पणजीचे सर्व उमेदवार गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेले

0
88

पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार्‍या चार उमेदवारांपैकी एकाचीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसल्याचे काल ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ने राज्य समन्वयक भास्कर असोल्डेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो तसेच अपक्ष उमेदवार समीर केळेकर व सदानंद वायंगणकर या चारही उमेदवारांपैकी एकावरही कसल्याच गुन्ह्याची नोंद नसल्याचे असोल्डेकर यांनी स्पष्ट केले.
या चार उमेदवारांपैकी तीन उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत. पैकी समीर केळेकर यांनी डॉक्टरेट पदवी मिळवलेली असून ती त्यांनी माहिती तंत्रज्ञानात मिळवली असल्याचे ते म्हणाले. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे अभियांत्रिकी पदवीधर असून शिवाय त्यांनी वकिलीचे शिक्षणही पूर्ण केलेले आहे. कॉंग्रेसचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो हे मात्र उच्च विद्याविभूषित नसून त्यांचे शिक्षण केवळ बारावी एवढे आहे. बी.ए.च्या पहिल्या वर्गासाठी त्यांनी प्रवेश घेतला होता. पण ते शिक्षण त्यांनी पूर्ण केले नसल्याचे असोल्डेकर यांनी सांगितले.
कुणाकडे किती मालमत्ता
या सर्व उमेदवारांपैकी सर्वांत श्रीमंत आहेत ते सर्वांत कमी शिकलेले सुरेंद्र फुर्तादो हेच. त्यांची मालमत्ता ७ कोटी ९४ लाख ५३ हजार रु. एवढी आहे. त्यापैकी २ कोटी ४८ लाख ५३ हजार ही जंगम तर ५ कोटी ४६ लाख रु. एवढी स्थावर मालमत्ता आहे.
श्री. कुकळ्येकर यांच्याकडे ३ कोटी ४१ लाख ३० हजार रु. एवढी मालमत्ता असून त्यापैकी १ कोटी ५६ लाख ५३ हजार रु. एवढी जंगम व १ कोटी ८४ लाख ७७ हजार रु. एवढी स्थावर मालमत्ता आहे. समीर केळेकर यांची १ कोटी ४४ लाख ७७ हजार एवढी मालमत्ता आहे. पैकी १ कोटी ४४ लाख २० हजार एवढी जंगम तर ५६ हजार एवढी स्थावर मालमत्ता आहे. तर सदानंद वायंगणकर यांची मालमत्ता ९० लाख ७६ हजार एवढी आहे. पैकी १८ लाख ७१ हजार एवढी जंगम तर ७२ लाख एवढी स्थावर मालमत्ता आहे, अशी माहिती श्री. असोल्डेकर यांनी दिली.