पूजा ः अशी आणि तशी

0
41
  • विवेक कुलकर्णी

तिथे भावापेक्षा उपचारांना, पूजेपेक्षा कार्यक्रमांना अधिक महत्त्व असते. अशा या सगळ्या गोष्टीमुळे पूजेतली धार्मिकता, पावित्र्य, श्रद्धा, भावभक्ती दुर्मीळ होत चालली आहे आणि केवळ तो एक उरकून टाकायचा उपचार असे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे.

पूजा करणे म्हणजे एखाद्याविषयी कृतज्ञता आणि आदरभाव ठेवून त्याच्या चरणी लीन होणे, त्याची स्तुती करणे, त्याच्या महतीची स्तोत्रे गाणे, महतीच्या कथा सांगणे, स्तोत्रे रचणे, प्रत्यक्ष त्याला फुले इत्यादी अर्पण करणे. त्याची विविध रूपांत सेवा करणे आणि त्याला प्रार्थना करून प्रसन्न करून घेणे. तिच्यात आपली मनोकामना सांगणे आणि नमस्कार रूपाने त्याच्या चरणी लीन होणे. असे करणार्‍याच्या बाबतीत ‘पूजा’ हा शब्द चांगल्या अर्थाने वापरतात.

परंतु एखाद्याच्या नादाला लागून (मग तो इतरांसाठी चांगला नसला तरी) त्याच्या पायाशी सर्वस्व वाहणे म्हणजे त्याच्या नादी लागणे, क्वचित प्रसंगी एखाद्याची खरडपट्टी काढणे, माज उतरवणे या अर्थीही ‘पूजा बांधणे’ हा शब्द वापरतात. पण सामान्यपणे पूजा म्हटले की आपणाला प्रथम आठवतो तो देव आणि घरातले देवघर किंवा बाहेरचे मंदिर. कारण पूजेचा प्रथम संबंध आहे देवाशी. काही विशिष्ट व्रतवैकल्ये असतात, त्यांत त्या-त्या देवांची पूजा विशिष्ट प्रकारे केली जाते. उदा. सत्यनारायण व्रत, श्रीमदनंत व्रत, मंगलागौरी व्रत वगैरे…
पूजा का करतात तर पूजेचा पाया भक्ती म्हणजे आदरभाव. ही भक्तीदेखील नऊ प्रकारची असते. तिला नवविधा भक्ती म्हणतात. पठण, श्रवण, कीर्तन, दास्य इत्यादी तिचे प्रकार आहेत. पण यातील श्रेष्ठ भक्तीप्रकार ‘दास्य’ हा आहे. हनुमंताची भक्ती या प्रकारची होती म्हणून तो श्रेष्ठ भक्त. पूजा करताना हा भाव म्हणजेच भक्ती पाहिजे. नाहीतर तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे-
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
देव अशाने गावायचा नाही रे,
देव बाजाराचा भाजीपाला नाय रे…
असं व्हायचं.
पूजा काही लोक प्रत्यक्ष देवाच्या मूर्तीसमोर पूजासाहित्याने करतात, तर काही लोक मानसपूजा करतात. म्हणजे मनात त्या देवाचे ध्यान करून, मूर्ती डोळ्यांसमोर आणून, तिच्याशी तद्रूप होऊन आपण पूजा यथाविधी करत आहोत अशी कल्पना करून पूजा करायची. या पूजेसाठी भक्त हा निस्सीम भक्त व अढळ श्रद्धा असणारा लागतो. कारण आपले चंचल मन एका जागी काही वेळ का होईना दृढतेने स्थिर करणे ही सोपी गोष्ट नाही. पूजा करताना अर्पण करायच्या उपचारावरून पूजेचे दोन प्रकार करतात. शोडषोपचार पूजेमध्ये सोळा उपचार अनुसरले जातात- ध्यान, आवाहन, अर्ध्य, हात-पाय धुण्यास, चूळ भरण्यास पाणी देणे, आसन देणे, शुद्धोदक स्नान, गंध, वस्त्र, यज्ञोपवित, फुले, दुर्वा, पत्री इ. धूप, दीप, नैवेद्य, आरती, कर्पूरारती, मंत्रपुष्प, नमस्कार, प्रदक्षिणा, शेवटी प्रार्थना असे व अन्य उपचार असतात. शिवाय वेळावेळी अक्षता वाहण्याचा उपचार असतो. तर पंचमोपचार पूजा गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य अशा पाच प्रमुख उपचारांनी करतात. अर्थात आरती, कापूर, नमस्कार, शेवटी प्रार्थना आहेच. पूजा करताना एक-एक उपचाराच्या वेळी पुरुषसूक्तातील ऋचा म्हणून तो उपचार करतात. अभिषेक करायचा असेल तर त्या-त्या देवतेसाठी विशिष्ट स्तोत्र वापरतात. उदा. गणपतीसाठी गणपती स्तोत्र किंवा अथर्वशीर्ष, सत्यनारायणासाठी पुरुषसूक्त, देवीसाठी स्त्रीसूक्त, महालक्ष्मी स्तोत्र, शंकरासाठी शिवमानसपूजा किंवा रुद्र इ. अभिषेक साध्या पाण्याने शुद्धोदकाने किंवा दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र करून केलेल्या पंचामृताने केला जातो. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने, षोडशोपचाराने पूजा करायची म्हटली तर खूप वेळ लागतो आणि प्रत्येकाजवळ तेवढा वेळ असेलच याची खात्री नसते. म्हणून जमतील तेवढे व तसे उपचार केले जातात. उत्तरपूजा विसर्जनाच्या वेळी केली जाते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्रामुख्याने षोडशोपचार पूजा केली जाते. पूजेला आरंभ करण्यापूर्वी सकल देवदेवतांचे स्मरण, स्वशरीर प्राकार, पूजाद्रव्य यांची शुद्धी, गणेश (स्मरण) आचमन, संकल्प, गणेशपूजन (प्रतीकात्मक), कलश, शंख, घंटा, दीप यांचे पूजन करून मुख्य पूजेला सुरुवात केली जाते.

