दाबोळीही हवा

0
6

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साकवाळमधील विजयसंकल्प रॅलीवेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दाबोळी विमानतळ बंद होण्याची शक्यता पार फेटाळून लावली असली, तरी विमानोड्डाणे आणि प्रवासी ह्या दोन्ही दृष्टींनी दाबोळी विमानतळाचा वापर कमी होत चालला आहे ही वस्तुस्थिती ताज्या आकडेवारीतून समोर आलेली आहे. मोपा विमानतळ अस्तित्वात आल्यापासून दाबोळीवरून होणारी विमान वाहतूक कमी कमी होत चालली आहे आणि साहजिकच प्रवाशांच्या संख्येतही मोठी घट दिसून येते आहे. गेल्या मार्च महिन्याची जी आकडेवारी उपलब्ध झाली आहे ती पाहता गतवर्षीच्या तुलनेत यंदा दाबोळीतील प्रवाशांमध्ये झालेली घट तब्बल 21 टक्के आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये साडे सात लाख प्रवाशांनी दाबोळी विमानतळाचा वापर केला होता, तर यंदाच्या मार्चमध्ये केवळ 5 लाख 90 हजार लोकांनी दाबोळीचा वापर केला असे ही आकडेवारी सांगते. केवळ मार्च महिन्याचीच नव्हे, तर संपूर्ण वर्षभराची आकडेवारी तपासली तरीदेखील दाबोळीवरील विमानप्रवाशांच्या संख्येत मोठी घट दिसून येते आहे. गेल्या दोन वर्षांचे आकडे तपासले तर प्रवाशांची संख्या 84 लाखांवरून 69 लाखांवर घसरल्याचे हे आकडे सांगतात. मोपाचा पर्याय उपलब्ध झाल्यापासून दाबोळीचा वापर कमी होणे साहजिक होते आणि तेच प्रत्यक्षात घडताना दिसू लागले आहे. ह्याचे सर्वांत प्रमुख कारण काही आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी मोपा विमानतळाला आपले केंद्र बनवले आहे. त्यामध्ये कतार एअरवेज, ओमान एअरवेजसारख्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्या जशा आहेत, तशीच नुकतेच खासगीकरण झालेली आपली एअर इंडिया देखील आहे. जसजशी मोपावरून आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे वाढू लागतील, तसतसे दाबोळीचे महत्त्व कमी होत जाईल. मुळात दाबोळी हा नौदलाचा विमानतळ आहे, त्यामुळे तेथे छायाचित्रणासही मनाई आहे. दुसरा पर्याय नसल्याने गोवा मुक्तीनंतर त्याचा वापर नागरी विमानवाहतुकीसाठी होत आला, परंतु आता मोपासारखा मोठा आणि अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा राहिला असल्याने विमान कंपन्या आणि प्रवासी ह्या दोहोंची पहिली पसंती दाबोळीऐवजी मोपाला असणे साहजिक आहे. मोपा विमानतळाचे संचालन खासगी कंपनी करते आहे. साहजिकच दर्जेदार सेवासुविधांच्या बाबतीत त्याचा हात दाबोळी धरू शकत नाही. शिवाय डिजियात्रापासून स्वयंचलित बॅगेज हँडलिंगसारख्या अत्याधुनिक सेवासुविधांनी तो सुसज्ज आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी तेथून विमान प्रवास सुखकर बनला आहे. त्यातच बहुतेक विमान कंपन्यांनी अनेक नव्या ठिकाणी आपली थेट विमानसेवा मोपावरून सुरू केली आहे. त्यामुळे त्या प्रवाशांसाठी मोपाला जाणे अपरिहार्य बनले आहे. जसजशी विमानोड्डाणांची संख्या वाढत जाईल तसतसा मोपाचा वापरही वाढत जाईल. सध्याच्या परिस्थितीत मोपापेक्षा दाबोळी विमानतळावरील शुल्क कमी असल्याने तिकिटांचा विचार करता मोपापेक्षा दाबोळीहून विमान तिकीट स्वस्त पडते, परंतु विमानोड्डाणांची संख्या आणि सुविधांचा विचार करता मोपा अधिक सुखकर ठरतो असा प्रवाशांचा अनुभव आहे. त्यामुळेच दाबोळी विमानतळ कायम ठेवू असे सरकार कितीही सांगत असले, तरी विमान कंपन्या आणि विमान प्रवासी यांना दाबोळीचाच वापर करण्याची सक्ती सरकार करू शकणार नाही. दाबोळी विमानतळाच्या जोरावर दक्षिण गोव्याचा गेल्या सहा दशकांत मोठा पर्यटनविकास झाला. मोपा विमानतळ उभा राहणार हे निश्चित झाले, तेव्हा त्याला विरोध करण्यात ही पर्यटक लॉबीच आघाडीवर होती. तऱ्हेतऱ्हेने मोपाला ह्या लोकांनी विरोध केला. परंतु आता मोपा झाल्याने उत्तर गोव्याकडे पर्यटनाचा ओघ वाढू लागला आहे आणि नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. परदेशांमध्ये एकेका शहरात एकाहून अधिक विमानतळ ही सामान्य बाब असते. त्यामुळे गोव्यासारख्या पर्यटनाभिमुख राज्यामध्ये दोन विमानतळ असणे ही काही विशेष बाब नाही. दाबोळीचा मुद्दा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे, परंतु दाबोळी विमानतळ सुरू राहावा असे सरकारला वाटत असेल तर तेथून अधिकाधिक विमानोड्डाणे सुरू राहतील, विशेषतः उडान योजनेचा लाभ घेऊन नव्या विमानसेवा तेथून सुरू होतील हे सरकारने पाहणे आवश्यक आहे. एकीकडे विमानतळ बंद न करण्याची भाषा करणारे सरकार दुसरीकडे विमानाच्या इंधनावर अतिरिक्त कर लावते ही विसंगती आहे. गोव्याच्या हवाईक्षेत्राचा विस्तार करायचा असेल तर प्रवाशांना तिकिटात सवलत मिळेल ह्यादृष्टीने कररचना सरकारने करणे आवश्यक आहे. दाबोळी आणि मोपा ह्या दोन्ही विमानतळांचा वापर वाढण्यासाठी अधिकाधिक थेट उड्डाणे कशी सुरू राहतील ह्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. गोव्याचे पर्यटनकेंद्र म्हणून आकर्षण टिकून राहील हेही पाहावे. नुसत्या विमानतळ सुरू ठेवण्याच्या वल्गना काही कामाच्या नाहीत.