जमावाकडून पोलीस अधिकार्‍याची ठेचून हत्या

0
122

>> कर्तव्य बजावताना मशिदीबाहेर निर्घृण हल्ला ः मुख्यमंत्री मेहबुबांकडून निषेध

एका धक्कादायक व अमानुष घटनेत गुरुवारी मध्यरात्री १२ वा. च्या सुमारास येथून जवळच असलेल्या नौहट्टा येथील मशीदीबाहेर माथेफिरुंच्या जमावाने तेथे सुरक्षा व्यवस्थेवर असलेले पोलीस उपअधीक्षक महमंद अयुब पंडित यांची ठेचून हत्या केली. राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून लोकांनी पोलिसांच्या संयमाचा अंत पाहू नये असे वक्तव्य केले आहे. या घटनेनंतर नजीकच्या पोलीस क्षेत्रांच्या हद्दीत संचारबंदी जारी करण्यात आली. राज्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तिसर्‍या आरोपीचीही ओळख पटली असल्याची माहिती दिली.
ही घटना त्यावेळी उपअधीक्षक पंडित हे पोलीस गणवेशात नव्हते. यावेळी स्थानिकांचा एक जमाव दगडफेक करत असताना पंडित त्याचे चित्रिकरण करत होते असा एक आरोप आहे. जमाव त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी चाल करून गेल्याने पंडित यांनी स्वसंरक्षणार्थ सर्व्हिस पिस्तुलातून गोळीबार केला. अशी माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. या गोळीबारात तिघेजण जखमी झाल्यानंतर मोठ्या संख्येने असलेल्या लोकांनी पंडित यांना पकडून त्यांना नग्न करून दगडांनी ठेचून त्यांची हत्या केली.
या घटनेसदर्ंभात जम्मू-काश्मीर पोलिसांनी एक निवेदन पुढीलप्रमाणे प्रसिद्ध केले आहे, ‘कर्तव्य बजावीत असताना आणखी एका पोलीस अधिकार्‍याने बलिदान केले. पोलीस उपअधीक्षक महमद अयुब पंडित यांची नौहट्टा येथे काल रात्री जमावाने ठेचून हत्या केली.’ हत्येच्या घटनेनंतर अयुब यांचा मृतदेह ओळख पटविण्यासाठी व अन्य कायदेशीर प्रक्रियांसाठी पोलीस नियंत्रण कक्षात ठेवण्यात आला. या घटनेनंतर शहरात स्थिती तणावपूर्ण बनली. यामुळे सावधगिरी म्हणून प्रशासनाने सात पोलीस स्थानकांच्या क्षेत्रांत संचारबंदी जारी केली.

मुख्यमंत्री मेहबुबांकडून कठोर शब्दात निषेध
राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुवा मुफ्ती पंडित यांच्या हत्येचा कडक शब्दात निषेध केला आहे. यासारखी दुसरी शरमेची गोष्ट असूच शकत नाही. लोक जर असे करू लागले तर पोलिसांचा संयम सुटेल आणि पुन्हा लोकांना पोलिसांची जीप पाहून पळ काढावा लागेल असे त्या म्हणाल्या. लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की पोलीस त्यांच्याच सुरक्षेसाठी तैनात केलेले असतात. राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनीही या हत्येचा तीव्र निषेध केला. दरम्यान, राज्याचे पोलीस महासंचालक एसपी वैद्य यांनी हत्येस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. लोकांना सेवा बजावणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची हत्या केली हे अत्यंत दुर्दैवी व दुःखदायक आहे असे ते म्हणाले.