चतुर्थी काळात चांगला प्रतिसाद लाभल्याने निर्णय; प्रेमेंद्र शेट यांची माहिती
गोवा फलोत्पादन महामंडळाच्या गणेश चतुर्थी काळातील नारळ विक्रीला भरघोस प्रतिसाद लाभल्याने आता मंडळाच्या भाजी विक्री केंद्रावरून नारळ विक्री नियमितपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गोवा फलोत्पादन महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रेमेंद्र शेट यांनी एका बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
राज्यात नारळाच्या उत्पादनात विविध कारणांमुळे घट झाल्याने दरांत मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना नारळ खरेदीमध्ये दिलासा देण्यासाठी चतुर्थीच्या काळात फलोत्पादन केंद्रात सवलतीच्या दरात नारळ विक्रीचा उपक्रम राबविण्यात आला होता. कर्नाटकातून नारळाची खरेदी करून राज्यभरातील भाजी विक्री केंद्रावरून सवलतीच्या दरात नारळ विक्री केली. साधारणपणे एक लाखांच्या आसपास नारळाची विक्री झाली, असेही प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले. सहकारी संस्था, बचत गटांना नियमितपणे भाजीपाला, नारळ यांचा पुरवठा हवा असतो. त्या संस्थांना महिना सुमारे 3 ते 4 हजार नारळांची गरज भासते. त्यामुळे महामंडळाने परराज्यातून नारळ आणून कायमस्वरूपी विक्रीचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या गरजेनुसार नारळ आणून त्याची विक्री केली जाणार आहे. नारळाच्या विक्रीमधून नफा मिळविण्याचा मंडळाचा उद्देश नाही, तर नागरिकांना स्वस्त दरात नारळ देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.