अनेक वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जपानला भेट दिली. जपानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे शिंजो अबे यांच्याकडे असताना मोदींनी जपान दौरा केला होता. त्यानंतर आता विद्यमान पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील मोदींचा हा पहिलाच जपान दौरा आहे. जपान आणि भारत यांच्यातील मैत्री काही तशी नवी नाही. अगदी पन्नासच्या दशकापासून जपान आणि भारत एकमेकांना सहकार्याचा हात देत आले आहेत. गेल्या काही दशकांचाच विचार केला, तरी पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी होते तेव्हापासून जपान आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये वृद्धीच होत चालली आहे. आधी वाजपेयी, मग मनमोहनसिंग, नंतर नरेंद्र मोदी आणि आता पुन्हा मोदींच्या दुसऱ्या दौऱ्याच्या निमित्ताने हे संबंध वृद्धिंगत करण्याच्या दिशेने जाणीवपूर्वक पावले उचलली जाताना दिसत आहेत. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर अव्वाच्या सव्वा आयात शुल्क लागू केल्याने जागतिक व्यापार समीकरणे उलटीपालटी झालेली आहेत. ह्या पार्श्वभूमीवर भारत आणि जपान सहकार्याचे नवे पर्व सुरू करण्यासाठी पुन्हा जवळ येत आहेत ही जागतिक स्तरावरील मोठी घटना म्हणावी लागेल. मोदींचा पहिला जपान दौरा झाला तेव्हा ह्या मैत्रीपर्वातून निर्माण होणाऱ्या शक्यतांविषयी विस्तृत चर्चा झाली होती. जपानी कार्यक्षमता पंतप्रधान कार्यालयात अमलात आणण्यापासून कौशल्यविकास, साधनसुविधा निर्मिती, अणुऊर्जा, संरक्षण आदी क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याचे समझोते तेव्हा त्या दौऱ्यात झाले होते. आता सध्याच्या अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे संबंध नव्या शिखराला नेण्याचा भारताचा प्रयास आहे. मुळामध्ये भारत आणि जपान यांच्यात सखोल सांस्कृतिक अनुबंध आहेत. सहाव्या शतकामध्ये भारतातून जपानमध्ये बौद्धधर्म गेला. त्यामुळे हा फार मोठा सांस्कृतिक दुवा दोन्ही देशांदरम्यान आहे. दोन्हीही लोकशाही देश आहेत आणि दोहोंचे पारंपरिक संबंध मैत्रिपूर्ण राहिले आहेत. किंबहुना ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना उभारली तेव्हा जपानने त्यांची पाठराखण केली होती हा इतिहास पडद्याआड ढकलण्याचा प्रयास जरी झाला असला, तरी भारतीयांना त्यामुळे जपानविषयी वेगळेच ममत्व वाटत आले आहे. जपान हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगत देश आहे. त्यामुळे आज बोलबाला असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, सेमिकंडक्टर निर्मिती आदींच्या बाबतीमध्ये भारताला मोठा लाभ जपानपासून होऊ शकतो. सेमिकंडक्टर चीप निर्मितीच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर होऊ पाहतो आहे. चीन हा भारताप्रमाणेच जपानचाही पारंपरिक शत्रू आहे. सागरी हद्दीच्या वादामुळे असो किंवा सेनकाकू बेटांमुळे असो, चीन आणि जपान यांच्यात विस्तव जात नाही. आज ट्रम्प यांच्या कार्यकाळात ही परिमाणे बदलू घातली असली, तरीही चीनपासून असलेल्या धोक्यामुळे उभय देशांनी परस्पर सहकार्याचा हात पुढे करणे दोहोंसाठीही दीर्घकालीकदृष्ट्या लाभदायक ठरणारे असेल. त्यामुळे त्या दिशेनेही मोदींच्या ह्या दौऱ्यामध्ये प्रयत्न होतील. भारतातील साधनसुविधा व उत्पादन विकासात तर जपानी गुंतवणूक पूर्वीपासून राहिली आहे. सुझुकी, सोनी, टोयोटा, होंडा हे ह्याचे यशस्वी दाखले आहेत. मेट्रो व बुलेट ट्रेनपासून ‘जायका’पर्यंत साधनसुविधा क्षेत्रामध्येही जपानी गुंतवणूक सदैव राहिली आहे. औद्योगिक कॉरीडॉरपासून जपानी उद्यानांपर्यंत हे मैत्रीचे दाखले काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आहेत. त्यामुळे ही मैत्री पुढे नेताना भारताच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेस अनुसरून जपानने भारतामध्ये उत्पादनक्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक करावी अशी पंतप्रधान मोदींची अपेक्षा आहे. आपल्या जपान दौऱ्यात त्यांनी ती स्पष्ट शब्दांत मांडली देखील आहे. जपानने चाळी अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात केलेली आहे. भारतातील तो पाचवा सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक करणारा देश आहे. हे नाते अधिक दृढमूल करण्यासाठी, भारतामध्ये सध्या राजकीय, आर्थिक, सामाजिक स्थैर्य आणि पारदर्शकता आहे, त्यामुळे जगासाठी भारतात उत्पादन करा अशी हाक मोदींनी जपान्यांना दिलेली आहे. जपानमधून मोदी चीनकडे जाणार आहेत. शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीसाठी दोन दिवस ते चीन दौऱ्यावर असतील. तेथे ते शी जिनपिंग यांच्याव्यतिरिक्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही भेटणार आहेत. ट्रम्प यांनी भारताविरुद्ध अकारण व्यापारयुद्ध छेडले आहे खरे, परंतु त्यामुळे भारत जपान चीन रशिया हे समर्थ देश अधिक जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अमेरिकेच्या लहरी राजवटीविरुद्ध जागतिक जनमत एकवटू लागले आहे. मोदींचा जपान दौरा ही त्याची नांदी आहे.