वाढत्या उष्म्यामुळे नागरिक हैराण

0
6

राज्यातील ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उष्णतेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. येथील हवामान विभागाने आगामी दोन दिवस राज्यातील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि आद्रता 95 टक्क्‌‍यांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

चोवीस तासांत पणजी येथे कमाल तापमान 33.7 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस आणि मुरगाव येथे कमाल तापमान 33.8 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27.3 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे. आगामी दोन दिवस कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात चोवीस तासांत पेडणे येथे 15 मि.मी. आणि वाळपई येथे 6 मि.मी. पावसाची नोंद झाली. म्हापसा आणि साखळी येथे काही प्रमाणात पावसाची नोंद झाली. राज्यातील विविध भागात अवकाळी पावसामुळे झाडांची पडझड सुरू आहे. तसेच काही वीज कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. राज्यात अवकाळी पाऊस पडत असला, तरी उष्णतेच्या प्रमाणात अजूनपर्यंत घट झालेली नाही.

मोपा येथील मनोहर विमानतळ परिसरात वीज कोसळल्याने धावपट्टीवरील वीज दिव्यांची नासधूस झाल्याने सहा विमाने जवळच्या विमानतळाकडे वळवावी लागली.