दाबोळी विमानतळावरील प्रवाशांत 15 टक्क्यांनी घट

0
11

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा दाबोळी विमानतळावरील प्रवाशांची संख्या 15 ते 20 टक्क्यांनी कमी झाली आहे, अशी माहिती काल दाबोळी विमानतळाचे संचालक धनंजय राव यांनी दिली.
गेल्या आर्थिक वर्षी दाबोळी विमानतळावरील प्रवाशांची संख्या ही 84 लाख एवढी होती; मात्र यावर्षी त्यात घट झाली असून यंदा दाबोळी विमानतळावरील प्रवाशांची संख्या ही 70 लाख एवढीच राहिली. ही घट सुमारे 15 ते 20 टक्के एवढी असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.

दोन नव्या ठिकाणाहून येणाऱ्या विमान कंपन्यांची विमाने लवकरच आता दाबोळी विमानतळाशी जोडली जाणार आहे; मात्र कतार एअरवेजने या विमानतळावरील आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतलेला असून, त्यांची विमाने जूनपासून या विमानतळावर उतरणे बंद होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कतार एअरवेजने स्वतःला मोपशी जोडण्याचा निर्णय घेतलेला असून, तो त्यांचा निर्णय आहे व त्याबाबत आम्ही काही करू शकत नाहीत, असे राव यांनी स्पष्ट केले.

कतार एअरवेजने घेतलेल्या या निर्णयामुळे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ चालवणाऱ्या जीएमआर ह्या कंपनीचा फायदा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या जून महिन्यापासून कतार एअरवेज मोपा विमानतळाशी जोडली जाणार आहे. ओमान एअर, एअर इंडिया व इंडिगो या विमान कंपन्या यापूर्वीच मोपा विमानतळाशी जोडली गेली आहेत, अशी माहिती देखील राव यांनी दिली.