॥ घरकुल ॥ गुलुगुलू ते गुग्लुगुग्लू

0
73
  • प्रा. रमेश सप्रे

तंत्रज्ञानानं दिलेल्या साधनांमुळे जवळ असूनही दूर तसंच दूर असूनही जवळ असा अनुभव देण्याची सोय केली आहे. या साधनांचा राजा म्हणजे दुनिया मुठ्ठीमें करणारा मोबाइल! एकाच वेळी महावरदान नि महाशाप.

‘काय एवढ्या गुलुगुलू गोष्टी चालल्यायत राजाराणीच्या?’ विमलाबाईंच्या या प्रश्‍नानं त्यांची मुलगी नि जावईबापू दोघंही सावध झाले. शेणानं सारवलेल्या स्वच्छ अंगणात चटईवर बसून मंदमृदू आवाजात बोलत होते. दिवस थंडीचे अन् सकाळचं उबदार ऊन. पण खरी ऊब त्यांना त्या गुलुगुलू बोलण्यातूनच मिळत होती.

‘गुलुगुलू’ हा शब्दही किती गोड आहे – लॉलीपॉपसारखा! त्यात परस्परांना सुख देण्याची ओढ असते. एकमेकाचं हित साधण्याचाही प्रयत्न असतो. मुख्य म्हणजे ते मुळात सौम्य असल्यानं त्यात रागवणं, कठोर शब्द वापरणं, मन दुखावणं वगैरे काहीही नसतं. तसं पाहिलं तर अशा गुल्‌गुलीत बोलण्यात कुजबूज, चहाड्या चुगल्या, हल्लीच्या भाषेत गॉसिप् यांना स्थान नसतं. गुलुगुलू बोलताना बोलणार्‍यांचे चेहरे प्रसन्न असतात. मंद हास्याच्या लहरी हेलावत असतात. एकूण गुलुगुलू हा प्रकारच सुखद अनुभव देणारा असतो.
… खरं म्हणजे ‘असायचा’. असतो म्हटलं की तो आजही असायला हवा. पण – दुर्दैवानं तो काळाच्या ओघात अस्तंगत होऊ लागलाय असं म्हणणं योग्य ठरेल. याचं मुख्य कारण म्हणजे पूर्वी ज्या घरकुलात असं संभाषण चाले त्या घरकुलांची झाली घरं नि आता तर फ्लॅट्‌स् – ब्लॉक्स् – अपार्टमेंट्‌स! आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. अतिशय गतिमान झालेल्या जीवनात शांत बसून प्रसन्न मनानं बोलणं अपवादात्मक झालंय.
आता लोक बसतात ते खायला – ‘प्यायला’- पत्ते (म्हणजे जुगार) खेळायला. अशा प्रसंगी वादावादी, भांडणं, निंदानालस्ती याच गोष्टी प्रामुख्यानं आढळतात. घरातले हक्काचे आनंदानं झुळझुळणारे झरे जणू आटून गेलेत. सारेजण एकमेकाशी फक्त व्यवहार (ट्रॅन्झॅक्शन्स) करतात. अगदी अनौपचारिक वाटणार्‍या प्रसंगातसुद्धा.

उदाहरणच पहा ना. संध्याकाळचं एकत्र जेवण. आता असं एकत्र येऊन जेवणं छोट्या छोट्या कुटुंबातही दुर्मिळ झालंय. पण जर कधी टेबलावर जेवणासाठी जमली मंडळी तर आरंभीच्या खेळकर गप्पातून कधी वादाची ठिणगी उडेल सांगता येत नाही. विनोदी, हसत खेळत मारलेले टोमणे- प्रतिटोमणे यातून बोलण्याला जी खुमारी यायची ती उरलीच नाही. कारण सर्वांचेच अहंकार (इगो) नागाप्रमाणे फणकारलेले.

एखाद्या लहान मुलाच्या पाठीवर प्रेमानं हलकासा जरी हात लावला (धपाटा नव्हे!) तरी तो विचारतो, ‘काका, का मारलंत मला?’ हे ऐकून मग काकांचं पाठीवर शाबासकी देणंही थांबतं नि रुक्ष शाब्दिक व्यवहार सुरू होतो – ‘कॉंग्रॅट्‌स! ऑसम्! अमेझिंग!’ या शब्दांचं स्पेलिंगही फार थोड्यांना माहीत असतं.

