मोप जनसुनावणीवेळी झालेल्या हल्ल्याकडे जिल्हाधिकार्‍यांचे दुर्लक्ष

0
77

मोपाविरोधी संघटनेचे निमंत्रक फा. रिबेलो यांचा आरोप
नियोजित मोपा विमानतळासाठी रविवारी घेतलेल्या पर्यावरणविषयक जनसुनावणीवेळी मोप समर्थकांनी मोपाविरोधी संघटनेचे कार्यकर्ते सिद्धार्थ कारापूरकर यांच्या डोक्यावर हत्याराने प्रहार करून जखमी करण्याची घटना घडली होती. मात्र, पोलीस व जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले असून संबंधितांवर कोणतीच कारवाई केली नसल्याने मोपाविरोधी संघटनेचे निमंत्रक फा. एरमीन रिबेलो यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पर्यावरण अहवालावर सखोल अभ्यास केलेले श्री. कारापूरकर यांच्यावर सुनावणी संपविण्याची तयारी चालू असताना सुनावणी दरम्यान आलेले मुद्दे योग्य प्रकारे नोंद केले नसल्याबद्दल ते जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून देतेवेळी प्रहार करण्यात आला. गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी व्हिडिओ चित्रीकरण बंद करण्यास भाग पाडले व गुन्हेगारांना अभय दिले असा आरोप फा. रिबेलो यांनी केला आहे. रविवारी झालेली सुनावणी नसून तो एक तमाशा होता. पर्यावरणविषयक अहवालावरच सुनावणी असल्याने उपस्थितांना त्याच विषयावर बोलू देण्यास सांगायला हवे होते; पण भलत्याच विषयावर भाषणे झोडून मूळ विषयाला बगल देण्यात आल्याचा आरोपही फा. रिबेलो यांनी केला आहे.