पूजेसाठी वापरायची भांडी म्हणजे कलश (तांब्या). भांडे, पळी, ताम्हण, निरांजन इ. एकारती, पंचारती, घंटा इत्यादी. पूर्वी ही भांडी तांब्या-पितळेची होती. यात आपल्या पूर्वजांची वैज्ञानिक दृष्टी दिसते. तांब्याच्या भांड्यातील पाणी हातावर घेऊन आचमनाने प्यायचे. तांबे शरीरातली उष्णता काढून घेते. आजही अनेक घरांत घागर, कळशी, तांब्या इ.सह तांब्या- पितळेची भांडी आहेत. पण सध्याच्या काळात आर्थिक प्रगतीचा स्तर उंचावला आहे. त्यामुळे हौसेखातर म्हणा अगर आपल्या वैभवाचे, श्रीमंतीच्या प्रदर्शनाखातर म्हणा, आज ही भांडी चांदी-सोन्याची दिसतात. पूजेचे काही साहित्य जर सोन्याचांदीचे तर मग देवाचे आसन आणि देव सोन्याचांदीचे का नकोत? त्यांना कसे वगळायचे म्हणून देवाची बैठक, आसन, देव्हारा सोन्याचांदीचा, हिरेजडित झाला. देवाच्या मूर्तीही झाल्या. शिवाय वस्त्रे मखमाली, रेशमी, गाद्यागिरद्या, देवाला विविध अलंकार, रत्नजडित सुशोभित पालख्या असे सगळे वैभवाचे झाले. देव श्रीमंत झाले. आता या श्रीमंतीचे, वैभवाचे संरक्षण करणे ओघाओघानेच आले. मग हे श्रीमंत देव बंदिस्त झाले. त्यांच्या खोल्यांना कडी-कुलूपे लागली. त्यांच्याभोवती अष्टौप्रहर पहारेकरी उभे झाले. देवाच्या जवळ जायला पुजार्‍याशिवाय इतरांना बंदी झाली. देवाचे दर्शन घ्यायचे ते लांबून आणि क्षणभरच. आता पूर्वीसारखी या श्रीमंत देवळांत देवासमोर एक घटकाभरसुद्धा बसायची सोय नाही. ही देवांची, मंदिरांची श्रीमंती, वैभव बघण्यासाठी गर्दी वाढतेच आहे. देव आणि मंदिरे श्रीमंत झाली, त्यांना वैभव मिळाले, प्रसिद्धी मिळाली, पण देव भक्तांपासून दूर पाहार्‍यात बंदिस्त झाले. भक्तापासून दूर गेले. भक्त आता त्यांच्याजवळ जाऊ शकत नाहीत. दर्शन घ्यायचे ते क्षणभरच. तेही दुरून. जरा जरी थांबलात तर रांगेतली माणसे, पहारेकरी पुढे ढकलतात. वादावादी, क्वचित हाणामारी. सारांष- हे श्रीमंतीचे देव आणि भक्त यांच्यात देवालयात एक दरी निर्माण केली आहे. ही झाली बाहेरच्या ठिकाणच्या सार्वजनिक देवालयांची स्थिती. घरातही जर देवाचे असे वैभव असेल तर थोड्याफार फरकाने हीच स्थिती.

