श्रावणोत्सव

0
80
  • दीपा जयंत मिरींगकर

श्रावणातील नारळी पौर्णिमा म्हणजे बहीणभाऊ या नात्याचा उत्सव आणि वर्षातून एकदा केले जाणारे वरुण पूजन आणि चवीने खाणार्‍या लोकांसाठी तो असतो नारळाच्या पदार्थांचा उत्सव.

  ‘भरजरी ग पीतांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण’

श्रीकृष्णाच्या बोटाला झालेली जखम पाहून त्याच्या मानलेल्या बहिणीने म्हणजे द्रौपदीने आपला पीतांबर फाडून त्याची चिंधी बांधली. त्याच्या बहिणी राजवाड्यात चिंधी शोधीत होत्या. एवढ्या मोठ्या श्रीमंत भरलेल्या घरात चिंधी कुठेच मिळत नव्हती. द्रौपदीने मात्र ती पर्वा केली नाही. आपला रेशमी शालू फाडून त्या बोटाला बांधली. याचीच आठवण भाऊ आणि बहीण या नात्यात नेहमीच येते. म्हणूनच श्रीकृष्णाने तिला आपली प्रिय भगिनी मानले. तिच्यावर वस्त्र हरणाचा प्रसंग गुजरला तेव्हा तिच्या हाकेसरशी तिचा कृष्ण सखा धावून आला. तिचे लज्जारक्षण केले. भारतीय संस्कृतीत भाऊ आणि बहीण या नात्याला एक वेगळा गोडवा आहे. अलीकडे गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, इतिहासातील राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रासहित राखी काय… या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम. एकमेकांना जोडणारा असा हा सण इतर कोणत्याही धर्मात संस्कृतीत नाही. सामाजिक ऐक्याची भावना जागृत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे सण खूप महत्त्वाचे ठरतात. रक्ताच्या नात्याव्यतिरिक्त आपल्या मनाप्रमाणे नाती जोडण्यास ह्या सणामुळे समाजास वाव मिळतो. ज्या समाजात अशा प्रकारची एकरूपता, ऐक्य असते असा समाज सामर्थ्यशाली बनतो हाच या राखी पौर्णिमेचा संदेश आहे.

  हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चॉकलेट, बिस्किटाच्या वाटण्यांसाठी ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा मोठे झाल्यावर परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात. इंटरनेटमुळे अगदी विदेशातील भाऊबहीण एकमेकांना विडियो द्वारा भेटतात, ही आपली सोशल मिडियाची सकारात्मक बाजू. इतिहासकाळापासून बहिणीने भावाला राखी बांधण्याची पद्धत रूढ झाली. चितोडची राणी कर्मावती हिने विशिष्ट मदतीच्या अपेक्षेने मोगल बादशहा हुमायून यास भाऊ मानून राखी पाठविली होती.

  स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:’ जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सन्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टिकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या, बहिणीच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे. आजच्या भोगवादी, चंगळवादी संस्कृतीत या पवित्र नात्याची आवश्यकता वाटू लागली आहे. आजकाल गोव्यात मुलींच्या संदर्भात ऐकू येणार्‍या अनेक वाईट बातम्या पाहून या सणाची महती आणखी वाढली आहे. 

   गेली कित्येक वर्षे काही भगिनी आपली राखी आणि खाऊ सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचे संरक्षण करणार्‍या अनामिक सैनिकांसाठी पाठवतात. यात दिसते ती सामाजिक दृष्टी. कारण हे भाऊ पूर्ण भारताची रक्षा करतात. राजस्थान सीमेवरील रखरखीत वाळवंट, आसाम मेघालय मधील धुव्वाधार पाऊस, आणि सियाचीनसारख्या भागातील उणे तापमानाची थंडी याचा सामना करीत राहणारे आमचे शूर जवान म्हणजे पुर्‍या भारतमातेचे सुपुत्र. त्यांना राखी पाठवणार्‍या भगिनी आणि त्यांच्या भावना खरेच कौतुकास्पद. आपल्या संस्कृतीचे मोठेपण या छोट्या छोट्या पण अर्थपूर्ण गोष्टीतून जाणवते. ही राखी पाहून जवानांना किती आनंद होत असेल याची कल्पना आपण करू शकतो. 

