स्वेच्छा निवृत्ती योजनेवर कदंब कर्मचार्‍यांचा अभ्यासाअंती निर्णय

0
150

कामगार संघटनेचे नेते ज्योकीम फर्नांडिस यांची माहिती
कदंब महामंडळाने कर्मचार्‍यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना आणली असली तरी ती स्वीकारायची की नाही याचा निर्णय कामगार संघटना योग्य अभ्यासानंतरच घेणार असल्याचे कदंब महामंडळाच्या कामगार संघटनेचे नेते ज्योकीम फर्नांडिस यांनी काल सांगितले.महामंडळातील चालक, वाहक, मॅकनिक यांच्यासाठी खात्याने ही स्वेच्छा निवृत्ती योजना आणली आहे. दरम्यान, महामंडळातील काही चालक व कंडक्टर्स शारिरीकदृष्ट्या कामासाठी अनफिट बनलेले असून अशा लोकांसाठी ही योजना फायद्याची ठरू शकेल. काही चालकांना वाढत्या वयामुळे काम झेपत नाही. अपघातामुळे काही जणांची प्रकृती खालावलेली आहे, असे फर्नांडिस म्हणाले. स्वेच्छा निवृत्ती स्वीकारण्याजोगी असेल तर वरील ड्रायव्हर्स, कंडक्टर्स व मॅकॅनिक्स यांना तिचा चांगला लाभ मिळू शकेल, असे ते म्हणाले. स्वेच्छा निवृत्तीसाठीचा अभ्यास करण्यासाठी एक समितीही महामंडळाने स्थापन केली आहे.
दरम्यान, महामंडळातील रोजंदारीवरील ज्या ड्रायव्हर्स, कंडक्टर्स व मॅकॅनिक्स यानी सेवेत पाच वर्षे पूर्ण केलेली आहेत त्यांना सेवेत कायम केले जावे अशी मागणी कामगार संघटनेने हल्लीच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेऊन केली असल्याचे ज्योकीम फर्नांडिस यांनी सांगितले. महामंडळात गेल्या पाच वर्षांपासून रोजंदारीवर काम करणारे सुमारे ७५ चालक, २५ कंडक्टर्स व २८ मॅकॅनिक असल्याचे ते म्हणाले.
सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे चार हप्ते अजून महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मिळायचे असून ते लवकर देण्यात यावेत; तसेच महामंडळाच्या कर्मचार्‍यांना न देण्यात आलेला सुवर्ण जयंती बोनस देण्यात यावा. तसेच अद्याप वितरित न केलेला वार्षिक बोनसही देण्यात यावा अशी मागणी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्याकडे केली असल्याचे ते म्हणाले.