जुने गोवे येथील एका खासगी इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या एका विदेशी महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर व्ही. दोशी (रा. सोलापूर-महाराष्ट्र) याला जुने गोवे पोलिसांनी काल अटक केली. दरम्यान, इस्पितळाच्या व्यवस्थापनाने त्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला सेवेतून निलंबित केले आहे.
खासगी इस्पितळामध्ये विदेशी महिलेच्या विनयभंगाची घटना गेल्या 31 ऑगस्ट 2025 रोजी घडली होती. या प्रकरणी पीडित विदेशी माहिलेच्या बहिणीने 10 सप्टेंबर रोजी जुने गोवे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
जुने गोवेतील एका खासगी इस्पितळामध्ये विदेशी महिलेच्या विनयभंग प्रकरणामुळे खळबळ माजली होती. या घटनेनंतर संशयित प्रशिक्षणार्थी डॉक्टराने पलायन केले होते. या घटनेबाबत तक्रार दाखल होताच जुने गोवे पोलिसांच्या एका खास पथकाने त्या संशयित डॉक्टरला सांगली येथून ताब्यात घेण्यात यश मिळविले.
इस्पितळाच्या अतिदक्षता विभागात विनयभंगाची गंभीर घटना घडल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या इस्पितळाच्या व्यवस्थापकीय समितीने त्या डॉक्टराला सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर विदेशी महिला अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, तिला आवश्यक मदत दिली जाईल, असे व्यवस्थापनाने म्हटले आहे.