हॉस्पिसियू इस्पितळाची गॅलरी कोसळल्याने महिला जखमी

0
104

येथील हॉस्पिसियु हॉस्पिटलचा छप्पराचा भाग व पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग काल दुपारी अचानक कोसळून खाली पडला व तो उपचारासाठी आलेल्या फातोर्डा येथील रिझयाना शेख (३०) या महिलेवर कोसळल्याने ती जखमी झाली. त्यावेळी तिच्याशिवाय तेथे अन्य कोणी नव्हते.
ही घटना काल दु. २ वाजण्याच्या सुमारास घडली. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी ही तीन मजली इमारत बांधली होती व त्या इमारतीत रुग्ण बाह्य विभाग व रुग्णाच्या खाटा, वॉर्ड आहेत. कित्येक वर्षांपासून या इमारतीची दुरुस्ती, नूतनीकरण न केल्याने इमारत कोसळण्याची भीती बांधकाम खात्याने व्यक्त केली होती. काल गॅलरीचा एक भाग व छप्पराचा भाग अचानक कोसळला. पावसाचे पाणी झिरपून आतील सळ्या बाहेर आल्या आहेत. तसेच शौचालयाचा भाग कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात सर्व खाटा रुग्णांनी भरलेल्या असून कालच्या दुर्घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांत भीती निर्माण झालीआहे. तात्काळ दुरुस्ती न केल्यास आणखी भाग कोसळू शकतो, असे लोकांचे म्हणणे आहे. काल रात्री उशिरापर्यंत रुग्णांचे नातेवाईक रुग्णांना अन्यत्र नेण्याच्या तयारीत होते.