क्रीडा खात्याच्या कर्मचार्‍यांचे उपोषण

0
96

कामावरून कमी करण्यात आलेल्या क्रीडा व युवा व्यवहार खात्यातील १४२ कामगारांनी काल खात्याच्या कांपाल येथील कार्यालयाबाहेर एका दिवसाचे उपोषण केले.माजी क्रीडामंत्री बाबू आजगावकर व कॉंग्रेस प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त केला. यावेळी बाबू आजगावकर यांनी उपोषणकर्त्या कर्मचार्‍यांना आपला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला. या कर्मचार्‍यांना पुन्हा सामावून घेण्यास पदे नाहीत असा दावा क्रीडामंत्री रमेश तवडकर हे करीत असले तरी ते खरे नाही, असे आंदोलनकर्त्या कर्मचार्‍यांचे नेते ऍड. अजितसिंह राणे यांनी सांगितले. राज्यभरातील क्रीडा मैदाने व अन्य क्रीडा प्रकल्प यांची एकत्रित संख्या ही ७७५ एवढी आहे. त्यासाठी भरपूर मनुष्यबळ आवश्यक असून उपोषणावर बसलेल्या १४२ जणांना तेथे सामावून घेणे सहज शक्य आहे, असे ऍड. राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले. उद्या १८ रोजी क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी आपणाला चर्चेसाठी बोलावले असून त्या दिवशी ही बाब त्यांच्या नजरेत आणून देणार असल्याचे ते म्हणाले.