शब्दांचं धन

0
343

मारुती चितमपल्ली यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा हृदयंगम आलेख

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

निसर्गजीवनाशी समरस होऊन ललितनिबंधलेखन करणार्‍या सृजनशील साहित्यिकांमध्ये मारुती चितमपल्ली यांनी पृथगात्म स्थान प्राप्त केले आहे. त्यांनी अरण्यवाचनाचा आणि पक्षिनिरीक्षणाचा नवा वस्तुपाठ साहित्यरसिकांसमोर ठेवलेला आहे. आपण ज्या आसमंतात वावरतो त्याविषयीची सजगता आणि संवेदनशीलता वाढविण्याचे कार्य त्यांच्या या साहित्यनिर्मितीने केले आहे.

 

निसर्गजीवनाशी समरस होऊन ललितनिबंधलेखन करणार्‍या सृजनशील साहित्यिकांमध्ये मारुती चितमपल्ली यांनी पृथगात्म स्थान प्राप्त केले आहे. वीसांहून अधिक पुस्तके लिहून अरण्यवाचनाचा आणि पक्षिनिरीक्षणाचा नवा वस्तुपाठ त्यांनी साहित्यरसिकांसमोर ठेवलेला आहे. आपण ज्या आसमंतात वावरतो त्याविषयीची सजगता आणि संवेदनशीलता वाढविण्याचे कार्य त्यांच्या या साहित्यनिर्मितीने केले आहे. आजच्या युगमानसात अधिवासात्मक अभ्यासाची शाखा विकसित होत असताना त्यांनी ज्या प्रकारचे लेखन केले आहे, त्यामुळे ते क्षितिज संपन्न झाले आहे. पण एवढ्यापुरतेच त्यांचे यश मर्यादित नाही. लालित्यपूर्ण शैलीत आशय मांडण्याची हातोटी त्यांना प्राप्त झाली आहे. रसप्रसन्न आणि चिररुचिर शब्दकळेने विनटलेले हे लेखन रसिकमनाला आल्हाद देते. हिरव्या वाटांचा धांडोळा घेण्याचा ध्यास लेखकाच्या मनाला लागलेला आहे. सूक्ष्म निरीक्षण, अफाट वाचन, चिंतन आणि मनन करण्याची त्यांची ताकद पाहून अचंबा वाटतो. कष्टपूर्वक आणि प्रज्ञा-प्रतिभेच्या बळावर त्यांनी हे ‘स्वानंदाचे जिव्हार’ निर्माण केले आहे. ते त्यांना सुखदायक वाटते पण रसिकालाही ते उत्कट आनंदानुभव देणारे ठरले आहे.

