हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारवरील संकट टळले

0
4

>> ‘क्रॉस व्होटिंग’मुळे आले होते अल्पमतात; 15 भाजप आमदारांच्या निलंबनानंतर दिलासा

हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्यामुळे राजकीय नाट्य पाहायला मिळत असून, हिमाचलमधील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आल्याची चर्चाही होती; मात्र काल विधानसभा अधिवेशनादरम्यान गोंधळ घालणाऱ्या 15 भाजप आमदारांवर निलंबनाची कारवाई झाल्याने काँग्रेस सरकारवरील संकट तूर्त टळले आहे. परिणामी पुढील तीन महिने आता सरकारला कोणताही धोका नाही.

राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा भाजपच्या हर्ष महाजन यांनी पराभव केला. हिमाचलमध्ये काँग्रेसचा विजय स्पष्ट होता; परंतु तरीही 6 काँग्रेस आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे भाजपच्या उमेदवाराला सर्वाधिक मते मिळाल्याने काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला.

काल सकाळी हिमाचल भाजपने सरकार अल्पमतात आल्याचा दावा करत राज्यपालांची भेट घेऊन बहुमत चाचणीची मागणी केली. कालपासून हिमाचलचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी मतविभागणीची मागणी केली आणि गोंधळ घातला. त्यानंतर भाजपच्या 15 आमदारांवर विधानसभेत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. परिणामी 6 आमदारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे अल्पमतात आलेल्या काँग्रेस सरकारवरील संकट तूर्त तरी टळले आहे. यादरम्यान मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी काँग्रेसवर आरोप करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 9 तासांनंतर तो मागेही घेतला.

दुसऱ्या बाजूला राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष कुलदीपसिंग पठानिया यांनी आपला निर्णय राखून
ठेवला आहे.