५० वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण येत्या दोन – तीन आठवड्यांत

0
67

>> कोरोनावरील २० लशी विविध टप्प्यांवर

कोरोनाचा मुकाबला करणार्‍या सुमारे २० लशी तयार होत असून वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांच्या स्तरांवर आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली. येत्या दोन – तीन आठवड्यांत ५० वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण सुरू केले जाईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
कोरोनावर मात करण्यासाठी अठरा ते वीस लशींची निर्मिती झालेली आहे. त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. काही वैद्यकपूर्व, काही वैद्यकीय तर काही त्याहीपुढील स्तरांवर आहेत असे हर्षवर्धन यांनी सांगितले. भारत इतर वीस ते पंचवीस देशांना कोरोनावरील लस पुरविणार असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली.
लशींबाबत पसरवल्या जाणार्‍या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ज्या लशींद्वारे लसीकरण केले जात आहे, त्या पूर्ण सुरक्षित असून देशातील १८८ जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याभरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.
जनतेने अजूनही कोरोना प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात. त्याला मी ‘सोशल व्हॅक्सीन’ म्हणतो असे हर्षवर्धन म्हणाले.

१५ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत देशात ८३ लाख आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण झाले असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी यावेळी दिली.
भारतात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक कोटी सहा लाख २१ हजार २२० असून त्यापैकी ७९.५ टक्के बरे झालेले रुग्ण सहा राज्यांतील असल्याचे आढळले आहे.

कोरोना लस घेणार्‍या बहुतेकांनी
दुसर्‍या डोसकडे पाठ फिरवली

केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या शनिवारी ७,६६८ जणांना कोरोना लशीचा दुसरा डोस देण्यात आला अशी माहिती भारत सरकारने जाहीर केली आहे, परंतु सोळा जानेवारीला या लशीचा पहिला डोस घेणार्‍यांच्या तुलनेत हे प्रमाण फक्त ४ टक्के आहे. १६ जानेवारी रोजी तब्बल १ लाख ९१ हजार आरोग्य कर्मचार्‍यांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. मात्र, आता पहिला डोस घेण्यासाठी येणार्‍या भारतीयांचे प्रमाणही कमी कमी होत चालले असल्याचे आढळून आले आहे. लशीचा पहिला डोस घेणारी बरीच मंडळी दुसरा डोस घ्यायला पुढे येत नसल्याचेही समोर आले आहे.

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन ह्या दोन लशी सध्या आरोग्य कर्मचार्‍यांना दिल्या जात आहेत. दोन डोस २८ दिवसांच्या अंतराने देणे आवश्यक आहे, परंतु भारतीय औषध नियंत्रकांनी चार ते सहा आठवड्यांत दुसरा डोस घेण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.