कृष्णंभट्ट बांदकर आणि मराठी नाटकांची परंपरा

0
427

मनस्वी

विष्णू सुर्या वाघ

मराठी भाषेशी गोमंतकीयांचे हे नाते कसे जुळले? शेकडो वर्षे रुळलेली तशी काही पूर्वपरंपरा असल्याशिवाय हे शक्य झाले असते का? प्रत्येक पिढीत हा असा सुरेख आविष्कार घडवून आणणारी काहीतरी मूळ यंत्रणा असल्याशिवाय हे साहित्य सहजस्फूर्तीने निर्माण झाले असते का? पोर्तुगिजांच्या पाशवी वरवंट्याने आणि नंतर शणैं गोंयबाब व त्यांच्या अनुयायांच्या कटकारस्थानी कारवायांनी मराठीला गाडून टाकण्याचा अतोनात प्रयत्न केला तरी मराठीचे अस्तित्व मिटवणे त्याना शक्य झाले नाही, हा इतिहास काय सांगतो?

 

गोमंतकीय संतकवी कृष्णंभट्ट बांदकर यांचा जन्मदिवस कला अकादमीतर्फे ‘गोमंतकीय रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. चार वर्षांपूर्वी कला अकादमीच्या अध्यक्षपदाची सूत्रे मी हाती घेतली त्यावेळी बांदकरांची स्मृती जागती ठेवण्यासाठी काहीतरी करावे असा संकल्प मनात होता. नव्या पिढीला बांदकरांचे नाव आणि कर्तृत्व माहीत नाही. मराठी संगीत रंगभूमीचा उगम गोव्यातून झाला हे ऐतिहासिक सत्यही अनेकांना ठाऊक नाही. महाराष्ट्राने हे जनकत्व अण्णासाहेब किर्लोस्करांना देऊन टाकले आणि आपणही आंधळेपणाने त्यांचीच री ओढत राहिलो. वास्तविक बांदकरांची नाटके पाहून किर्लोस्करांना ‘शाकुंतल’ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. बांदकरांचे पहिले मराठी नाटक रंगभूमीवर कधी आले त्याची नोंद उपलब्ध नाही. मात्र १८७० साली त्यांनी ‘अहिल्योद्धार’ हे नाटक लिहिले याचा पुरावा सापडतो. मराठी नाटक जन्माला घालणार्‍या बांदकरांचे कर्तृत्व अनेक संशोधकांनी मान्य केले आहे. ‘गोमंत रंगभूमी दिन’ समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले प्रख्यात लोककला संशोधक डॉ. प्रकाश खांडके यांनी आपल्या भाषणात आपले गुरू कै. रा. चिं. ढेरे यांनी बांदकरांविषयी केलेले गौरवपूर्ण टिपण वाचून दाखवले. मराठी संगीत नाटक जन्माला घालणार्‍या कृष्णंभट्ट बांदकरांचा अभिमान खरे तर प्रत्येक गोमंतकीयाला वाटायला हवा. पण गोव्यातील कोकणीवादी कधीच बांदकरांचा उल्लेख करताना दिसत नाहीत. शणैं गोंयबाब यांनीही बांदकरांबद्दल कधी गौरवोद्गार काढलेले आढळले नाहीत. मात्र, जुन्या पिढीतील ज्येष्ठ लेखक, नाटककार, संगीताचे अभ्यासक आणि अस्सल गोंयकार कै. गोपाळकृष्ण भोबे यांनी आपल्या ‘गोमंतक’ या पुस्तकात बांदकरांविषयी भरभरून लिहिले आहे. भोबे लिहितात-
‘‘कृष्णंभट्ट बांदकरांनी आपल्या स्फूट रचनेने अमाप लोकप्रियता मिळवली. ज्याला बांदकरांचे एकही पद येत नाही असा एकही हिंदू माणूस गोमंतकातल्या मागल्या पिढीत चुकूनही सापडला नसता. गोमंतकातील प्रत्येक देवळात देवाच्या शिबिकोत्सवप्रसंगी बांदकरांनी रचलेले ‘झुले’ आणि त्यानी त्या देवतेची केलेली स्तुतीपर पदे म्हटली जातातच. ‘श्री सद्गुणमंडित राघवराया| अवतरलासि तू सज्जनताप रहाया| तुजविण कोणी न मज भवपार कराया| तारक निजपदभक्तजगासि ताराया| जय जय रघुवीर समर्थ॥ हा झुला नेहमी आमच्या गावच्या देवळात रामनवमीच्या उत्सवप्रसंगी शिबिकोत्सवाला प्रारंभीच म्हटला जातो. बांदकरांनी ‘कवितारस झडकरी मनांत यावा’ हीच दृष्टी ठेवून आपली समग्र कविता लिहिली आहे. त्यांच्या कवितेत विशेषसे गूढगुंजन नाही. त्यामुळे सामान्यातला सामान्य माणूसही त्यांची रसाळ पदे समंजसपणे म्हणू शकतो. विसाव्या शतकातील कित्येक प्रसिद्ध गोमंतकीय कवींच्या आरंभीच्या काही कवितांत बांदकरांचे व सोहिरोबानाथांचे संस्कार दिसतात.
सोहिरोबानाथ आंबिये आणि कृष्णंभट्ट बांदकर हे दोघेही गोमंतकाच्या भूमीत जन्माला आलेले महान संतकवी. दोघांनीही मराठीतून लेखन केले. दोघेही जन्माने सारस्वत. पण जातीचा अभिमान बाळगणार्‍या शणैं गोंयबाबना हे संतकवी ‘आपले’ वाटले नाहीत! कारण त्यानी लेखन केले ते मराठीतून. मात्र सारस्वत समाजातच जन्माला आलेल्या गोपाळकृष्ण भोबे यांनी त्यांच्यासंदर्भातील कृतज्ञता कशी व्यक्त केली आहे पहा. ‘गोमन्तक’ या पुस्तकातील ‘माझा गाव’ या प्रकरणात भोबे लिहितात-
‘‘मराठी चौथ्या इयत्तेपर्यंतच माझे शिक्षण झाले. खास अशी मराठी शाळा माझ्या गावात नव्हती. कुठे एखाद्या पडक्या देवळींत, थोडीच माणसे राहणार्‍या एखाद्या मोठ्या घराच्या निरुपयोगी जागेत किंवा एखाद्या गोठ्यात असे माझे आणि माझ्या समवयस्क मुला-मुलींचे शिक्षण झाले. शाळेत सगळी मिळून वीस-बावीस मुले होती. एवढ्याशा फीमधून मास्तरांचा महिन्याचा पगारदेखील भागवणे कठीण होते… माझ्या वेळी मराठी शाळा काढणे किंवा अशा रीतीने शिक्षण देणे हा गुन्हा होता; परंतु आम्हाला असे छुपे शिक्षण का देण्यात येत असे हे मात्र कोडे सुटत नाही.’’
‘‘काय करायचे असेल, जी काही कर्तबगारी दाखवायची असेल ती गावातच राहून दाखवावी- असे आग्रहाने सांगणारे आमचे वाडवडील आम्हाला मराठी भाषेत शिक्षण देण्यासाठी एवढे का धडपडत होते? मराठी भाषेचे त्याना एवढे का प्रेम होते? कुणी बळजबरीने ती त्यांच्यावर लादली होती का? स्तवन मराठी, भजन मराठी, पूजन मराठी, पत्रलेखन मराठी, हिशेब मराठी, देवदेवतार्चनाची भाषा मराठी…. का? राज्यकारभाराची भाषा पुर्तुगेज व बोलीभाषा कोकणी! या दोन भाषांवर सारे जीवन अधिष्ठित! मग मध्येच ही तिसरी भाषा एकाएकी प्रकटली का? असे त्या भाषेत कोणते सामर्थ्य आढळले म्हणून समस्त गोमंतकीयांनी तिची इतकी जिवापाड जोपासना करावी? तिच्या वाढीसाठी तन-मन-धन का अर्पण करावे? मला उत्तर सापडत नाही. पुढील काही वर्षांत कोकणी आणि मराठी या भाषांमध्ये वादंग उत्पन्न होतील अशी त्या लोकांना कल्पना तरी होती का?’’
गोपाळकृष्ण भोबे यांना पन्नास वर्षांपूर्वी पडलेले हे प्रश्‍न आजही विचार करण्याजोगे आहेत. कोकणीच्या नावाने ‘धोशा’ घालून मराठीला शिव्याशाप देणार्‍या शणैंच्या अनुयायांनी या प्रश्‍नांची उत्तरे गंभीरपणे शोधण्याची गरज आहे.
