गोवा चित्रपटांचेही केंद्र बनावे ही सर्वांची इच्छा

0
334

>>आर्लेकर ः मराठी चित्रपट महोत्सवाचा समारोप

 

गोव्यात मराठी माणूस आणि मराठी मानस दोन्ही आहेत. गोव्यात मराठी मानसाला इथे मराठी चित्रपट संस्कृती रुजलेली हवी आहे. गोवा हे पर्यटन केंद्र आहेच, त्याचबरोबर चित्रपटाचेही केंद्र बनावे ही सर्वांची इच्छा आहे, असे मत पंचायत तथा पर्यावरण मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी येथे व्यक्त केले.
विन्सन वर्ल्ड आयोजित व पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स प्रस्तुत ९ व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात आर्लेकर हे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी सन्माननीय पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवसेनेचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, विन्सनचे संजय व श्रीपाद शेटये व्यासपीठावर उपस्थित होते. आर्लेकर म्हणाले सुरवातीला दोन वर्षे या चित्रपट महोत्सवाला उत्साहवर्धक प्रतिसाद नव्हता; परंतु शेटये बंधूनी जिद्दीने हा महोत्सव यशस्वी करून दाखविला आहे.
राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने यांना पदार्पणातच उत्कृष्ट दिग्दर्शनाचे राष्ट्रीय पारितोषिक मिळाल्याबद्दल व ‘एनिमी’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल दिग्दर्शक दिनेश भोसले यांचा यावेळी आर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समारोपाच्या ‘सायलन्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, निर्माते अर्पण होकानवाला व आश्‍विनी सिदवानी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
हा महोत्सव आता स्वीडनमध्ये
मराठी चित्रपट जोमाने फोफावतोय. परंतु त्याचे व्यासपीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर हवे व त्यासाठी अर्पण होकानवालांनी प्रयत्न केले आणि ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात तीन मराठी सिनेमा गेले व त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. आता, मराठी चित्रपट महोत्सव स्वीडनमध्ये भरविण्यासाठी विचारणा झाली आहे व ‘विन्सन’चा हा मराठी चित्रपट महोत्सव स्वीडनमध्ये होणार अशी घोषणा प्रतिभाशाली दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी यावेळी करताच रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. अहिरे म्हणाले ‘इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी…’ ही अनुभूती मी गोवा मराठी चित्रपट महोत्सवातून गेली नऊ वर्षे घेत आहे. या महोत्सवात सतत नऊही वर्षे माझे चित्रपट दाखविले गेले.

‘सायलन्स’ने यशाची शिखरे पार केली
अहिरे यांनी सांगितले की, ‘सायलन्स’ या वेगळ्या वाटेने जाणार्‍या मराठी चित्रपटाने यशाची अनेक शिखरे गाठली आहेत. तो आता जर्मन, फ्रेंच, रशियन, इंग्रजीसह जगातल्या सात महत्वाच्या भाषांमध्ये प्रदर्षित होणार आहे. त्यासाठी हॉलिवूडच्या कंपनीने पुढाकार घेतला आहे. वेगळ्या चित्रपटाची निर्मिती करून त्याचे निर्माता काय करू शकतो याचे हे उदाहरण आहे.
समारोप सोहळ्यात ‘कौल’ चित्रपटाचे राजेश सिंग व रोहित कोकाटे, पींडदानची निर्माती पुनम शेंडे, संजय सिव्हिया, प्रतिभा सिव्हिया, पल्लवी सुभाष, सुनील पडतरे, सचिन कुंडलकर, प्रसाद नामजोशी, सुहास भोसले, अक्षय इंडिगर, भारत गायकवाड, पुनर्वसु नाईक, शिवाजी पाटील, मीना नेरूरकर, योगेश जाधव, शशांक शेंडे, रवी शेवाळ, प्रज्ञा शेट्टी, रवी जाधव, विशाल इनामदार या चित्रपट क्षेत्रातील मंडळीचा सन्मान करण्यात आला. यंदाच्या कृतज्ञता पुरस्काराच्या मानकरी वर्षा उसगावकर याही व्यासपीठावर होत्या. त्यांचे श्रीपाद शेटये यांनी स्वागत केले. ललिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
ज्येष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना समारोप सोहळ्यात प्रारंभीच स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली.