चेतन चौहान कालवश

0
246
  • सुधाकर नाईक

भारताचे माजी सलामीवीर तथा उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चौहान यांचे ‘कोरोना’मुळे नुकतेच निधन झाले. चौहान ‘कोरोना पॉझिटिव्ह’ ठरल्याने त्यांना ‘एसजीपीजीआय’मध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या १६ ऑगस्ट रोजी त्यांची इहलोकीची यात्रा संपुष्टात आली.

भारताचे माजी सलामीवीर तथा उत्तर प्रदेशचे केबिनेटमंत्री चेतन चौहान (७३) यांचे नुकतेच ‘कोरोना व्हायरस’मुळे निधन झाले. ‘लिटल मास्टर’ सुनिल गावस्करचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील यशस्वी सलामीवीर जोडीदार तथा राजकारणातही आपले खणखणीत नाणे सिद्ध केलेले चेतन चौहान यांना गेल्या ११ जुलै रोजी ‘कोरोना पॉझिटिव्ह’ ठरल्याने ‘एसजीपीजीआय’मध्ये दाखल करण्यात आले होते. इस्पितळात उपचारांदरम्यान त्यांना ‘किडनी’ तसेच ‘ब्लडप्रेशर’च्या समस्यांनी ग्रासले. १५ रोजी त्यांना गुरुग्राममधील मेदांता इस्पितळात हलविण्यात आले होते. गेल्या १६ ऑगस्ट रोजी त्यांची इहलोकीची यात्रा संपुष्टात आली.

२१ जुलै १९४७ रोजी बरैली येथे जन्मलेले चेतन चौहान यांचे वडील आर्मी ऑफिसर होते. त्यांची नेमणूक पुण्यात झाल्याने चेतनजींचे शालेय तथा महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. १९६६-६७ मध्ये त्यानी इंटरझोनल विझी कप स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. नंतर रणजी तसेच दुलीप करंडकातही त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि स्थानिक क्रिकेटमधील प्रभावी कामगिरीवर १९६९-७० मध्ये राष्ट्रीय संघात स्थान मिळविले. ४० कसोटी आणि ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या चौहान यांना प्रारंभिक काळात राष्ट्रीय संघातील स्थान टिकविण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. १९६९ मध्ये न्यूझिलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलेल्या चौहान यांना दोन कसोटीनंतर वगळण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी पुनरागमन केले पण कामगिरी प्रभावी न ठरल्याने पुन्हा संघाबाहेर गेले. त्यानंतर त्यांना तीन वर्षे पुनरागमनाची प्रतीक्षा करावी लागली. रणजीमधील प्रभावी कामगिरीवर इंग्लंडविरुद्ध त्यांनी परत संघात स्थान मिळविले पण दोन कसोटीतील अपयशामुळे वगळण्यात आले. १९७६-७७ मधील मोसमात चौहान यांनी दमदार खेळीत जबडा दुखापतीनंतरही हरयानाविरुद्ध दीडशतक, पंजाबविरुद्ध द्विशतक, कर्नाटकविरुद्ध शतक तसेच दुलीप करंडक स्पर्धेंतही चमकदार कामगिरी नोंदवीत ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील भारतीय संघात स्थान मिळविले.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरील पहिल्याच सामन्यात चेतनजीनी व्हिक्टोरियाविरुद्ध संयत, एकाग्रचित्त खेळीत केवळ २ चौकारांसह १५७ धावा नोंदल्या. पर्थमधील दुसर्‍या कसोटीत त्यांना भारतीय संघात स्थान मिळाले आणि आपले कौशल्य प्रगटविताना पहिल्या डावात त्यांनी जिगरबाज ८८ धावा केल्या. या एकाग्रचित्त, धीरोदात्त खेळीपासून ते सुनिल गावस्करचे नियमित सलामीवीरसाथी बनले आणि कसोटी निवृत्तीपर्यंत- केवळ एक सामना वगळता- एकत्रितपणे खेळले. गावस्कर आणि चौहान जोडीने भारताची यशस्वी सलामीवीर जोडी म्हणून नामना प्राप्त केली. उभयतांनी १० शतकी सलामीसह ५३.७५ च्या सरासरीने तीन हजारहून अधिक धावांची भागी केली. भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही दीर्घकाळ टिकलेली यशस्वी सलामीवीर जोडी होय. उभयतांनी ६० कसोटी डावांत ३,१२७ धावांची भागी केली. अकरा शतकी भागी नोंदल्या, पैकी १० सलामीवीर साथी म्हणून होत्या. १९७९ मध्ये चेतन-सुनिल जोडीने इंग्लंडविरुद्ध शानदार सलामी नोंदताना, चौथ्या डावातील ३४८ धावांच्या उद्दिष्टाच्या पाठलागात भारताला दमदार प्रारंभ करून देताना २१३ धावांची भागी केली. सामना सन्मान्यजनकरीत्या अनिर्णित राहिला पण केवळ ९ धावांनी भारताचा विजय हुकला.

