हरमलमधील अपघातात युवक-युवती ठार

0
88

हरमल येथे काल मोटरसायकल व टेंम्पो यांच्यात अपघात होऊन परीक्षीत भालचंद्र शेट्ये (२८, मेणकुरे) व दीपा चंद्रकांत महाले (२४, उगवे) हे दोघे जण ठार झाले. पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टेम्पो क्र. जीए ०३ टी ५८११ व मोटरसायकल जीए ०४ डी ४०८४ ही दोन्ही वाहने एकाच बाजूने हरमलमार्गे पालये येथे जात असता हरमल पठारावर दोन्ही वाहनांमध्ये टक्कर होऊन मोटरसायकलस्वार परिक्षित यांचा जागीच मृत्यू झाला तर दीपा महाले यांना उपचारासाठी नेताना मृत्यू आला. टेम्पो चालक कल्पेश भिवा भगत (न्हायगीणवाडा पार्से) याला पेडणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजयकुमार चोडणकर पुढील तपास करीत आहे. दुचाकीस्वार टेम्पोला ओव्हर टेक करत असताना समोरून कुत्रा आल्याने त्याने गाडी टेम्पोच्या बाजूने नेली असताना टेम्पोच्या चाकाला धडक बसून मोटरसायकल रस्त्यावर पडली.
मेणकुरेत शोककळा
रात्रपाळीवर कामाला गेलेला परिक्षित (शैलेश) भालचंद्र शेट्ये हा मेणकुरे येथील युवक सकाळी घरी आला आणि कामानिमित्त बाहेर जातो व दुपारी जेवायला येतो म्हणून सांगून गेला तो आलाच नाही. काळाने त्याच्यावर घाला घातला व हरमल येथे आलेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने मेणकुरे गावावर शोककळा पसरली आहे.