भोबे आपल्या लेखात पुढे म्हणतात-
‘‘मला बाराव्या शतकातील शिलालेखांच्या पुराव्यांकडे पाहायचे नाही; किंवा सोळाव्या शतकातील मराठी ग्रंथरचनेकडेही लक्ष द्यायचे नाही; परंतु गोमंतकाच्या स्वातंत्र्याची- किंबहुना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचीदेखील ज्यांनी कधी स्वप्ने पाहिली नाहीत, दुष्टांच्या दंडनापासून स्वतःला वाचवणे आणि धर्मद्वेष्ट्यांपासून स्वतःची संस्कृती जोपासणे यातच ज्यांनी आयुष्ये वेचली, त्यांनी मराठी भाषेवर कोणत्या दूरदृष्टीने प्रेम केले? त्यात त्यांचा काही हेतू होता का? गेल्या अर्धशतकात ज्या ज्या गोमंतकीयांनी रचना केली ती मराठीतच का? कवित्व रचना करून भक्तिमार्गाचा प्रसार केला तो मराठीतच का? कोकणी आणि मराठी भाषेतील अंतर्गत संघर्षाची ठिणगी उडेल, त्यात काही अंतर्गत राजकारणही निर्माण होईल याची त्या बिचार्‍यांना कधी जाणीवही नव्हती. कृष्णंभट्ट बांदकरांनी श्रीरामाची महती गाताना आणि सोयरोबानाथांनी नाथसंप्रदायाचा महिमा गाताना आपापल्या संप्रदायाच्या प्रचारार्थ वास्तविक बोलीभाषेचाच आश्रय घ्यायला हवा होता. बांदकरांची कवने जशी गोमंतकीयांच्या ओठांवर खेळतात तशी ती गोमंतकाबाहेर महाराष्ट्रात कुठेही खेळलेली आढळत नाहीत. किंबहुना इतर संतांसारखे ते कुणाच्या माहितीतही नाहीत. असे असताना त्या उभय संतांनी आपले रसाळ कवित्व मराठीतच का रचावे? त्याना त्या भाषेच्या प्राचारार्थ कुणी नेमले होते का? का ती उपजत प्रेरणा होती? गेल्या पन्नास वर्षांतील शेकडो गोमंतकीय प्रतिभावंत मराठीतच ग्रंथरचना करण्यासाठी एवढे धडपडले… का? का त्यांनी जिवाचा एवढा आटापिटा केला?’’
‘‘वरील अनेक प्रश्‍नचिन्हांचे एकच उत्तर सापडते की या भाषिक संघर्षाचे निर्णयात्मक उत्तर काळ देईल. आज त्यांच्यासंबंधी सुज्ञांनी चिंता करण्याचे काहीएक कारण नाही. जे सत्य आहे ते अजर आहे, अमर आहे! माझ्या गावातील प्रत्येक हिंदू माणूस त्याच सत्याचा, त्याच अजर-अमरत्वाचा पूजक आहे.’’
गोपाळकृष्ण भोबे यांच्या लेखनातील उतारे मी जशेच्या तसे दिले आहेत. पदरचा एकही शब्द टाकलेला नाही. काळ हाच सर्व प्रश्‍नांची उत्तरे देतो असे भोबेंनी म्हटले आहे. पन्नास वर्षांच्या काळप्रवाहात कोकणी कुठे गेली आणि मराठी कुठे राहिली याची उत्तरे काळाने दिली आहेत. गोमंतभूमीतून मराठीची मुळे उखडून टाकणे तिच्या कट्टर द्वेष्ट्यांनाही जमले नाही. पोर्तुगीज लोकांनी आपल्या पोर्तुगीज संस्कृतीची एक भव्य दगडी कोरीव मूर्ती पिढ्यान्‌पिढ्या अविरत दृष्टीसमोर ठेवून हिंदू संस्कृतीच्या खुणा नामशेष करण्याचा प्रयत्न सलग चार दशके करूनदेखील मराठी भाषेतून फुटणारा हुंकार त्याना दाबता आला नाही. मराठी भाषेशी गोमंतकीयांचे हे नाते कसे जुळले? शेकडो वर्षे रुळलेली तशी काही पूर्वपरंपरा असल्याशिवाय हे शक्य झाले असते का? प्रत्येक पिढीत हा असा सुरेख आविष्कार घडवून आणणारी काहीतरी मूळ यंत्रणा असल्याशिवाय हे साहित्य सहजस्फूर्तीने निर्माण झाले असते का? पोर्तुगिजांच्या पाशवी वरवंट्याने आणि नंतर शणैं गोंयबाब व त्यांच्या अनुयायांच्या कटकारस्थानी कारवायांनी मराठीला गाडून टाकण्याचा अतोनात प्रयत्न केला तरी मराठीचे अस्तित्व मिटवणे त्याना शक्य झाले नाही, हा इतिहास काय सांगतो?