१९८०-८१ मधील ऑस्ट्रेलिया दौर्‍यात चौहान यांनी तीन कसोटीत २४९ धावा केल्या. ऍडिलेड कसोटीत केवळ तीन धावांनी शतक हुकलेल्या चौहान यांना तीन अंकी धावा कारकिर्दीत कधीच नोंदता आल्या नाहीत. दशकभराच्या कसोटी कारकिर्दीत पाच वेळा ८०चा टप्पा तथा तीन वेळा नव्वदी पार केलेल्या चौहान यांना शतकाने मात्र सतत हुलकावणीच दिली. ४० कसोटीत २,०८४ धावा नोंदलेले चौहान हे विनाशतक दोन हजार धावा नोंदलेले पहिले कसोटीपटू होत. (ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्ननेही नंतर १९९२ ते २००७ या आपल्या १४५ कसोटींच्या कारकिर्दीत विनाशतक ३,१५४ धावा नोंदल्या.) महाराष्ट्र आणि दिल्लीचे स्थानिक क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलेल्या चौहान यांनी १७९ प्रथम श्रेणी सामन्यांत २१ शतके आणि ५९ अर्धशतकांसह ११,१४३ धावा नोंल्या. २७७ ही त्यांची प्रथम श्रेणीतील सर्वोच्च धावसंख्या होय. ४० कसोटीत २,०८४ धावा नोंदलेल्या चौहान यांनी ७ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत १५३ धावा नोंदल्या. ४६ ही त्यांची वन-डेमधील सर्वोत्तम खेळी! १९८१ मधील न्यूझिलंड दौरा चौहान यांचा अखेरचा ठरला. मालिकेत केवळ एकदाच अर्धशतक ओलांडता आलेल्या चौहान यांना नंतर संघाबाहेर जावे लागले. १९८५ मध्ये मुंबईविरुद्धची रणजी अंतिम लढत हा त्यांचा अखेरचा फर्स्टक्लास सामना ठरला. बोटाच्या दुखापतीनंतरही त्यांनी अनुक्रमे ९५ आणि ५४ धावा केल्या.

अर्जुन पुरस्कार विजेत्या चेतन चौहान यांनी नंतर भारतीय संघाचे व्यवस्थापकपदही भूषविले. ऑस्ट्रेलियामधील ‘मंकीगेट’ उपाख्यानात हरभजनचा बचाव करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.
क्रिकेटनंतर ते समाजकार्यातही भाग घेऊ लागले आणि १९९१ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर अमरोहा येथून लोकसभा निवडणूक जिंकले. पुढील निवडणुकीत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. पण १९९८ मध्ये भाजपाच्याच तिकिटावर पुन्हा एकदा खासदार बनले. १९९९ आणि २००४ मधील निवडणुकांत त्यांना मतदारराजाचा कौल लाभला नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते अमरोहा जिल्ह्यातील नौगांवा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक जिंकले आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारात कॅबिनेट मंत्री बनले. क्रीडा आणि युवा कल्याण संचालनालय तसेच सैनिक कल्याण, होमगार्डस, नागरिक सुरक्षा मंत्रालयाचा कार्यभारही त्यांच्याकडे होता.

‘कोरोना व्हायरस’ने जगभरात माजविलेला हाहा:कार अजूनही आटोक्यात आलेला नसून लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत. कमलाराणी वरूण (६२) यांच्यानंतर ‘कोविड-१९’मुळे मृत्युमुखी पडलेले चौहान हे उत्तर प्रदेशचे दुसरे मंत्री होत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच समाजकारण आणि राजकारणातही आपला ठसा उमटविलेले चेतन चौहान यांना विनम्र श्रद्धांजली!