पालिका आरक्षणप्रश्‍नी २३ रोजी सुनावणी

0
80

>> ९ याचिका उच्च न्यायालयात दाखल

येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकांसाठीचे प्रभाग आरक्षण व प्रभागांची फेररचना याला आव्हान देणार्‍या ९ याचिका काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दाखल करून घेतल्या. यासंबंधीची सुनावणी खंडपीठाने येत्या २३ फेब्रुवारी रोजी मुक्रर केली आहे. या याचिकांद्वारे याचिकादारांनी प्रभाग आरक्षण, प्रभागांची फेररचना याबरोबरच नगरपालिका कायदा दुरूस्तीसही आव्हान दिले आहे.

या संदर्भात उच्च न्यायालयाने गोवा सरकार तसेच राज्य निवडणूक आयोगाला नोटिसा बजावल्या आहेत. वेगवेगळ्या व्यक्तींनी केलेल्या या याचिकांतून नगरपालिकांसाठीच्या निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षण तसेच प्रभागांची फेररचना करताना ती चुकीच्या निकषांवर करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पालिका प्रभागांचे आरक्षण व फेररचनेचे काम पूर्ण झाल्यानंतर हे आरक्षण तसेच फेररचना ही एकतर्फी तसेच गोंधळ निर्माण करणारी असून सत्ताधार्‍यांनी आपल्या फायद्यासाठी हा घोळ घातल्याचा आरोप विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर केला होता. नंतर सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त करीत, काही नेत्यांवर टीका केली होती. पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनीही त्याबाबत नाराजी व्यक्त करताना हे काम करताना आपणाला कुणीही विश्‍वासात घेतले नसल्याचे म्हटले होते, तर भाजप आमदार कार्लुस आल्मेदा यांनी सदर प्रश्‍नावरून नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांच्यावर टीका केली होती.