-ः खुले मैदान ः- भारतीय क्रिकेटचे पाच यशस्वी संघनायक

0
120

– सुधाकर नाईक

क्रिकेट सामन्याचे यश अकरा खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असते पण त्याहून संघनायकच्या कल्पकतेचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. भारतीय क्रिकेटला उण्यापुर्‍या शतकभराच्या कालावधीचा इतिहास असून आतापर्यंत ३३ क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. त्यातील पाच यशस्वी कर्णधारांच्या कारकिर्दीविषयी…

क्रिकेट हा जागतिक स्तरावरील सर्वाधिक लोकप्रिय खेळ होय. क्रिकेट सामन्याचे यश अकरा खेळाडूंच्या कामगिरीवर अवलंबून असते पण त्याहून संघनायक, कर्णधराच्या कल्पकतेचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. संघाला यश मिळवून देणार्‍या कल्पक कर्णधाराला यशस्वी कर्णधार संबंोधले जाते, त्याचबरोबर अपयशाचे खापरही बहुश: त्याच्यावरच फोडले जाते. भारतीय क्रिकेटला उण्यापुर्‍या शतकभराच्या कालावधीचा इतिहास असून आतापर्यंत ३३ क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. क्रिकेटच्या जागतिक इतिहासाचा मागोवा घेतल्यास द. आफ्रिकेचा ग्रॅएम स्मिथ हा (५३ कसोटी विजय) क्रिकेटविश्‍वातील कसोटी क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी कर्णधार असून त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंटिंगचा (४८ कसोटी विजय) क्रम आहे. भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीने हल्लीच ३३ विजय नोंदवीत तिसरे स्थान मिळविले आहे.

मन्सूर अली खान पतौडी
भारतीय क्रिकेट इतिहासात काही मोजक्याच कर्णधारांनी यशस्वी आलेख नोंदलेला असून पाच यशस्वी संघनायकांच्या यादीत मन्सूर अली खान पतौडी यांचे नाव सर्वप्रथम नजरेसमोर येते. १९६७ ते ७५ या कालावधीत भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविलेले पतौडी यांना कारकिर्दीच्या महत्त्वपूर्ण क्षणात कार अपघातामुळे एक डोळा गमवावा लागला होता. दृढनिश्‍चयी पतौडीने धीरोदात्तपणे या समस्येवर मात करीत आपले क्रिकेटस्वप्न जारी राखले आणि यशही मिळविले. अपघातपूर्व कालखंडात ५५च्या सरासरीने १२१६ धावा नोंदलेल्या पतौडीने आपले क्रिकेटकौशल्य जारी राखीत त्यानंतरही ३४च्या सरासरीने धावा जमविल्या. २१ वर्षे ७७ दिवस या वयात भारताचा सर्वात युवा कर्णधार बनलेला पतौडी हा केवळ क्रिकेटर म्हणूनच नव्हे तर संघनायक म्हणूनही संघसाथीना प्रेरणास्थान होता. त्याच्या जिगरबाजपणामुळे त्याला ‘टायगर’ ही उपाधी लाभली होती. भारतीय संघातील द्रूतगतीची कमजोरी जाणून त्याने फिरकीला महत्त्व दिले आणि त्यामधून ‘बेदी, चंद्रा, प्रसन्ना’ या महान फिरकी त्रिकुटाचा उदय झाला. आपल्या कारकिर्दीतील ४० कसोटीत चार विजय नोंदलेल्या टायगरने भारताला विदेशभूमीवर पहिला कसोटी मालिका विजय मिळवून देताना न्यूझिलँडवर ३-१ अशी बाजी मारली होती.

कपिल देव
१९८३ मध्ये भारताला आयसीसी विश्‍वचषक अजिंक्यपद मिळवून दिलेल्या कपिल देवला भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या मालिकेत खास स्थान आहे. १९८२-८३ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या कपिल देवने इंग्लंडमध्ये नवा इतिहास घडवीत भारताला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बहुमूल्य यश मिळवून दिले. विशेष म्हणजे भारताच्या या यशात कपिल देवच्या असामान्य नेतृत्व आणि अष्टपैलूत्वाचा साक्षात्कारही घडला. क्रिकेटविश्‍वावर आधिपत्त्य गाजविणार्‍या वेस्ट इंडीजसारख्या बलाढ्य संघाविरुध्द कपिल देव आणि साथीनी विश्‍वचषकातील पहिला विजय नोंदला. झिम्बाब्वेविरुध्दच्या सामन्यात तर कपिल ‘तारणहार’ ठरला. पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणताना कपिलने नवव्या यष्ठीसाठी १२६ धावांची भागी नोंदतानाच वीरोचित शतक झळकवीत भारतीय क्रिकेटची नौका पार केली आणि अखेर लॉर्डवरील अंतिम मुकाबल्यात बलाढ्य वेस्ट इंडीजला जबर धक्का देत आयसीसी विश्‍वचषकावर नाव कोरले. कपिल आणि साथींच्या या मर्दुमकीमुळे भारतीय संघाला क्रिकेटविश्‍वात ‘कपिल डेव्हिल्स’ या नावाने ओखळले जाऊ लागले. अचाट अष्टपैलूत्वाची देणगी लाभलेल्या कपिलने सर्वाधिक पाच हजाराहून अधिक धावा तसेच कसोटी बळींचा विक्रमही नोंदला. १९८५ ते ८७ या कालावधीत भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या कपिल देवने ३४ कसोटीत ४ विजय नोंदले पण इंग्लंडविरुध्द कसोटी मालिका जिंकण्याचा भीमपराक्रमही नोंदला.