गोमंतकातील मराठीचा वारसा हा मुद्रणकला अस्तित्वात येण्यापूर्वीचा आहे. एका पिढीपासून दुसर्‍या पिढीकडे तो अव्याहतपणे चालत आला आहे. शणैं गोंयबाब नागरी कोकणीचा मूळपुरुष. गोव्यातील मराठी भाषेला असा कोणी मूळपुरुष नाही. कोणत्याच साक्षात्कारी माणसाने मराठी भाषा गोमंतकीयांच्या अंतःकरणात जबरदस्तीने कोंबलेली नाही. झाडावर फूल उमलते तितक्याच सहजपणे गोमंतकीय संस्कृतीच्या वेलीवर मराठीचे फूल फुलत आले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत हा वारसा एका अंतरंगातून दुसर्‍या अंतरंगात लपतछपत गेला. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात तो थोडा निर्भयपणे वावरू लागला. विसाव्या शतकाच्या पहिल्या पावशतकातील डोंगरीचे कृष्णंभट्ट बांदकर, वागाळीचे जोयशी, माशेलातले करंडेशास्त्री, असोळण्याचे शेळडेकर, केरीचे दादा वैद्य, पणजीचे शांबाराव सरदेसाई इत्यादी वाङ्‌मयसेवकांकडून हा वारसा प्रियोळकर, पिसुर्लेकर, दत्तात्रय व्यंकटेश पै यांनी पुढे चालवला. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन तोच वारसा पुढच्या पिढीने म्हणजे दामोदर अच्चुत कारे, महादेवशास्त्री जोशी, लक्ष्मणराव सरदेसाई, बा. भ. बोरकर, बा. द. सातोस्कर, सां. घ. कंटक, व्यंकटेश अनंत पै रायकर, जयवंतराव सरदेसाई यांनी पुढे चालवला. बा. भ. बोरकर पुढे ‘बाकीबाब’ झाले व आपल्याला घडवणारी परंपरा विसरले. पण बा. भ. बोरकर म्हणून त्यांची जी परंपरा निर्माण झाली ती बाकीबाब म्हणून त्याना घडवता आली नाही. ‘त्या दिसा वडाकडेन’ हे लोकांच्या ओठांवर पोचलेले बाकीबाबांचे एकमेव कोकणी गीत. पण जनमानसाला आजही बोरकर आठवतात ते ‘सरींवर सरीं आल्या ग’, ‘गडद निळे जलद भरुनी आले’, ‘जपानी रमलाची रात्र’, ‘अनंता तुला कोण पाहू शके’, ‘नाही पुण्याची मोजणी’ यांसारख्या असंख्य कवितांचे जनक म्हणून! येथेच मराठी भाषेपुढे कोकणीच्या मर्यादा स्पष्ट होतात.
बा. भ. बोरकर कवी म्हणून श्रेष्ठच होते. पण हे श्रेष्ठत्व त्याना कोणत्या भाषेने दिले या प्रश्‍नाचे उत्तर मात्र सोयिस्कररीत्या दडवले जाते. साहित्यिक आविष्कार हा भाषेशी कसा निगडीत असतो याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बोरकर. बोरकरांनी मराठीतून विपुल लेखन केले. मराठी भाषेत त्यांनी गोमंतकात रूढ असलेले कितीतरी कोकणी शब्द वापरले. ही भाषिक भेसळ आहे असे कोणालाही वाटले नाही. उलट बोलीतले शब्द साहित्यात रूढ करून बोरकरांनी मराठी भाषा समृद्ध केली असेच सर्वजण म्हणू लागले. दुर्दैवाने बोरकरांना याची जाणीव राहिली नाही. मराठीतून त्यानी लिहिलेल्या कविता आणि कोकणीतून लिहिलेल्या कविता यांची तुलना केली तर दोन्हीत प्रचंड विरोधाभास जाणवतो. मराठीतले बोरकर हे एखाद्या सम्राटासारखे आहेत तर कोकणीतले बाकीबाब राजाच्या दरबारात कमरेत वाकून उभ्या राहिलेल्या मांडलिकासारखे!
