पुन्हा पित्रोदा

0
9

‘सॅम’ हे आधुनिक अमेरिकन नाव आणि त्याच देशाचे नागरिकत्व स्वीकारलेले सत्यनारायण गंगाराम पित्रोदा पुन्हा एकदा बरळले आहेत आणि त्यातून ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला त्यांनी पुन्हा अडचणीत आणले आहे. बेजबाबदार आणि बेफाम वक्तव्यांमुळे पित्रोदा आणि वाद हे जणू आता समीकरणच होऊन गेले आहे. त्यांनीच कालपरवा उकरून काढलेला वारसा कराचा आणि संपत्तीच्या फेरवाटपाचा वाद नुकताच कुठे शमत असताना पुन्हा एकदा त्यांनी वादाची राळ उडवून दिली आणि काँग्रेसला अडचणीत आणले. ‘भारताच्या पूर्वेकडील लोक चिन्यांसारखे आणि दक्षिणेतील लोक आफ्रिकनांसारखे दिसतात’ हे त्यांचे ताजे विधान पूर्णतः वर्णवर्चस्वाची छटा असलेले, आक्षेपार्ह आणि घृणास्पद आहे. भारतासारखा देश एवढी विविधता असून 75 वर्षे एकत्र नांदला हे त्यांना भले यातून सांगायचे असेल, परंतु त्यासाठी त्यांनी दिलेले उदाहरण अजबच म्हणायला हवे. काँग्रेसच्या प्रचारातील चुका शोधण्यासाठी टपून बसलेल्या भारतीय जनता पक्षाने त्वरित त्यांचे हे विधान उचलले आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील सभेमध्ये पित्रोदांचा खरपूस समाचार घेतला. ‘आता माणसाच्या त्वचेचा रंग त्याची क्षमता ठरवणार का’ असा खडा सवाल पंतप्रधानांनी पित्रोदांच्या विचित्र विधानाला अनुसरून केला, इतकेच नव्हे, तर स्टालीनचा द्रमुक पक्ष हे तर्कट स्वीकारणार का हे विचारायलाही ते विसरले नाहीत. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या व द्रविडी अस्मितेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या द्रमुकला पित्रोदांचे हे वक्तव्य जिव्हारी लागणारे ठरले आहे हे स्वाभाविक आहे. ईशान्येतील राज्यांमध्येही ह्या विधानाच्या प्रतिक्रिया उमटल्या आणि काँग्रेस पक्ष ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अडचणीत आला. पित्रोदांची सारी हयात काँग्रेसच्या वळचणीत गेली. आधी इंदिरा गांधी, मग राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांचे हे सल्लागार दूरसंचार क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून एकेकाळी नावाजले गेले होते जरूर, परंतु म्हणून प्रत्येक विषयावर वाट्टेल तशी वक्तव्ये करण्याचा मक्ता काही त्यांना पक्षाने दिलेला नाही. आपल्याला आठवत असेल, 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळीही पित्रोदांनी काँग्रेस पक्षाला असेच ऐनवेळी अडचणीत आणले होते. पुलवामानंतरच्या बालाकोटच्या कारवाईबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित करून त्यांनी भारतीय सुरक्षा दलांवरच शंका घेतली होती. पित्रोदा आणि वाद हे समीकरणच व्हावे एवढी बेताल वक्तव्ये ते सतत करीत आले आहेत असेच दिसते. राममंदिराच्या उभारणीला त्यांनी विरोध दर्शवला होता आणि गरीबांना लाभ मिळवून देण्यासाठी मध्यमवर्गाने आणखी कर भरले पाहिजेत असा अजब युक्तिवाद करून काँग्रेसच्या मध्यमवर्गीय मतदारांची नाराजीही ओढवून घेतली होती. 84 च्या शिखांविरुद्धच्या दंगलीसंदर्भात ‘अब क्या है 84 का’ असे विचारणारे आणि त्या घृणास्पद घटनेला आपल्या आणि पक्षाच्या लेखी काही महत्त्वच नाही असे सूचित करणारे पित्रोदा तेव्हाही वादग्रस्त ठरले होते. वारसा करासंदर्भात व संपत्तीच्या फेरवाटपासंदर्भात अमेरिकेतील कुठल्याशा कायद्याचा संदर्भ देत त्यांनी केलेली बेफाम विधाने तर ताजीच आहेत. काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर महिलांच्या गळ्यातली मंगळसूत्रेही ताब्यात घ्यायला मागेपुढे पाहणार नाही असा प्रतिवार भाजपने त्यांच्या वक्तव्यावर केला होता. एवढे झाल्यानंतर तरी शहाणपण यावे की नाही! पण आपल्या विचित्र विधानाने पित्रोदा यांनी देशवासीयांनाच अवमानीत केले आहे. आधीच आपल्या देशामध्ये प्रांताप्रांतांमध्ये संघर्ष पेटविण्याची षड्यंत्रे काही देशद्रोही शक्ती रचत असल्याचे दिसते. अचानक ईशान्य भारतीयांविरुद्ध सुरू झालेले हल्ले असोत किंवा हिंदी भाषेवरून उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये दुफळी निर्माण करण्याचे मध्यंतरी झालेले प्रयत्न असोत अशा गोष्टींतून निर्माण झालेली तेढ सांधण्याची नितांत आवश्यकता असताना ते तर दूरच, उलट भलत्यासलत्या विधानातून अशा प्रकारची तेढ अधिक ठळक करण्याचा हा जो काही प्रकार पित्रोदांनी केला तो मुळीच समर्थनीय नाही. खुद्द काँग्रेस पक्षाला हे विधान मानवले नाही आणि राजकीयदृष्ट्या तर ते परवडणारेही नाही. त्यामुळे परिणामी पित्रोदा महाशयांना गांधी कुटुंबाशी एवढी जवळीक असूनदेखील काँग्रेस पक्षाची विदेशस्थ शाखा असलेल्या इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचा राजीनामा द्यावा लागला. खरे तर हा राजीनामा येण्यापूर्वीच काँग्रेस पक्षाने त्यांच्या ह्या अत्यंत आक्षेपार्ह विधानावरून त्यांच्याशी फारकत घेत त्यांची वेळीच पक्षातून हकालपट्टी करणे आवश्यक होते. यापुढे तरी पक्षाने हे शहाणपण ठेवले पाहिजे. अन्यथा पित्रोदा बरळत राहतील आणि काँग्रेसला आपली बाजू सावरताना नाकी नऊ येत राहतील!