पत्रकार अनंत साळकर यांचे निधन

0
6

>> ज्येष्ठ पत्रकार अनंत (संदेश) साळकर (५६, पिळगाव डिचोली) यांचे काल रविवारी सायंकाळी गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारादरम्यान निधन झाले.

काही दिवसांपूर्वी त्यांना अपघात झाला होता. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. एक अतिशय अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची विशेष ओळख होती. इंग्रजी, मराठी, कोकणी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. दै. तरुण भारत, लोकमत, गोमंतक, सुनापरान्त आदी विविध वर्तमानपत्रांतून त्यांनी विविध पदांवर काम केले. एक उत्तम स्तंभलेखक, प्रतिभावंत कवी अशी त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाबद्दल आमदार प्रेमेंद्र शेट, डॉ. शेखर साळकर, माजी सभापती राजेश पाटणेकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये, सुरेश वाळवे, राजेंद्र केरकर तसेच विविध मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज सोमवारी सकाळी १० वा. त्यांचा देह गोमेकॉत दान करण्यात येणार आहे. सांत्वनपर भेटीसाठी त्यांचा परिवार आज सायंकाळी चारनंतर पिळगाव येथे उपस्थित असेल असे कळवण्यात आले आहे.
गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने (गुज) साळकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. डॉ. शेखर साळकर यांनी साळकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दै. नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांनी, अनंत साळकर हे एक मृदुभाषी, बुद्धिवान पत्रकार होते. शैलीदार अस्खलित मराठी लेखनक्षमता त्यांच्यापाशी होती. आपल्यातून अकाली निघून गेलेल्या या पत्रकार मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.