हे आगळ्या-वेगळ्या अनुभूतींचे दर्शन घडविणार्‍या लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली याचा मनोज्ञ आलेख ‘शब्दांचं धन’ या पुस्तकात पाहायला मिळतो. ही संकल्पना मुळात तुकारामांची आहे. बदलत्या जीवनसंदर्भात मारुती चितमपल्ली यांनी ती स्वीकारली आहे. वनविभागात काम करणार्‍या त्यांच्यासारख्या वरिष्ठ अधिकार्‍याच्या जीवनात चाकोरीच्या मार्गापेक्षा अक्षरसृष्टीमुळे जीवन सुगंधित होण्याची संधी प्राप्त झाली याबद्दल त्यांना कृतकृत्यता तर वाटतेच, शिवाय ज्यांच्या सहवासामुळे आणि अमोल मार्गदर्शनामुळे, तसेच प्रोत्साहनामुळे हा लेखनप्रवास घडला त्यांच्याविषयीचा कृतज्ञताभाव त्यांच्या मनात ओसंडत आहे. आयुष्यात ती ती माणसे त्या त्या वेळी भेटणे आवश्यक असते. चितमपल्लींच्या बाबतीत नेमके हेच घडले. साधारणतः ऐंशीच्या दशकात त्यांनी या प्रकारचे लेखन सुरू केले. ‘पक्षी जाय दिगंतरा’ हे पुस्तक १९८३ मध्ये प्रकाशित झाले. त्यांचा नवोन्मेषशाली पंखांनी उडण्याचा ध्यास कायम राहिला. पक्षिशास्त्रज्ञ डॉ. सलीम अली, प्रा. नरहर कुरुंदकर, चित्रकार आलमेलकर, व्यंकटेश माडगूळकर, प्रा. जी. ए. कुलकर्णी, गो. नी. दांडेकर ही आपापल्या क्षेत्रातील दिग्गज मंडळी त्यांना भेटली. येथून तेथून प्रेरणा घेण्याचा एकलव्यनिष्ठेचा वसा त्यांनी स्वीकारला. अशा मुलुखावेगळ्या व्यक्तींना जगाचे नागरिकत्व स्वीकारावे लागते, तेव्हा कुठे सिद्धी प्राप्त होते. शोधले म्हणजे सापडते. चितमपल्लींना पक्षिशास्त्रात ऍरिस्टॉटलचा शोध असा लागला. जॉय ऍडमसनच्या विपुल ग्रंथसंपदेची गुहा सापडली. सुमंतभाई शहा हे सुहृदरूपात भेटले. बनगरवाडी, सी शॉनगॉनचं पिलोबुक, हंसदेवाचे मृगपृक्षिशास्त्र आणि जे. कृष्णमूर्तींच्या रोजनिशी मिळाल्या. ‘शब्दांचं धन’ या पुस्तकातील पंधरा लेखांतून आपल्या अनुभवसंचिताचा मागोवा सरसरमणीय शैलीतून लेखकाने घेतलेला आहे. तो अतिशय वाचनीय आहे.
मारुती चितमपल्ली यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घडविणारी माणसे भेटली. त्यांत अग्रक्रमाने भेटलेल्या व्यंकटेश माडगूळकरांवर त्यांनी जिव्हाळ्याने लिहिले आहे. चितमपल्ली रानकुत्र्यांच्या अभ्यासासाठी नागझिर्‍याच्या जंगलात तीन महिने होते. सुरुवातीचे दोन महिने त्यांनी एकट्याने काढले. मे महिन्यात तात्या माडगूळकर होते. त्यांच्या सहवासात फुलून आलेल्या त्या दिवसांबद्दल लेखकाने समरसतेने लिहिले आहे. ‘‘चितमपल्ली, तुमच्या शास्त्रीय ज्ञानाला माणसाचा संदर्भ मिळाला तर किती चांगलं होईल.’’ ही त्यांनी दिलेली नवी दृष्टी होती. नवी संथा होती. त्यांच्या सहवासात चितमपल्लींना त्यांच्या सृजनप्रक्रियेचे रहस्य उमगले. त्यांनी चितमपल्लींना पाश्‍चात्त्य आणि पौर्वात्त्य लेखक कोणते वाचावेत याविषयी मार्गदर्शन केले.
‘‘तात्यांचा मूळ पिंड तसा चित्रकाराचा. त्या चित्रकलेला पूरक माध्यम मिळावं म्हणून ते साहित्याकडे वळले. त्यांनी उभी केलेली शब्दचित्रं एखाद्या रेखाटनासारखीच व त्यांनी रेखाटलेली मिस्किल वानरांची रेखाचित्रं तशीच बोलकी. छायाचित्रात तो जिवंतपणाचा अभाव असतो, तो त्यांच्या रेखाटनात मुळीच आला नाही.’’
