>> प्रा. दिलीप बेतकेकर यांचे प्रतिपादन
>> वेलिंगकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सत्कार
प्रा. सुभाष भास्कर वेलिंगकर यांचे जीवन कर्तृत्व अलौकिक असून ते योद्धा शिक्षक आहेत. राष्ट्रभक्त, स्वाभिमानी पिढीच्या निर्मितीसाठी सदैव कार्यरत आहेत. त्यांचे समाजासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न बाळगता निरपेक्ष, समर्पित भावनेने कार्य सुरू आहे. समाजासाठी कार्य करणार्या व्यक्तीची समाजाकडून नेहमीच दखल घेतली जाते. वेलिंगकर यांच्या कार्याची पावती म्हणून अमृत महोत्सवानिमित्त जाहीर सन्मान केला जात आहे, असे प्रतिपादन प्रा. दिलीप बेतकीकर यांनी काल वेलिंगकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त वेर्णा येथील श्री महालसा मंदिराच्या सभागृहात आयोजित सत्कार सोहळ्यात बोलताना केले.
पूज्य दुर्गानंद गिरी स्वामी यांच्या हस्ते सुभाष वेलिंगकर यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पू. मुकुंदराज महाराज, सत्कार समितीचे अध्यक्ष प्रा. माधव कामत, देविदास सराफ, अनिल खंवटे, राजू सुकेरकर व इतरांची उपस्थिती होती.
श्री. वेलिंगकर यांनी सामाजिक कार्याला नेहमीच प्राधान्य दिले. शिक्षक म्हणून कार्य करताना राष्ट्रप्रेमी युवा पिढीसाठी सातत्याने प्रयत्न केला. राष्ट्रप्रेमी युवा पिढी निर्माण करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकाची नोकरी सोडून ग्रामीण भागातील विद्यालयात शिक्षक म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी अनेक कार्यकर्ते, माणसे घडविली. त्यांनी व्यक्तिगत जीवन, कुटुंबाकडे जास्त लक्ष दिले नाही. राष्ट्रहिताला प्राधान्य दिले. सुभाष वेलिंगकर यांनी जाज्वल्य, राष्ट्रप्रेमी, निर्व्यसनी, गुणसंपन्न समाज निर्मितीसाठी कार्य केले आणि करीत आहेत. त्यांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात समक्ष नेतृत्व गाजविताना दिसत आहेत, असे प्रा. माधव कामत यांनी सांगितले.
वेलिंगकर यांनी निर्भिड वृत्ती, तत्त्वांकडे कधी तडजोड केली नाही. शिक्षण, समाजकारण, सांस्कृतिक क्षेत्रांत त्यांनी मोठे योगदान दिले आहे. तथापि, भाषा माध्यम प्रश्नात अजूनपर्यंत यश प्राप्त झाले नाही. त्याला राजकारण जबाबदार आहे. राज्य सरकारने वेलिंगकर यांच्या कार्याची दखल घेऊन माध्यम प्रश्न सोडवावा, अशी मागणी प्रा. कामत यांनी केली.
राष्ट्रनिष्ठ समाज निर्माणाच्या कार्यात सर्व धर्माच्या सज्जन, प्रतिष्ठित लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आधुनिक युगाची आव्हाने पेलणार्या सक्षम, राष्ट्रनिष्ठ आणि स्वाभिमानी युवा पिढीच्या निर्मितीचे कार्य सुरूच राहणार आहे, असे मनोगत प्रा. वेलिंगकर यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
समाजातील सर्व नागरिकांचे सहकार्य लाभल्याने समाजासाठी कार्य करू शकलो. आपला सत्कार हा कार्यात योगदान देणार्या सर्वांचा सत्कार आहे. आपण केवळ एक प्रतिनिधी आहे, असेही वेलिंगकर यांनी सांगितले.
‘कर्मयोगी’ ग्रंथाचे प्रकाशन
प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या जीवन कार्याची माहिती देणार्या ‘कर्मयोगी’ या ग्रंथाचे प्रकाशन पूज्य दुर्गानंद गिरी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद भगत यांनी केली. प्रा. वेलिंगकर यांना राष्ट्र, समाजकार्यासाठी साहाय्य करणार्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला कुंडई येथील तपोभूमीेचे पीठाधीश प. पू. ब्रह्मेशानंद स्वामी विदेश दौर्यावर असल्याने उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी व्हिडिओच्या संदेशाच्या माध्यमातून वेलिंगकर यांच्या कार्याची स्तुती करून शुभेच्छा दिल्या.