अनेक भक्त देवांना, देवालयांना स्वेच्छेने पैसे, दागदागिने, वस्तू देऊन नटवतात. श्रीमंत बनवतात. असे करण्यामागे त्यांचा हेतू खरेच किती अढळ श्रद्धेचा, भक्तीचा असतो हे तेच जाणे. केवळ आपल्या दिखाऊपणाचे, दानशूरतेचे दर्शन करण्यासाठी, नकळत जोपासलेला अहंकार जोपासण्यासाठी की इतरांपेक्षा मी वेगळा भक्त कसा आहे ते दाखविण्यासाठी की अन्य काही कारणासाठी, हे तेच जाणोत! पण सामान्यांना असा प्रश्‍न पडतो की यालाच खरी भक्ती म्हणायचे काय? अशांना असे केल्याने देव लवकर पावतो? अशी श्रीमंती देवाला मान्य आहे की यालाच खरी भक्ती म्हणायचे? खरे तर अंतःकरणापासून, भावभक्तीने दिलेल्या पाण्याच्या थेंबाने, पान-फुलानेही तो संतुष्ट होतो. भगवंताने स्वतः म्हटले आहे-
पत्रम्, पुष्पम्, फलम्, तोयम्, भक्त्या यो माम् प्रयच्छति|

  • अंतःकरणापासून भावभक्तीने मला जो पान, फूल, फळ किंवा पाणी देतो त्याने मी संतुष्ट होऊन प्रसन्न होतो. म्हणजेच देव भावाचा, भक्तीचा भुकेला आहे.

पण सध्या खर्‍या आंतरिक भावभक्तीपेक्षा बाह्यरंगालाच अधिक महत्त्व आलेले दिसते. घरची किंवा मंदिरातली पूजा हा काहींच्या बाबतीत उपचारापुरता उपचार राहिला आहे. सार्वजनिक किंवा वैयक्तिक धार्मिक सणांना, कार्यक्रमांना, पूजेला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले आहे. ऐच्छिक सक्तीची वर्गणी, मोठमोठे मंडप, आरास, सजावट, रोषणाई, लाऊडस्पीकरचा कर्णकर्कश आवाज आणि सिनेमातील गीतावरचा रेकॉर्ड डान्स, नाटके, स्पर्धा, ऑर्केस्ट्रा हमखास असतो. हेच बघायला लोक येतात. देवापुढे भरपूर पैसा येतो. देव हे सारे नाईलाजाने, मुकाटपणे पाहत असतो, कारण तोही यातून सुटत नाही. अशा धार्मिक कार्यक्रमांना, पूजांना येणारे पुष्कळसे लोक कार्यक्रमासाठीच आलेले असतात. जाता-जाता अनायासे सहज होणारे, घडणारे देवदर्शन आणि प्रसाद हे सारे दुय्यम.

