हत्येचे कारण सांगा

0
133

मडगाव येथील सराफाच्या दिवसाढवळ्या अत्यंत निर्घृणपणे झालेल्या हत्येचा तपास तत्परतेने लावून चार आरोपींना जेरबंद करण्यात आतापर्यंत पोलिसांना यश आले आहे. मात्र, ही हत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी झाली त्याचा उलगडा अजूनही झालेला नाही किंवा पोलिसांकडून जनतेपुढे केला गेलेला दिसत नाही. पत्रकारांना पोलिसांकडून या तपासकामाची अधिकृतरीत्या माहिती का दिली जात नाही हे कळायला मार्ग नाही. जेव्हा अधिकृतरीत्या माहिती दिली जात नसते, तेव्हा अनधिकृतपणे माहिती मिळवण्याचा अट्टाहास केला जातो आणि त्यातून मग विपर्यस्त माहितीही बाहेर येऊ शकते आणि तपासकामाची दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे पोलीस यंत्रणेने आपल्या तपासकामाबाबत पारदर्शकता बाळगत पुढील तपासकामात अडसर ठरू शकणार नाही एवढी योग्य माहिती प्रसारमाध्यमांना वेळोवेळी पुरवणे गरजेचे असते. या हत्या प्रकरणात सपशेल गोपनीयता न बाळगता सामान्य तपासकामाची प्रगती नियमितरीत्या सांगितली गेली पाहिजेे, कारण या घडीस संपूर्ण राज्याचे या हत्या प्रकरणाच्या तपासाकडे लक्ष आहे.
सदर सराफाची हत्या ही चोरीच्या उद्देशाने झाली असे सुरवातीला सांगितले गेले तरी एकूण घटनाक्रम पाहता हे एवढे सरळसोट प्रकरण नाही हे प्रथमपासूनच लक्षात येत होते. अद्याप त्यामागचे कारण जरी उघड झालेले नसले तरी देखील निव्वळ चोरीच्या उद्देशाने हा खून झाला नाही हे एव्हाना पुरेसे स्पष्ट झाले आहे. केवळ चोरीसाठीच हल्ला झाला असता तर दुकानातील ऐवज पळवण्याचा प्रयत्न झाला असता. तसे काही यात घडलेले नाही.
या हत्येच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आतापर्यंत समोर आलेल्या आहेत, त्यापैकी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे हा हल्ला अत्यंत पूर्वनियोजित स्वरूपाचा होता. सदर सराफाच्या दुकानाबाहेर चोरीची जीप नेऊन उभी करणे, पळून जाण्यासाठी आधी दुचाकी नेऊन ठेवणे, परिसराची संपूर्ण रेकी करून पलायनाचा मार्ग आधीच सुनिश्‍चित करणे हे सगळे पाहिले तर अत्यंत पूर्वनियोजनपूर्वक हा हल्ला झाला असे दिसते. या हल्ल्याचा बेत तब्बल सहा महिने आधीच रचला गेला होता असेही एक अनुमान काढण्यात येते आहे. हल्ल्यामध्ये गावठी पिस्तुलाचा वापर झाला व ते आरोपीने बिहारी व्यक्तीकडून मिळवले. लॉकडाऊननंतर बिहारमध्ये जाऊन हे गावठी पिस्तुल आणले गेले अशी माहिती समोर येते आहे. म्हणजे एवढा प्रदीर्घ काळ ज्या अर्थी ह्या हल्ल्याचे पूर्वनियोजन चालले होते, ते पाहाता त्यामागचे कारणही तेवढेच मोठे असले पाहिजे.
दुसरी मोठी गोष्ट या घटनेसंदर्भात लक्षात येते ती म्हणजे सदर सराफ आणि हल्ल्यातील मुख्य आरोपी यांची पूर्वीची ओळख होती असे दिसते. त्यातूनच त्यांच्यात बाचाबाची झाली, नंतर गोळी झाडली गेली आणि सपासप वार झाले. म्हणजे कोणत्या तरी गोष्टीचा सूड उगवण्याचा हेतू या हल्ल्यामागे असावा असे अनुमान काढता येते. आता हे कारण नेमके कोणते हे शोधणे हे पोलिसांचे काम आहे. असे पूर्वनियोजित हल्ले होतात तेव्हा त्यामागे पूर्ववैमनस्य, आर्थिक वा मालमत्ताविषयक व्यवहार, खंडणी, चोरीच्या दागिन्यांची खरेदी, व्यावसायिक वैमनस्य अशा कारणांपैकी एखादे कारण असते. प्रस्तुत हत्या प्रकरणामध्ये या वैमनस्यामागचे नेमके कारण कोणते हे उजेडात आलेले नाही, परंतु हल्लेखोर नवखे नाहीत. ते सराईत गुन्हेगार आहेत आणि सांताक्रुझच्या कुख्यात टोळीचा भाग आहेत. त्यामुळे हल्ला त्यांनी स्वतःहून केला की कोणाच्या सांगण्यावरून केला हेही प्रश्न उपस्थित होतात. स्वतःहून हल्ला केला असेल तर सदर सराफ आणि या आरोपींदरम्यान जानपहचान कशी व का होती, त्यांच्यात आर्थिक देवघेवीचा काही वाद होता का असे प्रश्न उद्भवतात. पोलिसांनी ज्या अर्थी या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या चारही आरोपींना अटक केलेली आहे, त्या अर्थी या हल्ल्याचे कारण त्यांना एव्हाना निश्‍चित कळलेले असेल. मग ते जाहीर का केले जात नाही? सत्ताधारी पक्षाशी संबंधित महिला नेत्याच्या पुत्राचे हे प्रकरण असल्यामुळे काही गोष्टींची लपवाछपवी पोलिसांकडून केली जात नाही ना, असाही प्रश्न विचारला जातो आहे. जनतेच्या या शंकेचे निराकरण झाले पाहिजे. या हत्या प्रकरणाचे नेमके कारण जनतेपुढे आलेच पाहिजे. जनतेला नानाविध वावड्या उडवण्याची संधी न देता पोलिसांनी यासंदर्भात झालेले तपासकाम जनतेपुढे ठेवावे. शेवटी जनतेमध्ये पोलिसांप्रती विश्वास निर्माण होण्याची आत्यंतिक गरज आहे. अन्यथा नाना शंका कुशंका व्यक्त करून पोलिसांप्रती अकारण अविश्वास निर्माण केला जाऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्थेप्रती आदराची भावना निर्माण होण्यासाठी पोलिसांनी पारदर्शकता बाळगणे अत्यावश्यक आहे!