शणैं गोंयबाब यांच्यापासून ज्यांची परंपरा सुरू होते त्यांच्याविषयी मला काहीच म्हणायचे नाही. ‘वळवई गावचे खारवी एकत्र येऊन मराठी नाटक मंडळी काढतात’ असे उपहासपूर्ण उद्गार शणैं गोंयबाब यांनी काढले होते. त्या वळवई गावात मा. दत्ताराम यांच्यासारखा नटसम्राट जन्माला आला. दुर्दैवाने त्या वळवईच्या परिसरात आज अनेक ‘वटवटसम्राट’ निर्माण झाले आहेत. अशाच एका वटवटसम्राटाने फेसबूकवरील आपल्या पोस्टमधून माझा निषेध केला. मी इतिहासाचा नीट अभ्यास करून लिहावे अशी मला ‘सुचोवणी’ केली. हा वटवटसम्राट नाटकात वावरणारा असल्यामुळे गोमंतकीय रंगभूमीचा इतिहास त्याला समजावून देण्याची गरज आहे. कृष्णंभट्ट बांदकर हे या इतिहासाचे एक प्रमुख शिल्पकार. सद्गुरूच्या कृपाप्रसादाने डोंगरी गावी त्यानी श्रीरामाचे देऊळ स्थापन केले आणि श्रीरामनवमीच्या उत्सवात होणार्‍या करमणुकीच्या कार्यक्रमासाठी नाट्यपूर्ण लळीते रचली. शुक-रंभा, कैकयी-मंथरा आदी पौराणिक कथांच्या आधारावर थोड्याशा संवादांबरोबर प्रासादिक पदे, साक्या, दिंड्या आदी वृत्तांची या लळीतात बांदकरांनी योजना केली. ओज, प्रासाद, पदलालित्य इत्यादी गुणांनी युक्त अशा त्या कविता सुबोध व अर्थपूर्ण असल्यामुळे त्याकाळी घरोघरी गुणगुणल्या जाऊ लागल्या, लोकप्रियही झाल्या! अण्णासाहेब किर्लोस्करांना बांदकरांची ही नाटके पाहून स्फूर्ती झाली. मिठाच्या व्यापारासाठी क्रॉफर्ड नावाच्या ब्रिटिश अधिकार्‍यासोबत अण्णासाहेब किर्लोस्कर गोव्यात आले होते. तिथल्या मुक्कामात त्यानी ही नाटके पाहिली. ते अत्यंत प्रभावित झाले. ‘‘तुम्ही आपल्या संचासह महाराष्ट्रात चला- तिथे तुम्हाला पैसाही खूप मिळेल,’’ असे त्यांनी बांदकरांना सांगितले. पण बांदकरांनी त्यांना विनम्रपणे नकार दिला- ‘ईश्‍वरी सेवेसाठी रचलेल्या या नाटकांचा व्यापार मी करू इच्छित नाही,’ असे बांदकरांनी त्यांना सांगितले. अण्णासाहेबांनी नंतर ‘‘तुम्ही येणार नसाल तर निदान मला तरी अशा प्रकारचे नाटक लिहिण्यासाठी आशीर्वाद द्या,’’ अशी विनंती कृष्णंभट्टाना केली. त्यांनी अंगार्‍यासह श्रीरामाचा प्रसाद म्हणून एक श्रीफळ उचलून अण्णासाहेबांच्या हाती दिले. पुढे अण्णासाहेब महाराष्ट्रात गेले व बांदकरांच्या कृतींपासून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘शाकुंतल’ या संगीत नाटकाची निर्मिती केली.
