बोडगेश्‍वर मंदिराचे कार्यालय अज्ञात चोरट्यांनी फोडले

0
133

८० हजार रुपयांवर चोरट्यांचा डल्ला
म्हापशातील प्रसिध्द श्री देव बोडगेश्‍वर मंदिराच्या कार्यालयाच्या पुढील दाराची कडी व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून आतील टेबलाच्या खणातील ८० हजार रुपये चोरल्याची तक्रार देवस्थानचे मुखत्यार नरेश तिवरेकर यांनी म्हापसा पोलिसात दिली आहे. ही चोरी काल पहाटे झाली.
या देवस्थानचे कारभारी सागर मांगले हे नेहमीप्रमाणे कार्यालयात आले, त्यावेळी त्यांना दाराची कडी उघडी असल्याचे दिसले. त्यावर त्यांनी तेथे साफसफाई करणार्‍या महिलेकडे विचारपूस केली तेव्हा तिने आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले. त्यावर भांगले हे आत गेले असता ते बसत असलेल्या टेबलाचा खण चोरट्यांनी फोडून आतील ८० हजार रुपयांची रोकड व काही पेपर लंपास केल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी याच कार्यालयात असलेली इतर सर्व कपाटे उघडून आतमध्ये काही मिळते काय याचीही पहाणी केली. हे करत असताना कपाटातील माल अस्ताव्यस्त स्थितीत त्यांनी पसरविला तसेच कार्यालयातील आणखी एक खोली होती तीही फोडून त्यांनी पहाणी केली पण त्यांना काहीही मिळाले नाही. या चोरीची माहिती म्हापसा पोलिसांनी देवस्थान कार्यकारीणीचे मुखत्यार नरेश तिवरेकर यांनी दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक स्टॅन्डली गोम्स यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली व पंचनामा केला.