मोहम्मद अझरुद्दिन
कलात्मक फलंदाजीत माहीर असलेला मोहम्मद अझरूद्दिन कर्णधार म्हणूनही कल्पक, किमयागार ठरला. अझरने आपल्या विलक्षण नेतृत्वगुणांच्या बळावर भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून दिली. इंग्लंडचा महान फलंदाज डेविड गावरच्या फलंदाजीशी तुलना झालेला सदाबहार फलंदाज अझर एक दर्जेदार, तेजतर्रार क्षेत्ररक्षक आणि त्याहून अधिक कल्पक, चाणाक्ष कर्णधारही होता. आपल्या सदाबहार फलंदाजीवर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना हतप्रभ बनवीत एकहाती सामना जिंकण्याची कुवत असलेला अझर कर्णधार म्हणूनही समयोचित निर्णय घेण्यात कल्पक, माहीर होता. अझरने आपल्या १९९३ ते ९९ या कर्णधारपदाच्या कालखंडात भारतीय क्रिकेटला नवे आयाम प्राप्त करून देताना ४७ कसोटीत १४ विजय नोंदले. एक दिवसीय क्रिकेटमध्येही त्याने भारतीय क्रिकेटला उच्चतम स्थान मिळवून दिले. ४७ कसोटी आणि १७४ एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे नेतृत्व करताना विजयांचे शतक नोंदलेल्या अझरच्या दुर्दैवाने कारकिर्दीच्या बहरातच ‘मॅच फिक्सिंग’ नावाचे तुफानी वादळ उठले आणि मैदान तथा मैदानाबाहेरही आदरणीय ठरलेल्या भारताच्या या यशस्वी कर्णधाराची क्रिकेट कारकीर्द उद्ध्वस्त झाली. यशस्वी संघनायक खलनायक ठरला!

सौरव गांगुली
संधीचे सोने करणारा यशस्वी संघनायक म्हणून सौरव गांगुलीचा उल्लेख व्हावा. सचिन तेंडुलकरने कर्णधारपद त्यागल्यानंतर सौरवकडे जबाबदारी सोपविण्यात आली आणि त्याने ती यशस्वीपणे पेलताना भारतीय क्रिकेटला आणखी मोठी उंची गाठून दिली. २००२ ते ०६ या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत गांगुलीने ४९ कसोटीत २१ विजय नोंदविले. भारतीय क्रिकेटला यशोशिखर गाठून देतानाच युवा दमाच्या नैपुण्यकुशल खेळाडूंना हेरणारा तो ‘रत्नपारखी’ही होता. दादाच्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटला अनेक ‘मॅचविनर’ लाभले. दादा क्रिकेटपटू तथा कर्णधार म्हणून किमयागार होताच पण भावनाशीलही होता आणि त्याचा उद्रेक लॉर्डवरील इंग्लंडविरुध्दच्या सनसनाटी विजयानंतर त्याने जर्सी फिरकीत दर्शविला होता. निर्धारी, दृढनिश्‍चियी सौरवने कर्णधारपदाच्या कारकिर्दीत भारताला २००३ मधील विश्‍वचषक अंतिम फेरी तसेच आशिया कप अंतिम फेरीतही नेले. ऑस्ट्रेलियाविरुध्दची कसोटी मालिका सन्मान्यजनकरीत्या बरोबरीत सोडविण्याची महत्त्वपूर्ण कामगिरीही त्याने बजावली.

महेंद्रसिंह धोनी
‘मिस्टर कूल’ महेंद्रसिंह धोनीला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार संबोधले जाते. २००७ मध्ये द. आफ्रिकेत झालेल्या शुभारंभी टी-२० विश्‍वचषक जिंकणार्‍या, यशस्वी संघनायक ठरलेल्या धोनीने संयत, शांत यष्टिरक्षणाबरोबरच आपल्या तुफानी फलंदाजीवर भारताला अनेक विजय मिळवून दिलेले असून त्यामुळे ‘फिनिशर’ म्हणूनही त्याने नामना प्राप्त केली. धोनीने आपल्या नेतृत्वगुणाचा ठसा उमटविताना बोर्डर-गावस्कर मालिका जिंकण्याचा पराक्रम केलेला असून भारतीय क्रिकेटला आयसीसी क्रमवारीत सर्वोच्च स्थान मिळवून दिले. मैदानावर शांतपणे ठाकत, आपल्या नेतृत्वकौशल्यावर भारतीय संघाला नवी उंची, दिशा गाठून दिलेल्या धोनीने २०११ मध्ये भारताला दुसर्‍यांदा आयसीसी विश्‍वचषक जिंकून देण्याचा भीमपराक्रमही केला. विशेष म्हणजे श्रीलंकेविरुध्द अंतिम फेरीत धोनीने नाबाद ९१ धावांची ‘मॅचविनिंग’ खेळी झळकवीत भारताचे दुसर्‍यांदा विश्‍वचषकावर नाव कोरले. धोनीच्या या मर्दुमकीनंतर जगभरातील प्रसारमाध्यमांनी धोनीवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला, एवढेच नव्हे ‘भारतीय क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरनेही त्याची मुक्तकंठाने तारीफ केली.
भारतीय क्रिकेटला जागतिक स्तरावर मोठी उंची गाठून दिलेल्या संघनायकांच्या या पंचकडीला सादर प्रणाम!