बांदकरांपासून प्रेरणा घेऊन अनेकजणांनी नाटकांचे लेखन करायला प्रारंभ केला. म्हापसा येथे खलप-धावजेकर, कर्पे-नाटेकर यांनी संयुक्तपणे नाटके लिहिली. त्यासाठी संच स्थापन केले. या संचांकडून त्यांची नाटके गावोगावी व्हायला लागली… लेखक निर्माण झाले… एवढ्यावरच थांबले नाही तर किर्लोस्करांसारख्या नाटकमंडळ्याही स्थापन झाल्या. ‘गोवा संगीत मंडळी’ ही नाट्यसंस्था त्याच सुमारास निघाली. या कंपनीतून बालगंधर्वांसोबत भूमिका करणार्‍या दत्तोपंत हल्याळकर या गायकनटाचा उदय झाला. पार्से या पेडणे महालातील गावात फक्त महिलांचा समावेश असलेली पार्सेकर स्त्री नाटक मंडळी निर्माण झाली.
बांदकर यांच्यानंतर मुकुंद विठोजी प्रतापराव सरदेसाई हे नाटककार झाले. त्यानी चार-पाच नाटके लिहिली. नंतर हा प्रवाह अधिकाधिक विस्तारत गेला. त्यात नारायण कामत (भौमासुर), विश्‍वनाथ हेदे (नलदमयंती व श्रीकृष्णलीला), माधव हेदे (सुनिश्‍चय प्रभाव), कृष्णराव अस्नोडकर (नवजीवन, हाच परिणाम, भक्तिप्रभाव, दुहेरी दुनिया, अग्रहार व विलासी कांता), हळर्णकर (कबीर-कमाल, भक्त प्रल्हाद, सती सुलोचना), रामचंद्र वैद्य (मृत्युंजय), भीमाजी देशपांडे (वासवदत्ता, संतापशमन व विकल्प विमोचन), दत्तू काटकर, पर्वतकर (विरोचन, चंद्रप्रभा व रोहिदास), बाळकोबा नाटेकर (बाजीराव मस्तानी व हरिश्‍चंद्र), अनंत कामत (समाजलांच्छन व विवाहरहस्य), श्रीधर सावर्डेकर (नामप्रभाव), व्यंकटेश वैद्य (गोमन्तक विजय व स्वार्थत्याग), हिराबाई पेडणेकर (जयद्रथविडंबन व यामिनी), काशिनाथ विर्डीकर (आसुरी आकांक्षा व भावनेच्या भरात), ना. के. शिरोडकर (समईतील ज्योत), बा. शि. शिरवईकर (कुणासाठी), रामचंद्र केणी (कीचकवध), रमाकांत सरमळकर (कला कौस्तुभ, चुकलेला वाटकरू, बंदिशाळा व बंधुभाव), काशिनाथ घोडे (भक्तिप्रभाव), अनंत टोपले (बहकलेला ब्रह्मचारी), शंकर पेडणेकर (उजवा हात), वासुदेव वाघ (बाल धर्मवीर), ज. ग. वळवईकर (कुरुक्षेत्राचा मुकाबला), राधाकृष्ण शेट्ये (जातिवंत रजपूत, जळती ज्योत) असे अनेक नाटककार उदयाला आले. गोमंतकीयांना शुद्ध मराठी कधीही लिहिता येणार नाही अशी ‘वज्रलिखणी’ लिहिणार्‍या शणैंला गोव्याच्या भूमीत जन्मलेल्या मो. ग. रांगणेकरांनी माझे घर, अलंकार, आशीर्वाद, कोणे एके काळी, कन्यादान, मंदिर, वहिनी, कुलवधू, नंदनवन, माहेर, एक होता म्हातारा, जयजयकार, रंभा, तुझं माझं जमेना, सतरा वर्षे, फरारी यांसारखी महाराष्ट्रभर गाजलेली नाटके लिहून चोख उत्तर दिले. सखाराम बर्वे यानी प्रणयी कीटक, बलीदान, नवदृष्टी, मंत्रजाल, जळता गोमंतक यांसारखी नाटके लिहून त्यांचे मराठी मुलखात शेकडो प्रयोग केले. ह. वि. देसाई यांनी जीवनासाठी, दोन लग्ने, आघाडीवर, अर्ध्या वाटेवर, कीर्तिमंदिर, एप्रिल फूल, जुने ते सोने, जळते शरीर, संसारसुख, बंधमुक्त, मालवते दिवे, आई यांसारखी कितीतरी नाटके लिहिली. आधुनिक वटवटसम्राटांनी हा इतिहास शिकणे गरजेचे आहे.
(क्रमशः)