सामुदायिक शेती योजना लवकरच ः कृषिमंत्री सरदेसाई

0
206
????????????????????????????????????

गोवा सरकारच्या कृषी खात्यातर्फे लवकरच सामुदायिक शेती योजना सुरू करण्यात येणार असून त्याचा फायदा सामुदायिक पद्धतीने शेती करून शेतकर्‍यांनी घ्यावा असे आवाहन कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी काल मडगाव येथे केले. मडगाव रवींद्र भवनमध्ये कृषी संचालनालयातर्फे आयोजित गोवा कृषी महोत्सव २०१८ चे उद्घाटन केल्यानंतर कृषीमंत्री सरदेसाई बोलत होते.

कंत्राटी पद्धतीने शेती करण्याच्या योजनेचे विधेयक आगामी विधानसभा अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. त्यामुळे गोव्यात कृषी उत्पादनात भर पडेल असा दावा त्यांनी केला. लागवड न करता शेतीजमीन पडिक ठेवली जात असून वरील योजनेमुळे शेतीला चालना मिळेल असे सरदेसाई यांनी सांगितले.

सामुदायिक शेती पद्धतीमुळे सहकारी तत्त्वावर कृषी उत्पादन घेता येईल. एकाच कृषी जमिनीच्या सीमेलगत दुसरा शेतकरी असल्यास सर्वांना सामुदायिक पद्धतीने शेती करता येईल. पंप खरेदी करणे, कुंपण बांधणे व इतर योजनांसाठी ९० टक्के आर्थिक अनुदान सरकारतर्फे मिळणार आहे. कृषी खात्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले १२ ट्रॅक्टर खरेदी केले आहे. त्यांचा उपयोग शेतकर्‍यांनी घ्यावा. पडिक जमिनीत कृषी उत्पादने घेण्यासाठी शेतकर्‍यांनी या योजनांचा फायदा घ्यावा असे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.