‘टूलकिट’ प्रकरणी पोलिसांच्या धडक कारवाईने खळबळ

0
69

गेल्या २६ जानेवारीला नवी दिल्लीत शेतकरी आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारास जबाबदार धरून दिल्ली पोलिसांनी आंदोलकांसाठी ‘टूलकीट’ पुरविणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध आघाडी उघडली आहे. निकीता जेकब व शंतनू ह्या दोन कार्यकर्त्यांनी ही ‘टूलकिट’ समाजमाध्यमांवर घातल्याचे आढळून आले असून त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

दिशा रवी ह्या सामाजिक कार्यकर्तीला शनिवारी अटक झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आपला तपास अधिक कडक करीत आणखी दोघा सामाजिक कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई सुरू केल्याने सरकारविरोधकांत त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ह्या तिन्ही सामाजिक कार्यकर्त्यांनी खलिस्तानवादी गटाशी संगनमत करूनच शेतकरी आंदोलनासाठी हे ‘टूलकिट’ तयार केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

स्वीडिश कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने सर्वप्रथम हे ‘टूलकिट’ समाजमाध्यमांवर जारी केले होते, त्यामुळे दिल्ली पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. खलिस्तानवाद्यांचे हे कटकारस्थान असल्याचा आरोप करण्यात येत आहे. टूलकिट तयार करणार्‍यांविरुद्ध त्याच दिवशी गुन्हा नोंदवला गेला असून ही कागदपत्रे तयार करणार्‍यांचे ईमेल पत्ते गुगलकडून मागवण्यात आले आहेत. तेव्हापासून पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे.

पोएटिक जस्टीस फाऊंडेशन ही खलिस्तानवादी संघटना ह्या टूलकिटमागे असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
शनिवारी अटक करण्यात आलेली दिशा रवी हिनेच ह्या टूलकिटमधील गुगल डॉक्युमेंट तयार केली होती व ती प्रमुख सूत्रधार आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. न्यायालयाने तिची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
दिशा रवी हिच्या अटकेबद्दल माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. प्रियांका गांधी वाड्रानेही ट्वीटरवरून निषेध दर्शवला आहे.