बहिणी-बहिणीत (असल्या तर!), मैत्रिणी – मैत्रिणीत, (निदान नवथर) पतिपत्नीत, अगदी ‘तो आणि ती’त म्हणजे पूर्वीचे प्रियकर- प्रेयसी नि हल्लीचे बॉयफ्रेंड – गर्लफ्रेंड (म्हणजेच बीएफ- जीएफ!) असं समोरासमोर (फेस् टु फेस्) बोलणंही नाहीसं झालंय. जेवणाच्या टेबलावरही एस्‌एम्‌एस् करणारी पिढी आता पक्की रुजलीय. इथंच तर कळीचा मुद्दा आहे. तंत्रज्ञानानं दिलेल्या साधनांमुळे जवळ असूनही दूर तसंच दूर असूनही जवळ असा अनुभव देण्याची सोय केली आहे. या साधनांचा राजा म्हणजे दुनिया मुठ्ठीमें करणारा मोबाइल! एकाच वेळी महावरदान नि महाशाप.
त्या दिवशी ते वाक्य ऐकून चक्रावलोच. ‘आता आपण थोडं गुग्लू या.’ गुलुगुलू माहीत होतं, मध्यंतरी एका गाजलेल्या गाण्यामुळे ‘इलू – इलू’ (आय लव्ह यू) हेही कळलं होतं. पण हे गुग्लू गुग्लू काय होतं? विचारल्यावर कळलं की आता ‘गुगल’वर जाऊ या. गुगल अर्थातच व्हॉट्‌सऍप, ट्विटर, इन्स्टाग्रॅम इ.चा प्रतिनिधी.

तसं पाहिलं तर गुगल हे अक्षय माहिती (ज्ञान नव्हे, ते माहितीवरून आपण बनवायचं) असलेलं माध्यम आहे. विश्‍वकोश, ज्ञानकोश (एनसायक्लोपीडिया) यातील माहिती त्या मानानं मर्यादितच असते. या गुगलचे सेवेचे अनेक पैलू आहेत. त्यातला एक आहे ‘चॅटिंग’. इतर सर्व समाजमाध्यमं अशा गप्पांसाठी वापरली जातातच. आपण गुगल म्हटलंय कारण त्या दोघींनी उद्गारलेले ते शब्द – ‘आपण आता गुग्लूया’.
समोरासमोर केलेल्या संभाषणाला किंवा संवादाला असा तांत्रिक पर्याय मिळाला की भावना आटू लागतात नि कृत्रिम भाव सुरू होतात. एक प्रकारचा पवित्रा (पोझ) घेऊन बोलावं लागतं. या म्हणजे यस् तसंच मधूनमधून ‘अरे यार’ असं सर्वांना म्हणावं लागतं. अगदी व्हिडियो कॉल असेल तरी मोबाइल, लॅपटॉप यांचा पडदा (स्क्रीन) गरम होतो पण बोलण्यातली ऊब काही जाणवत नाही. खरं तर त्याची गरजही वाटत नाही.

आता तर सगळंच ऑनलाइन्! एका चिमुरडीला विचारलं, ‘शाळेतील बाईंची आठवण येते का?’ उत्तर – ‘नाही, आम्ही ऑनलाइन बोलतो की!’ ‘मित्रमैत्रिणींची आठवण येते?’ उत्तर – ‘नाही, आम्ही एस्‌एम्‌एस् करतो की!’ नंतर विचारलं मला तुला ‘चॉकलेट किंवा लॉलीपॉप द्यायचाय. तो ऑनलाइन किंवा एस्‌एम्‌एस्‌मधून दिला तर चालेल ना?’ उत्तर – ‘नाही नाही नाही, तो कसा चालेल? तो हातातच द्यायला नको का?’ – यातून काय दिसतं? व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्या नाहीत तरी चालतील, पण वस्तू मात्र प्रत्यक्षच मिळायला हव्यात. असो.
या गुग्लुगुग्लूतून जवळीक निर्माण होण्याऐवजी काहीसा दुरावाच निर्माण होतो. गुलुगुलूतून जवळची माणसं अधिक जवळ येत होती. इतकी की हृदयाची, श्‍वासांची ऊब एकमेकांना देऊ शकत होती. आपण २३७ गुग्लूया, नि १७ गुलुगुलूया. म्हणजे दिवसातून तासभर – सलग जरी नाही तरी एकूण – निरनिराळ्या व्यक्तींशी गुलुगुलू बोलूया. प्रेमानं, आपुलकीनं, आत्मियतेनं.