साधनसुविधा क्षेत्रात अधिक गुंतवणूक व्हावी

0
99

>> रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन

साधनसुविधा हा विकासासाठी नवा मंत्र आहे. त्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीची गरज असून खासगी क्षेत्राने मोठ्या प्रमाणात त्यात गुंतवणूक करायला हवी, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काल सांगितले.
भारतीय उद्योग महासंघाने काल पणजीत लॉजिस्टिक ह्या विषयावर आयोजिलेल्या परिषदेत ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. ते म्हणाले की केंद्राचे साधनसुविधा धोरण तयार असून नजिकच्या काळात साधनसुविधा विकासात प्रचंड गुंतवणूक होणार आहे.
कोंकण रेल्वेने केलेल्या विकासाची माहिती देताना प्रभू म्हणाले की कोकण रेल्वेच्या विकासासाठी ४० हजार कोटी रु. खर्च करण्यात आले आहेत. उद्योग व पर्यटनाच्या विकासासाठी कोंकण रेल्वेच्या ४०० स्थानकांचा विकास करण्यात येणार असल्याची माहितीही त्यानी यावेळी दिली. प्रवाशांसाठीच्या रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यासाठीही रेल्वे प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले रेल्वे हे प्रवासासाठीचे सर्वांत स्वस्त असे साधन आहे. तसेच रेल्वे वाहतुकीमुळे प्रदूषणही होत नसल्याचे त्यानी नमूद केले. साधनसुविधा क्षेत्रात रोजगाराच्याही मोठ्या संधी असल्याचे ते म्हणाले.
सन्माननीय पाहुणे या नात्याने बोलताना पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो म्हणाले की, गोवा हे लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करणे शक्य आहे. दुबई जर लॉजिस्टिक हब होऊ शकते तर गोवा का होऊ शकत नाही, असा सवालही त्यानी यावेळी केला. गोवा हे लॉजिस्टिक हब म्हणून विकसित केल्याचा राज्याला त्याचा भरपूर फायदा होईल. दुबईला जाणारे उद्योगपती गोव्यात येतील गोवा हे मूळताच सुंदर आहे. त्यामुळे या उद्योगपतीचा आवश्यक त्या सुविधा येथे उपलब्ध करून दिल्यास ते दुबईऐवजी गोव्यात येणे पसंत करतील, असा युक्तीवाद गुदिन्हो यांनी केला.
राज्यात महामार्ग, पूल, रेल्वे यांचा विकास होत असून कधी नव्हे एवढी साधनसुविधा निर्माण होऊ लागली असल्याचे गुदिन्हो म्हणाले. या साधनसुविधा वाढीमुळे राज्यात रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ लागल्या असल्याचेही गुदिन्हो म्हणाले.