म बर्‍याच प्रमाणात उलगडणार्‍या त्या काव्यपंक्ती व शब्द आहेत असं म्हटलं तर? भूतकाळ आपल्यासाठी मार्गदर्शक असतो, वर्तमानात आपण प्रत्यक्ष मार्गक्रमण करत असतो, भविष्यात मार्गक्रमण करायचं नसतं. नदीला जसं ‘मीलन वा मरण पुढे’ हे माहीत नसतं तसं! ‘आयुष्याची आता आली उजवण’ अशी आपली स्थिती येते तेव्हा आपल्या डोळ्यांसमोरून आपल्या जीवनाचं चलत्‌चित्र सरकत असतं. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो. पण आपण सर्वकाही दुसर्‍यांना अर्पण करू शकत नाही; व ते शक्यही नाही. पण ‘जगाला प्रेम अर्पावे’ एवढं तरी जरूर करू शकतो! तेवढंच केलं तरी जीवनाचं सार्थक!!