बिट्स पिलानी महाविद्यालयाच्या वसतिगृहात पाच नव्हे, तर सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. या प्रकरणी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनावर गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी देखील आलेमाव यांनी केली. सहा मृत्यूंपैकी एका विद्यार्थ्याचे मृत्यू प्रकरण महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने दडपल्याचा आरोप आलेमाव यांनी केला.
मृत विद्यार्थी ऋषी नायर याच्यावरील केलेल्या रेनडॉक्स चाचणीमध्ये ‘एक्स्टसी’, ‘एमडीएमए’ व ‘एमफेटामाइन्स’ या अमलीपदार्थांचे अंश सापडल्याच्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांनी या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आलेमाव यांनी केली आहे. गेल्या 18 महिन्यांत या महाविद्यालयाच्या वसतिगृहात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याचा दावा आलेमाव यांनी केला. या सर्व मृत्यू प्रकरणांची सखोल चौकशी व्हायला हवी. तसेच ऋषी नायर याच्यावर झालेल्या रेनडॉक्स चाचणीमध्ये अमलीपदार्थांचे अंश सापडलेले असून ही बाब गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोलपणे गोवा पोलिसांनी तपास करावा, अशी मागणीही आलेमाव यांनी केली.
गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी विद्यार्थी मृत्यू प्रकरणांच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. गोवा सरकार तसेच बिट्स पिलानीच्या व्यवस्थापनाने न्यायालयीन चौकशीची मागणी येत्या 15 दिवसांत मान्य केली नाही, तर राज्यव्यापी आंदोलन छेडू, असा इशारा पाटकर यांनी दिला आहे.
मागील 10 महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू होणे हे धक्कादायक आहे, असे पाटकर यांनी म्हटले आहे. मृत विद्यार्थी ऋषी नायर याच्या उलटीत अमलीपदार्थांचे अंश सापडले आहेत ही बाब गंभीर आहे. महाविद्यालयाच्या आवारात अमलीपदार्थ कोठून आले याची चौकशी होण्याची गरज पाटकर यांनी व्यक्त केली.
रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार वीरेश बोरकर यांनीही महाविद्यालयाच्या आवारात अमलीपदार्थ कोठून आले याची चौकशी करण्याची मागणी केली.
बिट्स पिलानी महाविद्यालयात शिकणाऱ्या ऋषी नायर या बंगळुरू येथील विद्यार्थ्याचा 4 सप्टेंबर 2025 रोजी महाविद्यालयाच्या वसतिगृहात मृत्यू झाला होता. डिसेंबर 2024 पासून बिट्स पिलानी महाविद्यालयाच्या वसतिगृहात पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने तो वादाचा विषय झालेला आहे.
ऋषी नायर याच्यावरील शवचिकित्सा अहवालात त्याचा मृत्यू हा त्याने आरोग्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. मात्र, त्यानंतर त्याच्या उलटीची तपासणी केली असता त्याने काही औषधे, तसेच अमलीपदार्थांचे सेवन केले असावे व झोपेत आलेली उलटी घशात अडकल्याने त्याचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला होता. गेल्या 10 महिन्यात बिट्स पिलानी महाविद्यालयाच्या वसतिगृहात ऋषी नायरसह पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने तो चिंतेचा विषय ठरलेला आहे.
ऋषी नायरच्या मृत्यू प्रकरणी तपास सुरू : मुख्यमंत्री
बिट्स पिलानी महाविद्यालयाच्या वसतिगृहात ऋषी नायर या विद्यार्थ्याचा जो मृत्यू झाला, त्या प्रकरणी तपासकाम चालू आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांनी त्यांना त्याबाबत विचारले दिली. मात्र, या प्रश्नी अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.