निवडणूक काळात 16 कोटींचा मुद्देमाल जप्त

0
6

>> 4.6 कोटींची रोख रक्कम

>> 3 कोटींच्या मौल्यवान वस्तू अन्‌‍ 3.43 कोटींचे मद्य जप्त

16 मार्च 22 एप्रिल या लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात विविध तपास यंत्रणांनी राज्यात सुमारे 16 कोटी 65 लाख 52 हजार 572 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काल दिली.
राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईत रोख रक्कम, अमलीपदार्थ, मद्य, सोने-चांदी यांच्याबरोबरच मौल्यवान वस्तू आणि मोफत वाटण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचाही समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर 16 मार्च ते 22 एप्रिल या काळात सरकारच्या खात्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामध्ये रेल्वे पोलीस, एनसीबी, सीमा शुल्क, अबकारी खाते, पोलीस खाते, आयकर आणि व्यावसायिक कर विभाग यांचा समावेश आहे.

यामध्ये आयकर विभागाने 4.6 कोटींची रोख रक्कम आणि 3.03 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तू जप्त केले आहेत. अबकारी खात्याने 3.43 कोटी किमतीचे 62 हजार 949 लीटर मद्य जप्त केले आहे, अशी माहिती निवडणूक कार्यालयाने दिली.