उत्तर भारतात ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतात ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा केला जातो. काही दशकांपूर्वी केवळ उत्तर भारतात होणारे रक्षाबंधन आता पूर्ण भारतात आनंदाने साजरे होते. ‘पिठापूर’ ज्या स्थानाला ‘पादगया’ या नावे ओळखतात. गोदावरी नदीच्या तिरी असलेल्या आंध्र प्रदेशातील श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जन्मस्थानी राखी पौर्णिमेला मोठा समारोह असतो. तिथे असलेल्या औदुंबराला भक्तगण प्रतीकात्मक राखी बांधतात. यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. आपल्याला श्रावण पौर्णिमेला राखी जो कोणी बांधेल त्याच्या इच्छा पूर्ण होतील अशी कहाणी त्यांच्या चरित्रात वाचायला मिळते. म्हणूनच या पौर्णिमेला श्रीपाद श्रीवल्लभ यांचे भक्त सार्‍या भारतातून त्या तीर्थस्थळी येतात.

ही पौर्णिमा ‘पोवती पौर्णिमा’ म्हणूनही ओळखली जाते. कारण त्या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्रीपुरुष धारण करतात. श्रावणीच्या विधीनंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू केली जाते. श्रावणी पौर्णिमेच्या दिवशी जानवे बदलण्याची प्राचीन वैदिक परंपरा आहे. या हिंदू परंपरेत श्रावणी हा धार्मिक संस्कारविधी सांगितलेला आहे. आजही वैदिक धर्म पाळणार्‍या बर्‍याच घरांमध्ये श्रावणी पौर्णिमा ही तिथी पुरुषांसाठी यज्ञोपवीत बदलण्याची तिथी म्हणून पाळली जाते.

  याच दिवशी आपण समुद्र, नदी यांची पूजा करतो. पृथ्वी, वायू, तेज, आकाश, जल या पंचमहाभूतांतील एक महत्त्वाचे तत्त्व म्हणजे जल तत्त्व. पाण्यामुळेच जीवन असते म्हणूनच पाण्याचे दुसरे नाव जीवन आहे. समुद्रावर रोजीरोटी अवलंबून असणारे मच्छीमार बंधुभगिनी यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आहे. नारळीपौर्णिमेच्या बर्‍याच अगोदर कोळी बांधवांनी समुद्रात जाणे थांबवले असते. एकतर तो काळ माश्यांच्या प्रजननाचा काळ समजला जातो आणि दुसरे म्हणजे पावसाळा असल्याने समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे कोळी बांधव त्या दरम्यान समुद्रात जात नाहीत. साधारणपणे पाऊस सुरू झाला की खोल समुद्रात जायला शासकीय नियमानुसार बंदी असते, पण अगदी जुन्या काळातही या काळात मासेमारी करीत नसत. त्यामुळे आता काम सुरू करणार, आवक सुरू होणार याचा आनंद या दिवशी असतो. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. ‘सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा..आणि आपल्या संस्कृतीत कृतज्ञतेला खूप महत्त्व आहे. सागराबद्दल कृतज्ञतेची भावना ही या श्रीफळ अर्पण करण्यामागे असते. खोबर्‍याच्या करंज्यांचा नैवेद्य दाखवतात, सागराला अर्पण करतात.

   कोळी बांधव आपापल्या बोटी रंगरंगोटी करून सजवितात. बोटींना पताका लावून सुशोभित केल्या जातात. बोटींची पुजा करून त्यांना मासेमारीकरता समुद्रात लोटतात. कोळी स्त्रिया सागराला प्रार्थना करतात. ‘आमच्या बोटीवर वर्षभर भरपूर मासोळी गावुदे (सापडू दे), समुद्रात माझा घरधनी येईल त्यावेळी त्याचे रक्षण कर. कोणतेही संकट नको येऊ देऊ’. कोळी लोक उत्सव प्रिय आणि अगदी दिलखुलासपणे तो मनापासून साजरा करणारे. त्यामुळे या जलपूजनानंतर नाच, गाणी याला बहर येतो. स्त्रिया भरजरी कपडे घालून पारंपरिक नृत्य करतात. या गाण्यातून समुद्राची स्तुती, एकमेकांची चेष्टा मस्करी असते. 

  नारळी पौर्णिमेला पक्वान्न म्हणजे भरपूर नारळाचा वापर करून केलेला नारळी भात किंवा करंजी, खोबर्‍याच्या वड्या. तुपावर तांदूळ भाजून त्याचा भात, त्यात गूळ घालून काजूगर, वेलची आणि नारळाचे दूध घालून केलेला नारळी भात केवळ याच दिवशी ताटात असतो. एकूणच काय नारळी पौर्णिमा म्हणजे बहीणभाऊ या नात्याचा उत्सव आणि वर्षातून एकदा केले जाणारे वरुण पूजन आणि चवीने खाणार्‍या लोकांसाठी तो असतो नारळाच्या पदार्थांचा उत्सव.