घोळशी मासळीवर खवय्यांच्या उड्या!

0
104

>> मच्छीमारी खात्याने केली ७०० किलोंची विक्री

मच्छीमारी खात्याने काल अवघ्या दोन तासात घोळशी या जातीच्या ७०० किलो मासळीची विक्री केली. खात्याने जुने गोवे येथील आपल्या फार्ममध्ये वरील मासळी उत्पादन केले असून काल सुमारे ७०० किलो मासळी पणजीतील आपल्या कार्यालयाजवळ विक्रीसाठी आणली होती. खात्याने त्यासंबंधीची माहिती गुरुवारच्या दैनिकांतून दिल्याने काल सकाळी १० वाजल्यापासून मासळी खवय्यांनी ती खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. २०० रु. प्रती किलो या दराने ही ७०० किलो मासळी विकण्यात आली.
काल सकाळी १०.३० वा. ही मासळी विक्रीसाठी आणण्यात आली असता लोकांनी रांगेत उभे राहून ही मासळी खरेदी केली.
मच्छिमारी खात्याने आठ महिन्यांपूर्वी आंध्रप्रदेशातून या मासळीची बियाणी आणली होती. त्याद्वारे आठ महिन्यांच्या काळात ७०० किलो एवढ्या मासळीचे पीक मिळाल्याचे मच्छीमारी खात्याच्या संचालक डॉ. शामिला मोंतेरो यांनी सांगितले. घोळशी जातीच्या मासळीचे चांगले पीक घेणे कसे शक्य आहे व त्याद्वारे कसे चांगले उत्पन्नही मिळू शकते हे मच्छीमारांना पटवून देण्यासाठी मच्छीमारी खात्याने हे पीक घेतल्याचे त्या म्हणाल्या. मासळी वाढून एक किलोची होण्यास आठ महिन्यांचा अवधी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
जुने गोवे येथील फार्ममधून आणखी ५०० किलो एवढी घोळशी मासळी मिळणार असल्याचे डॉ. मोंतेरो यांनी सांगितले.
चापोली धरणात बासा मासळी
मच्छीमारी खात्याने मच्छीमारांना काणकोण चापोली येथील धरणात ‘बासा’ जातीच्या मासळीचे पीक घेण्यास मदत केल्याने या धरणात सदर मासळीची बियाणी सोडण्यात आलेली असून त्याद्वारे सुमारे १०० टन एवढी बासा मासळी मिळणार आहे. ज्यांनी हे पीक घेतले आहे. त्या मच्छीमारांच्या गटाचा त्या मासळी पीकावर मालकी हक्क असेल, असे मोंतेरो म्हणाल्या.
खेकड्यांचे पीक घेण्यास प्रशिक्षण
राज्यातील मच्छीमारांनी खेकड्यांचे पीक घ्यावे यासाठी त्यांना मच्छीमारी खात्याने तीन वेळा प्रशिक्षण दिल्याचे त्या म्हणाल्या. स्वतः खात्याने खेकड्यांचे ४०० किलो एवढे पीक मिळवल्याचे त्या म्हणाल्या.