डोंबिवलीतील दुर्घटनेत 8 कामगारांचा मृत्यू

0
3

>> मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता; 64 जण जखमी; केमिकल कंपनीतील बॉयलरचा स्फोट

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान नामक केमिकल कंपनीत काल दुपारी 2 च्या सुमारास बॉयलरचा भलामोठा स्फोट आणि त्यानंतर छोटे स्फोट झाले. या घटनेत 8 कामगारांचा मृत्यू झाला, तर 64 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी विविध सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्फोटानंतर घटनास्थळी आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत होते. नागरिकांनाही या घटनेचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

डोंबिवलीत्या एमआयडीसी फेज दोनमध्ये अमुदान केमिकल कंपनीत दुपारी 2 ते 2.30 च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तीन ते चार किलोमीटर परिसरात जाणवले. त्यामुळे इमारतींच्या काचाही फुटल्या, तसेच काही वाहनांचे नुकसान झाले. या कंपनीत लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. आतापर्यंत या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 64 जण जखमी झाले आहेत.
काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला मोठे स्फोट झाले, तर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले. अनेकांच्या घरांच्या काचेच्या खिडक्या फुटल्या.

दरम्यान, अतिधोकादायक रसायने तयार करणाऱ्या कंपन्या शहराच्या बाहेर नेल्या जाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. आम्ही या संदर्भात पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करुन याविषयीचा निर्णय घेणार आहोत. येत्या सहा महिन्यांत इथल्या अतिधोकादायक केमिकल तयार करणाऱ्या कंपन्या शहराबाहेर कशा नेता येतील, यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत, असे खासदार श्रीकांत शिंदेंनी म्हटले आहे.