रामपाल ते रामवृक्ष

0
105

मथुरेच्या जवाहरबाग प्रकरणाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जुन्या दिल्ली – आगरा महामार्गावरील या २८० एकरांच्या बड्या सरकारी भूखंडावर सत्याग्रहाच्या मिशाने तब्बल दोन वर्षे अतिक्रमण होऊनही प्रशासन गप्प कसे व का राहिले हा मूलभूत प्रश्न. दोन दिवसांच्या सत्याग्रहाच्या निमित्ताने रामवृक्ष यादव आणि त्याचे साथीदार या जवाहरबागेत घुसले आणि त्यांनी तेथे दोन वर्षांत आपले साम्राज्य उभे केले. या मंडळींना वीज कशी मिळाली? पाणी कसे मिळाले? शेकडो गॅस जोडण्या कशा मिळाल्या? त्यासाठी लागणारी सरकारी कागदपत्रे कशी मिळाली? उत्तर प्रदेशातील बड्या राजकारण्यांच्या वरदहस्ताविना हे सगळे एवढ्या सहजतेने घडणे पूर्णतः अशक्य होते. प्रशासनाला या सगळ्याची माहितीच नव्हती असे कसे म्हणावे? मथुरेच्या तहसिलदार कचेरीच्या, सत्र न्यायालयाच्या, पोलीस स्थानकाच्या भिंतींवर या मंडळींनी घोषणा रंगवलेल्या आहेत. स्थानिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. म्हणजेच राजकीय प्रभावामुळे प्रशासनाने या सार्‍या प्रकाराकडे आजवर अक्षम्य डोळेझाक केली. एकगठ्ठा मतांसाठी ही वस्ती येथे वाढू दिली गेली, परंतु येथे नुसतीच वस्ती वाढली नाही, तर एक जणू समांतर सत्ता उभी राहिली. या सत्तेची स्वतःची सेना होती, प्रशिक्षण केंद्रे होती, या देशात समांतर सरकार आणण्याची त्यांची घोषणा होती. नवे चलन आणण्याची मागणी होती. एका रुपयात साठ लीटर डिझेल आणि चाळीस लीटर पेट्रोल देण्याचे या माथेफिरूंचे अजब वायदे होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या नावाने हे सारे ‘क्रांतिकार्य’ सुरू होते. नेताजी सुभाषचंद्र बोसांविषयी या देशात एक निःस्सीम आदरभावना आहे. तिचा पुरेपूर फायदा रामवृक्ष यादव या महाभागाने उठवला. रामवृक्ष यादव याला हजारो अनुयायी कसे मिळाले या प्रश्नाचे उत्तरही सोपे आहे. उत्तर भारतात प्रस्थ असलेल्या जय गुरूदेव बाबाचा हा शिष्य. मथुरेला या बाबाचे संगमरवरी भव्य मंदिर आणि आश्रम आहे. चार वर्षांपूर्वी जय गुरूदेव निधन पावले, तेव्हा शेकडो कोटींची संपत्ती मागे राहिली. त्यांच्या अनुयायांमध्ये या मालमत्तेवरून तीन गट पडले. त्यातल्या एकाला त्या आश्रमाचा ताबा मिळाला. पण रामवृक्ष हा त्या बाबाचा एकेकाळचा शिष्य असल्याने त्यालाही अनुयायी होतेच. शिवाय आपल्या देशात भोळ्याभाबड्यांची कमी नाही. त्यांना धर्माचे वा क्रांतीचे गाजर दाखवून चिथावून नादाला लावणार्‍या भामट्यांचीही कमी नाही. त्यामुळे मथुरेच्या जवाहरबागेत अगदी प्रशासनाच्या डोळ्यांदेखत हे समांतर सत्ताकेंद्र उभे झाले. वेडगळ कल्पनांनी भारलेले हजारो खेडूत तेथे येऊन स्थायिक झाले. सर्वांच्या उदरनिर्वाहाची मोफत सोय होतीच. त्यासाठी या जमिनीत बटाट्याचे पीक लावले जात असे. ट्रॅक्टरमधून सर्वांसाठी तांदुळ आणि इतर साहित्य आणले जाई. सर्वांत गंभीर गोष्ट कोणती असेल तर या मंडळींनी शस्त्रास्त्रे गोळा केली. रायफली, हातबॉम्ब, पोलिसांच्या वापरातला दारूगोळा, सुरे, तलवारी यांच्या मदतीने जणू या देशाची सत्ता ताब्यात घेण्याचा त्यांचा इरादा होता. मथुरा – दिल्ली अंतर अवघे दीडशे किलोमीटर आहे हेही यासंदर्भात लक्षात घेण्याजोगे आहे. म्हणजे हा जो सारा प्रकार चालू होता त्याचे गांभीर्य उमगेल. अगदी राष्ट्रीय महामार्गावर हे घडले आणि तरीही प्रशासन स्वस्थ राहिले याचा सरळसरळ अर्थ उत्तर प्रदेशमधील प्रभावी राजकारण्यांचा या लोकांना वरदहस्त होता हाच होतो. दोन वर्षांपूर्वी दिल्लीजवळच्या हरयाणात रामपाल प्रकरण गाजले होते. त्याच्या सतलोक आश्रमात मथुरेसारखेच रणकंदन माजले होते. निष्पाप भक्तांची ढाल करून युद्ध लढले गेले होते. मथुरेत त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यात कित्येक निष्पाप माणसांचा बळी गेला. जवाहरबागेत रुजत चाललेल्या विषवल्लीकडे प्रशासनाचे वेळीच लक्ष गेले असते, तर हे प्रकरण इथवर पोहोचले नसते. परंतु सगळ्या गैरप्रकाराकडे कानाडोळा केला गेला. शेवटी न्यायालयाचे आदेश आले तेव्हा कुठे हे अतिक्रमण हटविण्याच्या हालचाली झाल्या. ते करीत असतानाही पूर्ण तयारीनिशी पोलीस गेले नाहीत. म्हणजे आत काय चालले आहे याची गंधवार्ता गुप्तचर विभागाला नव्हती. निष्काळजीपणाची ही हद्द आहे. धर्म आणि अध्यात्माच्या बुरख्याखाली वावरणार्‍या पंथांची आणि संस्थांची संख्या या देशात वाढत चालली आहे. धूर्त राजकारण्यांनी त्यांना आपल्या पंखांखाली घेतले आहे. गूढता आणि गोपनीयता यांचे वलय निर्माण करून त्याखाली आपल्या काळ्या कारवाया चालवणार्‍या या मंडळींवर वेळीच अंकुश आणला नाही तर आपल्या देशात एक दिवस अराजक माजल्याविना राहणार नाही हाच रामपालपासून रामवृक्षपर्यंतचा धडा आहे.