व्यंकटेश माडगूळकरांच्या शैलीचे योग्य असे हे मूल्यमापन आहे. या अनुषंगाने नागझिर्‍याच्या जंगलाचे निसर्गविशेष चितमपल्लींनी टिपलेले आहेत ते चित्तवेधक आहेत ः
‘‘कुसुंब व आंब्याला तांबडी पानं फुटत होती. धावड्याच्या पोपटी रंगाच्या कोवळ्या पालवीनं सारं जंगल सुंदर दिसू लागलं. पिवळ्या धमक फुलांनी अमलतास फुलला. पोवळ्या रंगाच्या पांगार्‍यांची फुलं आभाळाच्या पार्श्‍वभूमीवर गोंदल्यासारखी वाटत. पळसपापडी वार्‍यानं खुळखुळी लागली. सावरीच्या फळाची बोंडं फुटून त्यातल्या पांढर्‍या म्हातार्‍या सर्व रानभर उडू लागल्या. भरगच्च फळानं लदलेली पाखड हरोळी पक्ष्यांच्या थव्यानं जागी झाली. मोहाच्या फुलांचा दर्प जाणवू लागला.’’ संवेदनाविश्‍व जागविणार्‍या चित्रमय शैलीत सारा आसमंतच लेखकाने उभा केला आहे.
‘‘चितमपल्ली, खूप वाचा, अन् लिहा. लिहीत जा म्हणजे लिहायला येईल,’’ हा माडगूळकरांचा उद्गार चितमपल्लींच्या जीवनातील मंत्र ठरला.
तीच गोष्ट प्राचार्य नरहर कुरुंदकरांची. चालता-बोलता ज्ञानकोश असलेल्या या विद्वानाने अकाली लौकिक जगाचा निरोप घेतला ही चितमपल्लींच्या भावजीवनातीलदेखील क्लेशदायी घटना होती. कारण त्यांच्याशी झालेल्या साहित्यचर्चेमधून अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती लेखकाला वेळोवेळी घेता आली. निसर्गानुभूतीच्या आधारे हा कृतज्ञताभाव जागवताना लेखक उद्गारतो, ‘‘सरांची आठवण अशी लख्ख आकाशगंगेसारखी मनात भरून आहे.’’ पुढे जो हृद्य तपशील आलेला आहे तो मुळातून वाचायला हवा. ‘तुम्हीच लाविलें जी झाड!’ हे ज्ञानदेवीच्या ओवीतील अवतरण लेखकाने शीर्षक म्हणून स्वीकारले आहे, ते अर्थपूर्ण आहे.
‘डॉ. सलीम अलींच्या सहवासात’ हा लेख म्हणजे आनंदमय क्षणांची मैफलच. ‘‘डॉ. सलीम अलींच्या आठवणी म्हणजे पक्ष्यांच्या आठवणी!’’ असे लेखकाने म्हटले आहे. कारण त्यांनी सारे जीवन त्यांच्या निरीक्षणासाठीच वाहिले होते. त्यातून त्यांच्या अभ्यासाची शिस्त निर्माण झाली होती. जीवनधारणा तयार झाली होती. ते म्हणायचे ः ‘‘पक्षिशास्त्र हे अनेक शास्त्रांचं शास्त्र आहे. पक्षितज्ज्ञांना वनस्पतिशास्त्र, तशीच कीटकशास्त्राची माहिती पाहिजे. त्याला वनं आणि वनाच्या प्रकारांविषयी ज्ञान हवं. भूगोलाचा अभ्यास हवा. रसायन आणि भौतिकशास्त्राचा परिचय पाहिजे. गणिताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इतर शास्त्रांप्रमाणं पक्षिशास्त्रालादेखील अंत नाही. ते नित्य नूतन आहे.’’ डॉ. सलीम अली यांच्या मृत्यूमुळे जी शोकभावना लेखकाच्या मनात दाटून आली तिला उद्गार देताना लेखकाने म्हटले आहे ः ‘‘डॉ. सलीम अली हे परमेश्‍वररूपी सुंदर पक्ष्याच्या गूढरम्य रूपाचा शोध आयुष्यभर घेत होते. कैलास व मानस सरोवराची म्हणजे पक्षितीर्थाची यात्रा करणारा हा युगपुरुष ह्या धरतीचा नव्हताच. त्यांचं नातं पक्ष्याप्रमाणं आभाळाशी होतं. म्हणूनच आता ते परमहंस गतीला मिळाले आहेत.’’
जी. ए. कुलकर्णी हे मराठी कथाविश्‍वातील महत्त्वाचे नाव. ‘जीए’ या नावाभोवती तेजस्वी वलय आहे. तेच शीर्षक घेऊन त्यांच्याशी झालेल्या पत्रव्यवहारातून मारुती चितमपल्लींनी त्यांचे अंतरंगदर्शन घडविले आहे. त्यांचे प्रगाढ वाचन, त्यांची अभिरुचिसंपन्नता, निसर्गाविषयीची त्यांची अपार ओढ, त्यांचे सृष्टिनिरीक्षण, मानवी जीवनशैलीविषयीची त्यांची निरीक्षणे आणि वाङ्‌मयीन संदर्भ या पत्रांत आढळतात. जी.एं.नी अनेक साहित्यिकांना पत्रे लिहिली. चितमपल्लींचे लेखन त्यांना भावलेले होते. त्यांच्या मानसप्रतिक्रियांना वाङ्‌मयीन दस्तऐवज म्हणून महत्त्व आहे. चितमपल्लींनी हे सारे वाग्धन उपलब्ध करून दिले आहे.
‘देवदूतांची पावलं’ हादेखील ‘शब्दांचं धन’मधील महत्त्वाचा ललित निबंध आहे. चितमपल्लींची शब्दशैली आणि आलमेलकरांची चित्रशैली यांची गळामिठी पडल्यामुळे त्यांच्या आशयाला उठाव मिळालेला आहे आणि अभिव्यक्तीला जिवंतपणा आलेला आहे. त्यांच्या निकट सहवासात वेचलेले समृद्ध क्षण लेखकाने तन्मयतेने रंगविले आहेत. चित्रकलेतील या तपस्वी व्यक्तीचे चित्र अनेक बारकाव्यांनिशी येथे चितमपल्लींनी रेखाटले आहे.
‘पक्षिशास्त्रज्ञ ऍरिस्टॉटल’ ही वेगळी ओळख आहे. ऍरिस्टॉटलचा अज्ञात पैलू येथे चितमपल्लींनी उलगडून दाखविला आहे. त्याचा ‘हिस्टरी नॅचरॅलिस’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. पक्ष्यांच्या हालचालींविषयी, स्थलांतराविषयी अत्यंत महत्त्वाच्या नोंदी त्याने केलेल्या आहेत. स्थलांतराच्या काळात पक्षी आपले रूप बदलतात असेही त्याचे मत होते.
‘चैतन्याच्या शोधात असलेली जॉय ऍडॅमसन’, ‘रजनीगंधा’, ‘सी शॉनगॉनचं पिलोबुक’, ‘हंसदेवाचं मृगपक्षिशास्त्र’, ‘जे कृष्णमूर्तींच्या रोजनिशी’, ‘बनगरवाडीतील निसर्ग’ आणि ‘बुद्धाज कोकोनट’ हे ललित निबंधांतील अनुभवविश्‍व मन समृद्ध करणारे आहेच, शिवाय आनंदानुभव देणारे आहे. वास्तविक यातील प्रत्येक ललित निबंधाचा स्वतंत्रपणे आस्वाद घ्यायला हवा.
‘लेखक येती घरा’ या ललित निबंधात अनेक व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. लेखक वनखात्यात कार्यरत असताना त्याचे वास्तव्य नवेगाव जलाशयाच्या सान्निध्यात होते. येथे अनेक लेखक- कवींचा सहवास त्याला त्या काळात लाभला. ख्यातनाम पत्रकार, सहित्यिक अनंत गोपाळ शेवडे, त्यांच्या सुविद्य पत्नी यमुनाताई, रा. भि. जोशी, सुधा जोशी, जयवंत दळवी, उमाकांत ठोमरे, रमेश मंत्री, सुभाष भेंडे, बाळ सामंत आणि ज्ञानेश्‍वर नाडकर्णी यांच्या भेटीच्या प्रसंगांचे चित्रण लेखकाने केलेले आहे. त्यांची झालेली भेट चितमपल्लींना लेखनप्रवासात फलदायी ठरली.
‘माझा ग्रंथखजिना’ या ललित निबंधात स्वतःचा ग्रंथसंग्रह आपण निगुतीने कसा वाढविला हे चितमपल्लींनी सांगितले आहे. मराठीबरोबरच बंगाली साहित्य वाचले. त्यासाठी बंगाली शिकून घेण्याचा प्रयत्न केला. मद्रास, म्हैसूर, बंगलोर, कोचीन आणि त्रावणकोर शहरांत त्यांची भ्रमंती होत असे. अनेक भाषांतील अक्षरवाङ्‌मय गोळा करण्याचा त्या काळात त्यांनी प्रयत्न केला. लेखन-वाचनाची ही प्रक्रिया समांतरपणे चाललेली होती. त्यामुळे त्यांना अभिरुचिसंपन्न होता आले. त्यांच्या लेखनाला नित्य नवे धुमारे फुटत राहिले. मारुती चितमपल्ली यांच्या चिंतनशीलतेचे सार ‘शब्दांचं धन’ या पुस्तकात समरसतेने साकार झाले आहे.