मोठ्या शहरातल्या घरच्या किंवा सार्वजनिक पूजा घड्याळाच्या काट्याबरोबर धावत असतात. पूजेचे यजमान, पुरोहित आणि दर्शनाला, कार्यक्रमाला येणारे सारेच घड्याळाचे गुलाम असतात. तिथे भावापेक्षा उपचारांना, पूजेपेक्षा कार्यक्रमांना अधिक महत्त्व असते. यजमान खूश, कारण कसेही करून किंवा भरघोस देणगी देऊन पूजेचा मान मिळाला आणि जाता जाता तेवढेच पुण्य लाभले. भटजी खूश कारण एक वार्षिक उपचार पार पडला. भरपूर दक्षिणा मिळाली. लोक खूश कारण आवडीचे कार्यक्रम बघायला मिळाले आणि जाता-जाता प्रसाद आणि दर्शन झाले. इष्टमित्रांच्या, इतरांच्या गाठीभेटी झाल्या. अडलेली एकदोन कामे झाली. थोडेसे पुण्य मिळाले.

तीर्थक्षेत्री येऊन धार्मिक कृत्ये किंवा पूजापाठ करणारी मंडळी तर प्रथम पर्यटन, सहल आणि नंतर पूजा, देवभक्ती दुय्यम. शक्य होईल तेवढे पुण्य जाता-जाता पदरात पाडून घ्यायचे. किरकोळ स्वरूपाचे पूजाविधी, अभिषेक वगैरे करायला त्यांना किंवा पुरोहितांना सवड, वेळ नसेल तर तेथील पुरोहितांना ‘तुम्ही सवडीने आमच्या वतीने हे करा व प्रसाद पाठवा’ असे सांगून पैसे दिले जातात. यामुळे पुरोहितांनाही चांगलाच लाभ. अशा या सगळ्या गोष्टीमुळे पूजेतली धार्मिकता, पावित्र्य, श्रद्धा, भावभक्ती दुर्मीळ होत चालली आहे आणि केवळ तो एक उरकून टाकायचा उपचार असे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे.

आजही काही ठिकाणी घरची किंवा सार्वजनिक ठिकाणची एखादी पूजा असेल तर घरादाराची, आसपासची, सभोवतालची स्वच्छता केली जाते. साजेसी सजावट केली जाते. नातेवाईक, इष्टमित्रांना आग्रहाचे आमंत्रण जाते. यजमान मोठ्या भावभक्तीने शूचिर्भूततेने पूजा करतात. पुरोहितदेखील अगदी शास्त्रोक्त पद्धतीने, घाईगडबड न करता व्यवस्थित पूजा सांगतात व यजमानाकडून व्यवस्थित करून घेतात. पूजेला येणारे शांतपणे बसून पाहात असतात व ऐकत असतात. सर्व वातावरण मंगलमय व पवित्र असते. नंतर सामुदायिक आरती होते. तो सोहळा अवर्णनीय असतो. तीर्थप्रसाद वाटला जातो. प्रत्येकजण स्वेच्छेने पुढे येऊन कामे करत असतो. रात्री भजन, कीर्तन, प्रवचन, भक्तिसंगीत, गायन असे कार्यक्रम असतात. वातावरण भक्तिमय बनते. सारेच चैतन्यमय व भक्तिमय. तेथे बाह्यउपचार, भक्तीचा देखावा, वैभवाचे प्रदर्शन इत्यादी अनुचित गोष्टी अभावानेच दिसतात.